उंदरासारखा दिसणारा एक सस्तन प्राणी. चिचुंदरी हा युलिपोटिफ्ला या गणातील आहे. या गणातील सोरीसिडी कुलाच्या पांढऱ्या दातांच्या प्रकारात संकस प्रजाती येते. संकस प्रजातीतील प्राण्यांना चिचुंदरी म्हणतात. या प्रजातीत १८ जाती आहेत. भारतात आढळणाऱ्या चिचुंदरीचे शास्त्रीय नाव संकस म्यूरिनस आहे.
चिचुंदरी (संकस म्यूरिनस)

शरीर लांबलचक, निमुळते व लांब मुस्कट, बारीक डोळे, गोलसर आणि आखूड कान, समोरचे दात, अंगावर बारीक व मऊ लव तसेच शेपटीवरील विरळ केस ही चिचुंदरीची लक्षणे उंदराहून वेगळेपणा दाखवितात. चिचुंदरीच्या शरीराची लांबी सु.१५ सेंमी. असून शेपूट सु.८ सेंमी. लांब असते. रंग करडा, गडद किंवा फिकट तपकिरी असतो. खालच्या जबड्यातील समोरचे दोन दात लांब, पुढे आलेले आणि आडवे असून त्यांची टोके वर वळलेली असतात. वरच्या जबड्यातील समोरचे दोन दात वाकडे असतात. नराच्या पार्श्वभागावर दोन ग्रंथी असतात व त्यांच्या स्रावाला कस्तुरीसारखा उग्र वास येतो. विशेषकरून प्रजनन काळात हा वास अधिक उग्र असल्याने याला ‘कस्तुरी उंदीर’ असेही म्हटले जाते ; परंतु ही संज्ञा योग्य नाही. कस्तुरी उंदीर (मस्क रॅट) हा वेगळा प्राणी असून त्याचा समावेश कृंतक गणाच्या क्रिसेटिडी कुलात होतो.

दिवेलागणीच्या सुमारास आणि रात्री चिचुंदरी चूंssचूं असा मोठ्याने आवाज करीत खाद्याच्या शोधात बाहेर पडते. झुरळे व घरात आढळणारे इतर कीटक हे तिचे भक्ष्य होय. प्रसंगी ती छोटे पक्षी, उंदीर, सरडे किंवा लहान सापही खाते. जिथे तिचा वावर असतो तिथे झुरळे कमी आढळून येतात. प्रजनन काळात चिचुंदरी बिळामध्ये गवत आणि पालापाचोळा यांच्या साहाय्याने ओबडधोबड घरटे तयार करते. गर्भावधिकाल २१ दिवसांचा असतो. तिला एकावेळी २-३ पिले होतात. अन्नाच्या शोधात आई बाहेर पडली की, पिले तिच्या मागोमाग बाहेर पडतात. प्रत्येक पिलू पुढच्या पिलाचे शेपूट तोंडात पकडते व सर्वांत पुढचे पिलू आईचे शेपूट पकडते. अशा तऱ्हेने ही माळ आगगाडीसारखी चाललेली दिसते.

चिचुंदरी निरुपद्रवी प्राणी आहे. घरातील कीटकांवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे ती माणसांना उपयोगी आहे. कीटक व कीटकांच्या अळ्या खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवीत असल्याने ती बागा आणि शेतीसाठी उपयुक्त आहे. कोल्हे व घुबड यांचे चिचुंदरी हे भक्ष्य आहे. मात्र उग्र वासामुळे तिचे शत्रूंपासून संरक्षण होते. क्वचित प्रसंगी ती तिच्याहून मोठ्या आकाराच्या उंदरावरही हल्ला करते. लाल दात असलेली चिचुंदरी विषारी असून तिचा चावा भक्ष्यासाठी विषारी ठरू शकतो.

संकस प्रजातीतील एट्रुकस ही जाती जगातील सर्वांत लहान सस्तन प्राणी आहे. तिची लांबी ६-८ सेंमी. असून वजन १.५-२.० ग्रॅ. असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा