वाढती जागतिक लोकसंख्या, वातावरणातील बदल, अन्न मागणीत होणारी वाढ या दृष्टिकोनांतून विचार केल्यास, जनुकीय विविधता, संबंधित वन्य वनस्पती जाती, आनुवांशिक विविधता यांचे संवर्धन करणे भविष्यातील वनस्पती उत्पादनासाठी आवश्यक आहे. जनुक पेढ्यामध्ये जीवशास्त्रीय साहित्य गोळा व संग्रहीत केले जाते, त्यांच्या याद्या तयार करून पुनर्वितरणासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. जनुक पेढ्या “जर्मप्लाझम बँका” म्हणूनदेखील ओळखल्या जातात. हे जर्मप्लाझम वनस्पती, बियाणे व परागकण या स्वरूपात म्हणजे “ईन विट्रो” साठविले जाते. वनस्पती जनुक पेढीची मुख्य भूमिका म्हणजे जनुकीय विविधता साठविणे, आणि त्यानंतर संबंधित माहिती, संशोधन, इत्यादी जैविक सामग्री व साहित्य भविष्यात वनस्पतींची पैदास करण्यासाठी उपलब्ध करून देणे.
जनुक पेढ्यांना कधीकधी “एक्स सिटू” (जैविक सामग्री व साहित्य यांना नैसर्गिक आवासाच्या बाहेर संरक्षित केले जाणे) संवर्धन सुविधा म्हणून उल्लेखिले जाते.
जनुक पेढ्या प्रामुख्याने पाच प्रकारांच्या असतात:
बियाणे जनुक पेढी : येथे जर्मप्लाझम बियाणे स्वरूपात जतन केले जाते.
क्षेत्रीय जनुक पेढी : यांना वनस्पती जनुक पेढीदेखील म्हणतात , येथे विविध भौगोलिक क्षेत्रांत वाढणाऱ्या वनस्पतींचे जर्मप्लाझम संग्रहीत केले जाते. याला “इन सिटू” संवर्धन म्हणतात. ज्या वनस्पतींचे सहजगत्या बियाणे होत नाहीत त्यांचे जर्मप्लाझम क्षेत्रीय जनुक पेढ्यामध्ये कायमस्वरूपी जिवंत संग्रह करून संवर्धन करता येते.
विभाज्या (मेरीस्टेम) जनुक पेढी : लिंगभेदाशिवाय प्रसारित होणाऱ्या वनस्पती जातींचे जर्मप्लाझम या पेढ्यांमध्ये संग्रहीत केले जाते. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर बागायती प्रजातींच्या वंशवृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी वापरली जाते.
परागकण पेढी : येथे फुले व वनस्पतींच्या नर आनुवंशिक गुणधर्म असलेल्या विविध प्रकारांच्या परागकणांचा संग्रह केला जातो. त्यांचा उपयोग वनस्पतींचे “एक्स सिटू” अवस्थेमध्ये संवर्धन करण्यासाठी केला जातो. जीवाश्म झालेल्या परागकणांचा अभ्यास. वर्णन, संदर्भ व संग्रहाचे साधन म्हणून या पेढ्यांचा वापर होतो. परागकण विविध विकल्पांचा एक उपयुक्त स्रोत आहेत आणि त्यामुळे जनुक पेढ्या वनस्पतींचे एक प्रभावी प्रसारमाध्यम असू शकतात. परागकण संग्रहीत करणे, सुकविणे, जैवतांत्रिक व्यवहार्यतेची चाचणी करणे आणि दीर्घकाळासाठी मूल्यांकन करणे, या पद्धती अनेक प्रजातींसाठी विकसित केल्या आहेत.
डी.एन.ए पेढ्या : डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) पेढ्या आनुवंशिक संसाधनांचा (जनुके डीएनए) मोठ्या प्रमाणात “एक्स सिटू” अवस्थेमध्ये, जलद आणि कमी खर्चात अधिक तंतोतंत जर्मप्लाझमचे संग्रह करू शकतात. त्यांचा वापर नामशेष होऊ घातलेल्या वनस्पतींच्या मूलद्रव्यीय जाति – आनुवंशिकतामध्ये आणि सिस्टीमाटिक्समध्ये केला जाऊ शकतो. संवर्धनासाठी त्याचा वापर संपूर्ण वनस्पती म्हणून मर्यादित आहे, कारण डीएनएमधून संपूर्ण वनस्पतींची पुनर्बांधणी होऊ शकत नाही. आनुवंशिक गुणधर्माचा उपयोग वनस्पती पैदास आणि सुधारणा यांसाठी केला जाऊ शकतो.
जनुक पेढ्यांचे अनेक फायदे आहेत. व्यावसायिक विविधता विस्तारित करणे आणि उपयुक्त आनुवंशिक गुणधर्माच्या पिकांचा प्रसार करणे यांसाठी त्यांचा उपयोग होतो. हे संग्रह अधिक प्रभावी वर्गीकरण करण्यास सक्षम करतात. पिकांच्या आनुवंशिक घटकांचे परिणाम, रचना व सीमांची माहिती होते . सारखी दिसणारी पिके नीटपणे ओळखता येतात. संग्रहाची माहिती प्रमाणात व तंतोतंत ठरते. भविष्यात माहिती संपादन करणे, त्याचे मार्गदर्शन व विश्लेषण करणे आणि आनुवंशिक तपशीलवार तर्क प्रदान करणे यांसाठी उपयोग होतो. रोगप्रतिरोधक पिकांचे उत्पादन शक्य होते. या पेढ्या एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कीटकांच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या वनस्पतींचे व पिकांचे प्रजनन व संवर्धन यांची माहिती प्रदान करतात.
या पेढ्यांच्या कार्यक्षमतेत कमतरतादेखील आहेत, त्या म्हणजे बियाण्यांच्या जैवयांत्रिकी व्यवहार्यतेचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आवश्यक असते. क्षेत्रीय जनुक पेढ्या जाति विविधतेचा केवळ एक भाग साठवू शकतात, संपूर्ण प्रजाती नाही. क्षेत्रीय जनुक पेढ्यातील जर्मप्लाझमला रोगजनकांचा आणि नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. वीज पुरवठा अपूर्ण असल्यास यांत्रिकी व्यवहार्यतेचा तोटा होतो आणि त्याद्वारे जर्मप्लाझमचे नुकसान होऊ शकते. अनेक वर्षे जर्मप्लाझमचा साठा करणे आर्थिक दृष्ट्या महाग ठरते.
वनस्पतींच्या आनुवंशिक तत्त्वांचे संसाधन व संवर्धन हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यात “इन सिटू” आणि “एक्स सिटू” या धोरणांचा वापर जरूरीप्रमाणे एकत्र करणे फायद्याचे आहे.
समीक्षक : डॉ. बाळ फोंडके