मान्स्टाइन, एरिख फोन : (२४ नोव्हेंबर १८८७ ‒ ११ जून १९७३). जर्मन फील्डमार्शल. पूर्व प्रशियातील लेविन्स्की या खानदानी घराण्यात बर्लिन येथे जन्म. याची आई स्पेर्लिंग घराण्याची होती. याच्या जन्मानंतर हा जनरल जॉर्ज फोन मान्स्टाइनकडे दत्तक गेला. याचे नाते स्पेर्लिंग व लेविन्स्की तसेच हिंडेनबुर्ख या खानदानी लष्करी घराण्यांशी होते. फ्रान्स-प्रशिया युद्धातील कामगिरीबद्दल मान्स्टाइन व स्पेर्लिंग घराण्यांना राष्ट्रीय मानधन मिळत असल्याने, त्यांना जमीनदारीविना ऐषारामात जगणे शक्य होते.
मान्स्टाइनचे सैनिकी शिक्षण पूर्ण होताच (१९००–१९०६) त्याची तिसऱ्या फूट गार्ड रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. ही रेजिमेंट फील्डमार्शल जनरल अशा श्रेष्ठ सेनापतींची जननी म्हणून विख्यात होती. मान्स्टाइन युद्ध अकादमीत १९१३ मध्ये दाखल झाला. अकादमीत शिक्षण घेत असताना पहिले महायुद्ध सुरू झाले. महायुद्धात त्याने प्रत्यक्ष लढायांत व सैनिकी कार्यालयांत काम केले. एका लढाईत तो भयंकर जखमीही झाला होता. या महायुद्धातील खंदक युद्धतंत्रामधील उणिवा, तसेच तोफखाना व मशीनगन यांच्या माऱ्यामुळे पायदळ व घोडदळ यांची झालेली कत्तल त्याने अनुभवली. परिणामतः नवीन हल्लापद्धती व रणतंत्राची गरज त्याला भासू लागली. महायुद्धानंतर त्याने श्टेटीन, ड्रेझ्डेन व मॅग्डेबर्ग येथील प्रादेशिक सैनिकी कार्यालयांत स्टाफ अधिकाऱ्याचे काम केले (१९२३–२९).
पहिल्या महायुद्धानंतर जर्मन साम्राज्यशाही नष्ट होऊन राज्यक्रांती झाली होती आणि जर्मनीत वायमार लोकशाही राज्यशासन प्रस्थापित झाले होते. व्हर्सायचा तह काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी जर्मनीवर आली होती. रशिया व जर्मनी यांच्यामध्ये गुप्तपणे लष्करी संबंध प्रस्थापित झाले होते. रशियात जर्मनीने लढाऊ विमाने बनविण्याचा एक कारखाना काढण्याचा विचार केला होता. दोस्त राष्ट्रांनी (ब्रिटन व फ्रान्स) जर्मनीवरील शस्त्रास्त्र व सेनाविस्तार-निर्बंध रद्द केले होते. वायमार शासनाविरुद्ध उजवे व डावे (Communist) हे दोन्ही पक्ष प्रचार करीत होते. नाझी पक्षाची चळवळ मूळ धरू लागली होती. अशा परिस्थितीत १९२९ अखेर संरक्षण मंत्रालयात कार्यवाही खात्यामध्ये मान्स्टाइनची नियुक्ती झाली. १९३१ व १९३२ या वर्षी युक्रेन तसेच कॉकेशसमध्ये रशियायी सैन्याच्या लष्करी पाठांचे (Exercise) निरीक्षण मान्स्टाइनने केले. वरिष्ठ रशियायी सेनाधिकाऱ्यांबरोबर त्याच्या भेटीगाठी झाल्या. १९३४ ते १९३८ या कालखंडात चढत्या श्रेणीने स्टाफ ऑफिसरचे काम करीत असताना मान्स्टाइन हा प्रथम जर्मन संरक्षणव्यवस्थेचा प्रमुख फोन फ्रिट्स याचा व नंतर फोन बोक याचा प्रतिनियुक्त होता. १९३३ मध्ये नाझी पक्षाचा हिटलर जर्मनीचा पंतप्रधान (Chancellor) झाला. व्हर्साय तहभंग करून ऱ्हाईन प्रदेश जर्मनीने परत मिळविला. सैन्यविस्तार आणि शस्त्रास्त्रनिर्मितीत जोराने वाढ करण्याचा कार्यक्रम वेगाने सुरू झाला. हिटलरची राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यात मान्स्टाइनचा सक्रिय भाग होता. चिलखती युद्धतंत्रात उपयोगी पडणारा आघाती तोफखाना (Assault Gun) या नवीन गतिमान तंत्राचा पाया मान्स्टाइनने घातला. दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभी जर्मन सेनापती फोन रुन्टश्टेटच्या पोलंडवरील आक्रमणात मान्स्टाइन स्टाफप्रमुख होता. १९४० मधील फ्रान्सवरील आक्रमण योजना मान्स्टाइनने आखली होती. जर्मनीच्या वरिष्ठ सेनापतींना ती जरी पसंत नव्हती, तरी हिटलरला मात्र प्रभावी व अपारंपरिक वाटली. तिच्यामुळे फ्रान्सचा झटपट पाडाव झाला.
रशियावरील आक्रमणात पूर्व आघाडीवर छप्पन्नाव्या चिलखती कोअरचा सेनापती असताना मान्स्टाइनच्या सैन्याने लेनिनग्राडपर्यंत झपाट्याने दौड मारली. या दौडीत रशियायी गाड्यांतून रशियायी सैनिकी पोशाख घातलेले जर्मन व लिथुयायी सैनिक आघाडीवर होते. त्यानंतर तो जर्मन अकराव्या सेनेचा सेनाधिपती झाला. १९४१ व ४२ या सालांमधील क्रिमियातील मान्स्टाइनचे सैनिकी नेतृत्व व युद्धकौशल्य अत्यंत वाखाणण्यासारखे ठरते. त्याच्या सैनिकी जीवनाचा हा अत्युच्च बिंदू गणला जातो. या मोहिमेत त्याच्या अकराव्या सेनेने व फोन क्लाइस्टच्या रणगाडा दलाने एक लक्ष रशियायी सैनिक युद्धबंदी केले. पेरिकॉप, सेव्हॅस्टोपोल व केर्च येथील रशियायी सैन्याने केलेली वेढाबंदी त्याने कौशल्याने फोडली. त्यात रशियाचे ९० हजार युद्धबंदी व ४६० तोफा हस्तगत केल्या. पुढे मान्स्टाइन हा फील्डमार्शल झाला. मान्स्टाइनचे वेढाबंदी फोडण्याचे कौशल्य पाहून, हिटलरने त्याला स्टालिनग्राडमध्ये वेढाबंदी झालेल्या जर्मन सहाव्या सेनेला मुक्त करण्याचे काम दिले; तथापि आवश्यक तितके सेनाबळ त्याला मिळाले नाही. वेढा फोडण्यासाठी त्याने एक नवे रणतंत्र वापरले. ते म्हणजे रणगाडा दले दोन हिश्श्यांमध्ये विभागून (त्यांच्यामध्ये ७० किमी. अंतराची पोकळी ठेवून) आघातलक्ष्य स्टालिनग्राडवर हल्ला करण्याचे ‘चिमटातंत्र’ (Pincer Tactic) होते; तथापि त्या दलांमधील अंतर, बिकट रणक्षेत्र व प्रतिकूल हवामान या नैसर्गिक शत्रूंनी त्याचा प्रयत्न विफल केला. त्याने रणगाडे न विभागता जर सरळ हल्ला केला असता, तर तो यशस्वी झाला असता असे मत आहे. परिणामतः जर्मन रणगाडा दले एकमेकांपासून अलग पडली व त्यांना रशियायी रणगाड्यांनी एकाकी गाठून नष्ट केले. मान्स्टाइनला बडतर्फ करण्यास हिटलर उद्युक्त झाला होता; परंतु मान्स्टाइनची प्रतिचढाई योजना हिटलरला पसंत पडली. फेब्रुवारी-मार्च १९४३ मध्ये या प्रतिचढाईत मान्स्टाइनच्या सैन्याने रशियाच्या व्हॉरोनेश आघाडीत पाचर मारून, खारकॉव्ह व ब्येलगराट ही मोक्याची शहरे काबीज केली. रशियाला ४०,००० सैनिक, ६०० रणगाडे व ५०० तोफा गमवाव्या लागल्या. ही प्रतिचढाई युद्धतंत्राच्या दृष्टीने आदर्श मानली जाते. रशियाचा जनरल स्टाफप्रमुख व्हॅसिलेव्हस्की यानेही मान्स्टाइनच्या प्रतिचढाईमुळे त्याच्या युद्धयोजनेला धक्का मिळाल्याचे कबूल केले; परंतु एकूण युद्धयोजनेवर तिचा व्हावा तितका परिणाम झाला नाही.
युद्धखेळीमुळे कूर्स्क या शहराभोवती रशियायी सैन्याच्या आघाडीवर एक फुगवटा तयार झाला होता. या फुगवट्याला उत्तरेकडून व दक्षिणेकडून (मान्स्टाइन सेना) चिमटीत पकडत. फुगवट्यातील रशियायी सैन्य नष्ट करण्याची ‘कूर्स्क फुगवटा’ (Kursk Bulge) मोहीम हिटलरने आखली. प्रथम रशियाने हल्ला केल्यानंतर जर्मनीने प्रतिहल्ला करावा, असे मान्स्टाइनचे मत होते; परंतु जर्मनीनेच हल्ल्यास आरंभ करावा असे हिटलरने ठरविले. स्टालिनचे मत रशियाने हल्ल्यास आरंभ करावा असे होते. जर्मनीने हल्ला केल्यानंतरच रशियाने प्रत्युत्तर द्यावे असे झूकॉव्हचे मत होते; ते स्टालिनने मानले. रशियाला या हल्ल्याची चाहूल लागल्याने त्याने तेथे ३,३०० रणगाडे, मोर्चे व रणगाडा सापळे जय्यत ठेवले. चढाईत मान्स्टाइनला थोडे फार यश मिळाले; परंतु रशियाच्या संरक्षण संरचनेमुळे जर्मन सैन्याचा दारुण पराभव झाला. कूर्स्कची लढाई ही आतापर्यंत न झालेली अशी प्रचंड व घनघोर लढाई मानली जाते. मानसिक दृष्ट्यादेखील ही प्रचंड लढाई सर्व ज्येष्ठ राजकीय व सैनिकी नेत्यांना भयग्रस्त करून सोडणारी होती.
स्टालिनग्राड व कूर्स्क येथील पराभवामुळे जर्मन युद्धशक्ती दुर्बळ होऊन जर्मनीची अंतिम पराभवाकडे घसरगुंडी सुरू झाली. मान्स्टाइनच्या कर्तृत्वावर हिटलरने कुरघोडी केली. युद्धमंत्री पदावरून हिटलरची ताबडतोब उचलबांगडी करून तेथे ज्येष्ठ, अनुभवी सेनापती आणावा असे त्याला व फोन क्लूगे याला वाटू लागले. त्याप्रमाणे त्याने सप्टेंबर १९४३ व जानेवारी १९४४ मध्ये हिटलरला तसा सल्ला दिला; पण हिटलरने त्याचा सल्ला धुडकावला. मान्स्टाइन हिटलरला नावडता झाला. मान्स्टाइन नाझीपक्षाचा नव्हता. हिटलरची हत्या करणे किंवा त्याच्याविरुद्ध बंड करणे हे मान्स्टाइनच्या नीतीत बसत नव्हते. मान्स्टाइनचा कोणताही सल्ला मानण्यास तर हिटलर तयार नव्हताच, परंतु तो त्याची उघड उघड कुचेष्टा करी. ३० मार्च १९४४ रोजी हिटलरने त्याला सन्मान तलवार देऊन युद्धकार्यातून बडतर्फ केले आणि राखीव सेनापती म्हणून नेमले. त्यानंतर मान्स्टाइनचा प्रभाव कमी होत गेला. न्यूरेंबर्ग खटल्यात तो गोवला गेला नव्हता.
म्यूनिकजवळील इर्खेनहाउझेन या गावी त्याचे निधन झाले.
मान्स्टाइन हा दुसऱ्या महायुद्धातील सर्वश्रेष्ठ भूसेनापतींपैकी एक युद्धकुशल असा युद्धयोजनाकर्ता व सेनानेता होता. ब्रिटिश सेनापती स्लिम व अलेक्झांडर हे त्याच्या तोडीचे होते. रुन्टश्टेट किंवा फोन बोक यांपेक्षा तो श्रेष्ठ होता की नाही याबद्दल मतमतांतरे होती. मात्र गूडेरिआन, होथ व फोन क्लाइस्ट हे त्याच्या तोडीचे नेते होते. त्याने युद्धकलेत काही नवीन भर घातली नाही. इतरांना जो जुगार वाटावा असे साहस, दुय्यम उत्साह आणि सैनिक व दुय्यम यांकरवी अपेक्षेबाहेर काम फत्ते करण्याचे कौशल्य ही त्याच्या यशास काही अंशी कारणीभूत ठरली होती. त्याने चुकाही केल्या होत्या. उदा., शत्रूही शिकत असतो हे तो विसरला होता.
तो हिटलरच्या वंशद्वेषाविरुद्ध होता. राजकारणाला त्याने आपल्या क्षात्रवृत्तीपासून दूर ठेवले होते. त्याचा लॉस्ट व्हिक्टरीज (गमावलेले विजय) हा विश्लेषणात्मक युद्धग्रंथ अतिशय विख्यात आहे. पश्चिम जर्मनीत तसेच जगातही तो एक अतिशय मान्यवर व्यक्ती व युद्धनेता म्हणून ख्यात आहे.
संदर्भ :
- Cooper, Matthew, The German Army : 1933–1945, London, 1978.
- Goerlitz, Walter, History of the German General Staff 1657–1945, New York, 1961.
- Manstein, Erich Von, Lost Victories, London, 1958.
- Seaton, Albert, The Russo-German War : 1941–45, London, 1971.
- Warlimont, Walter, Inside Hitler’s Headquarters, London, 1964.