प्राण्यांच्या संधिपाद संघातील अष्टपाद अ‍ॅरॅक्निडा वर्गात गोचिडांचा समावेश होतो. मुखांगांच्या दोन जोड्या आणि पायांच्या चार जोड्या ही या वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत. टणक गोचिडे (आयक्झोडिडी) आणि मऊ गोचिडे (अरगॉसिडी) अशी त्यांची दोन कुले आहेत. टणक गोचिडांचे शरीर कठिण असून त्याची मुखांगे वरून दिसतात, तर मऊ गोचिडांचे शरीर मऊ असून त्याची मुखांगे वरून सहजपणे दिसत नाहीत. गोचीड रक्तशोषक असून त्यांचा माणूस, पाळीव प्राणी, पक्षी आणि साप-सरड्यांसारखे सरपटणारे प्राणी यांना उपद्रव होतो.

गोचिडाच्या शरीराचे शीर्षवक्ष आणि उदर असे दोन भाग असतात. मुखांगे आश्रयींच्या (ज्याच्यावर गोचिडे असतात ते प्राणी) त्वचेत खुपसून त्यांच्या रक्ताचे शोषण करण्यास सोयीची असतात. गोचीड जेव्हा चावा घेते तेव्हा आश्रयीच्या त्वचेत आपले दात खुपसून घट्ट बसते. अशी गोचीड काढणे अवघड काम असते. रक्त पिऊन तट्ट फुगल्यावर ती आपली पकड ढिली करते व आश्रयीपासून गळून पडते.

गोचिडाची मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. त्या जमिनीवर अथवा गवतावर हजारो अंडी घालतात. ओलावा आणि ऊन या घटकांनुसार सुमारे महिन्याभरात अंड्यांतून सहा पायांचे डिंभ (अळीसारखी अवस्था) बाहेर पडतात. पहिल्यांदा कात टाकल्यानंतर डिंभांचे रूपांतर आठ पायांच्या अर्भकात होते. ही अर्भके झु़डपांच्या पानांच्या कडेला बसून राहतात आणि जवळून जाणार्‍या आश्रयींच्या अंगावर स्वार होतात. जमिनीची कंपने, स्पर्श आणि उष्णतेची जाणीव तसेच काही जीवरसायने यांवरून त्यांना आश्रयीची चाहूल लागत असते. आश्रयीपासून शोषल्या गेलेल्या रक्तावर अर्भक पोसते आणि त्याचे रूपांतर प्रौढात होते. गोचिडाचा पोषण कालावधी हा जातीनुसार आणि अर्भकाच्या अवस्थेनुसार ठरतो. उदा., पृषत ज्वर गोचीड (स्पॉटेड फिवर टिक) नावाच्या गोचिडाला प्रौढावस्था प्राप्त होण्यासाठी साधारण दोन वर्षे लागतात. पूर्ण वाढ झालेल्या गोचिड्या अन्नाशिवाय बरीच वर्षे जगतात. तसेच काही डिंभ अन्नाशिवाय बरेच महिने जगल्याचेही आढळून आले आहे.

माणसांना आणि पाळीव प्राण्यांना त्रासदायक ठरणारी गोचिडे बहुतांशी टणक गोचिडे आहेत. डरमॅसेंटर व्हेन्यूस्टस ही जाती माणसाच्या ‘रॉकी माउंट ठिपके’ ज्वराची वाहक आहे. डरमॅसेंटर रेटिक्यूलेटस या जातीमुळे कुत्र्यांमध्ये पीतज्वराचे संक्रमण होते. असाच रोग दक्षिण आफ्रिकेत हीमोफायसॅलिस लिची या जातीच्या चाव्यामुळे होतो. मॉरगॅरोपस अ‍ॅन्यूलेटस ही जाती जनावरांच्या रक्तमूत्र रोगाच्या जंतूंची वाहक आहे. दक्षिण कर्नाटकात ‘कॅसनूर फॉरेस्ट डिसीज’ या प्राणघातक आजाराचे विषाणू माकडांवरील गोचिडे माणसामध्ये नेत होती. काही टणक गोचिडांच्या चावण्यामुळे ‘गोचीड पक्षाघात’ होतो. गोचिडे काढून टाकताच हा रोग बरा होतो. ऑर्निथोडोरस ट्युरिकेटा ही गोचीड स्पायरोकिटी या जंतूंची वाहक असून त्यामुळे मानवाला ‘पुनरावर्ती’ ज्वर होतो. अर्गस मिनिएटस ही जाती स्पायरोकिटी या जंतूंची वाहक असून त्यामुळे कोंबड्यांना स्पायरिलोसिस रोग होतो. कीटकनाशके वापरून गोचिडांचे नियंत्रण करता येते.