अननस ही ब्रोमेलिएसी कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव अननस कोमोसस  (अननस सटिव्हस ) आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व त्रिपुरा या राज्यांत व्यापारी स्तरावर अननसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये तुरळक प्रमाणात अननसाची लागवड होते. लागवड बियांपासून, तसेच झुडपाच्या वेगवेगळ्या भागांपासून (उदा., बुंध्यापासून निघालेली फूट, फळांचा शेंडा, इत्यादींपासून) करतात.अननस हे बहुवर्षायू व लहान झुडूप असून त्यांचा बुंधा मोठा व खुजा असतो. पाने लांबट, भालाकार, दंतुर काठाची, वरच्या बाजूला चकचकीत व टोकदार असतात. पुष्पविन्यास लालसर, लहान तसेच पानांनी वेढलेला असतो. पुष्पविन्यासापासून मऊ, मांसल आणि संयुक्त फळ तयार होते. फळ रसाळ, किरमिजी रंगाचे व चवीला आंबटगोड असते.

अननसाची पक्क फळे चकत्या करून खातात त्याच्या फळापासून मुरंबा, रस व शिर्का तयार करतात. त्याच्या ताज्या रसात ब्रोमेलिन नावाचा पाचक पदार्थ असतो. तसेच क जीवनसत्त्वही असते. पिकलेले फळ शीतल, पाचक व मूत्रल असते. निर्यात करताना त्याचा गर हवाबंद डब्यांत भरून पाठवितात. अननसाच्या पानांपासून काढलेल्या धाग्यांपासून हातविणीचे कापड तयार करतात. हे कापड रेशमासारखे दिसते. धाग्यांपासून दोराही तयार करतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा