सजीवांचे गुणधर्म त्यांतील जनुके ठरवितात. प्रत्येक सजीवात अनेक पेशी, प्रत्येक पेशीत एक केंद्रक, त्यांत अनेक गुणसूत्रे, प्रत्येक गुणसूत्रावर अनेक जनुके असतात. जनुके डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाच्या (डीएनए) अनेक जोड्यांची असतात. जनुके हा आनुवंशिकतेचा मूलभूत पाया आहे,  हे सर्वमान्य झाले आहे.

एका सजीवाच्या सर्व पेशींतील केंद्रकांमध्ये सारखीच गुणसूत्रे आणि प्रत्येक गुणसूत्रावर सारखीच जनुके असतात. ही जनुके वा जनुकांचे संग्रह त्या त्या सजीवाचे गुणधर्म ठरवितात. ही जनुके सजीवांच्या पिढ्यांपिढ्यात गुणधर्मांचे सातत्य राखतात. त्याच वेळी भौगोलिक परिस्थितीनुसार अनुकूलन होऊन सजीव प्रकाराच्या वेगवेगळ्या जाती दिसून येतात किंवा उत्परिवर्तन (Mutation) होऊन, त्या सजीवांचे नवीन प्रकार तयार होतात.  अशा वेगवेगळ्या प्रकारात नैसर्गिक संकरण होऊन त्याच सजीवाच्या  नवनवीन जाती अस्तित्वात येतात, कृत्रिम रीत्या संकरण करून सजीवाच्या नवीन जाती तयार केल्या जाऊ शकतात. परंपरागत पद्धतीत एका झाडावरील फुलांचे परागकण दुसऱ्या झाडावरील फुलांच्या अंडकोशावर ठेऊन संकरण केले जात असे. वेगवेगळे गुणधर्म असलेले प्रकार एकत्र आणून तिसराच प्रकार निर्माण केला जात असे.

आंब्याच्या झाडामध्ये ४० गुणसूत्रे असतात. हापूस, लंगडा, दशहरी या सर्व जातीत गुणसूत्रे सारखीच असतात,  त्यांच्यात पारंपरिक पद्धतीने संकरण करून नवीन प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. हापूस आणि नीलम यांच्या संकरणातून ‘रत्ना’ हा वेगळा आंब्याचा प्रकार कोकण कृषी विद्यापीठातील प्रयोगाद्वारे अस्तित्वात आला. तसेच, उत्तर भारतातील दशहरी आणि दक्षिण भारतातील नीलम या जातीत संकरण करून दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेत ‘आम्रपाली’ हा आंब्याचा प्रकार निर्माण करण्यात आला.

अर्थात, रत्ना किंवा आम्रपाली हा आंब्याचा प्रकार पाहिजे असेल तर हापूस, नीलम व दशहरी या आंब्यांच्या जाती उपलब्ध असणे जरूरीचे आहे. म्हणजेच नवीन प्रकारांच्या निर्मितीसाठी मूळ जातींचे जतन आणि संवर्धन अपरिहार्य आहे.

सहसा, संकरणाद्वारे मूळ जातींमधील चांगले गुण नव्या जातींत एकत्र आणण्याचे प्रयत्न असतात. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, टोमॅटो, बटाटा व कापूस यांचे अनेक वाण (प्रकार) या प्रकारे कृषी-वैज्ञानिकांनी मिळविले आहेत. अंगभूत गुण लक्षात घेऊन संकरणाद्वारे निर्माण केलेल्या धान्यांच्या जातींत अधिक उत्पादनशक्ती, दुष्काळ-सहनशीलता व खार-सहनशीलता असे गुण अस्तित्वात आणण्यात आले आहेत. हे शक्य करण्यासाठी त्या त्या धान्यांच्या मूळ जातींचे जतन करण्यात आले.

पूर्वपरंपरेप्रमाणे एका धान्याच्या दोन वेगवेगळ्या जातींमध्ये संकरण करून नवीन जाती (वाण) तयार करणे हे प्रयत्न-प्रमाद (trial and error) पद्धतीने करीत असत. त्यात वेळ तर जात असेच; पण अपेक्षित यश मिळेल ही खात्री नसे. नवीन साधने आणि शास्त्रीय प्रगती यांमुळे धान्यांचे गुणधर्म आणि विशिष्ट जनुके यांचे नाते जोडणे शक्य झाले आहे. परिणामी निवडक जनुकांचा उपयोग करून अपेक्षित यश मिळविणे, तेही कमी वेळात, शक्य झाले आहे. असे यश मिळविण्यासाठी सजीव प्रकार शोधणे, त्यांच्यातील जनुके ओळखणे, जनुकाशी संबंधित गुण ओळखणे, ओळखलेल्या प्रकारांचे शाश्वत संग्रहण करणे व जरूरीप्रमाणे त्यांचा उपयोग करणे, यासाठी विशेष प्रकारच्या जनुक-पेढ्यांची सुविधा निर्माण करणे व तेथे अद्ययावत प्रयोगशाळा जोडणे या सगळ्या जनुकसंपत्ती जतन करण्याच्या आवश्यक पायऱ्या आहेत.

                                                                                                                                                                                                                     समीक्षक : डॉ. बाळ फोंडके