भारताच्या ईशान्य प्रदेशातील इंफाळ व कोहीमा ही दोनच शहरे दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्याची लक्ष्य (टार्गेट) बनली होती. एप्रिल १९४४ मध्ये जपानी सैन्याने येथील ब्रिटिश भारतीय सैन्यावर तुफानी हल्ला चढवला. ४ एप्रिल ते २२ जून १९४४च्या दरम्यान तिथे तुंबळ युद्ध झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटिश भारतीय सैन्याने जपानी सैन्याचा निर्णायक पराभव केला.

रणनीती आणि त्याची व्याप्ती : भारतीय सैन्यातील लेफ्टनंट जनरल (सर) विल्यम स्लिम यांच्या नेतृत्वाखाली १४ व्या आर्मीच्या हाताखाली ४ कोअर आणि ३३ कोअर या दोन सुसज्ज तुकड्या होत्या. एप्रिल १९४४ मध्ये त्यांतील ४ कोअर तुकडी इंफाळमध्ये तैनात होती. ३३ कोअर तुकडीच्या छावण्या दिमापूर आणि त्यांच्या सभोवतालच्या सखोल प्रदेशात तैनात होत्या.

जपानी १५ व्या आर्मीचा प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागाची हा अत्यंत महत्त्वाकांक्षी सेनापती होता. इंफाळ, कोहीमा, दिमापूरमार्गे भारतात चंचूप्रवेश करून तेथील ब्रिटिश सैन्याचा धुव्वा उडवायचा आणि त्यानंतर अधिक फौज मागवून दिल्लीच्या दिशेने आक्रमण करायचे आणि ब्रिटिश सत्ता उलथवून टाकायची अशी त्याची रणनीती होती. ३१ जपानी डिव्हिजन आडवाटांनी तडक कोहीमाच्या दिशेने आगेकूच करील आणि कोहीमामध्ये तैनात असलेल्या तुटपुंज्या ब्रिटिश सैन्याला नमवून कोहीमावर कब्जा करील. कोहीमा हातात आल्यावर इंफाळमधील ब्रिटिश सैन्याचा एकमेव रसदमार्ग तोडून त्यांची उपासमार करता येईल, कोहीमा आणि इंफाळमधील कारवाई यशस्वी झाल्यानंतर साहजिकच दिमापूरकडे चालून जाता येईल आणि नंतर पुढच्या योजनेला हात घालू, असा मुटागाचीच्या कारवाईचा एकूण आराखडा होता.

पानी हल्ला : १ एप्रिलला जपानी ३१ डिव्हिजनचे आघाडीचे दस्ते कोहीमाच्या पूर्वेकडील जसामीपाशी पोचले. तिथे आसाम रायफल्सची एक प्लॅटून तैनात होती. तिने शत्रूच्या आगमनाची बातमी कळवली आणि तिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु शत्रूच्या संख्याबळापुढे तिने माघार घेतली. जनरल स्लिम यांना ही बातमी समजताच ब्रह्मदेशातील आराकानमधील भारतीय ५ इन्फन्ट्री डिव्हिजनला विमानाने दिमापूरला हलवण्याचे निर्देश देण्यात आले आणि तिची १६१ इन्फन्ट्री ब्रिगेड तातडीने कोहीमाच्या दिशेने रवाना करण्यात आली; परंतु तोपर्यंत ३ एप्रिल उलटली होती. १६१ इन्फन्ट्रीच्या १ कँट रेजिमेंट आणि ४/७ राजपूत बटालियन यांचे थोडे सैनिकच कोहीमाच्या परिसराजवळ पोचू शकले; परंतु जपान्यांच्या आडकाठीमुळे त्याही तुकड्या कोहीमा रिजपर्यंत पोचू शकल्या नाहीत.

कोहीमाच्या छावणीची तटबंदी उद्ध्वस्त करायला जपान्यांनी ६ एप्रिलला सुरुवात केली. सर्व मोर्चांवर तोफगोळ्यांचा भडीमार चालू झाला. क्रमाक्रमाने आय. जी. एच. स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, पिपल हे मोर्चे भारतीय सैन्याच्या हातातून गेले. परंतु प्रत्येक ठिकाणी या मोर्चावरील तुकड्यांनी खडतर सामना केला. १७-१८ एप्रिलच्या रात्री डी. सी. बंगल्याच्या आवारातील मोर्चावर हल्ला चढवून जपान्यांनी तो ताब्यात घेतला; परंतु शक्य असूनही त्याच रात्री गॅरीसन टेकडीवर हल्ला केला नाही. सुदैवाने १८ एप्रिलला १६१ इन्फन्ट्री ब्रिगेड कोहीमाच्या अगदी निकट येऊन पोचली आणि १८ दिवस अविरत लढणाऱ्या ब्रिटिश सैन्याला आशेचा किरण दिसू लागला. जपान्यांचे गॅरीसन टेकडीवरील हल्ले अधिकाधिक प्रखर होऊ लागले. जपान्यांचा कुकी पिकेटवरील मोर्चा तिथून केवळ ५० गजांवर होता. परंतु भारतीय सैन्याने गॅरीसन टेकडी हातची जाऊ दिली नाही. उलट, एका घणाघाती तडाख्यात त्यांनी डी. सी. बंगल्याच्या वरील भागात असलेल्या क्लब हाउसचा ताबा घेतला. ब्रिटिश भारतीय सैन्याचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील हा संघर्ष खरोखरच लक्षणीय होता.

ब्रिटिश भारतीय सैन्याचा प्रतिहल्ला : १८ एप्रिलपर्यंत जपान्यांनी कोहीमा रिजवर चार बटालियनचे मोर्चे बांधले होते. कोहीमाच्या उत्तरेला असलेल्या नागा खेड्याच्या परिसरात आणखी चार बटालियनचे मोर्चे होते. म्हणजे जपानी ३१ डिव्हीजनने गॅरिसन टेकडीला चारही बाजूंनी घेरले होते. परंतु ब्रिटिश फौजांची कोंडी करताकरता त्यांचीच कोंडी झाली होती. त्यांच्याकडे रसदमार्गच उपलब्ध नव्हता आणि बरोबर आणलेला शिधाही संपत चालला होता. त्याची भरपाई करणे अशक्य होते. मुटागाचीची घोडचूक त्याला आता भोवणार होती. उपासमारीने जपानी सैन्य तडफडत होते.

जनरल स्लिम यांनी शत्रूची ही कुचंबणा अचूक हेरली आणि त्याच्यावर हल्ला चढवायची तयारी केली. याकरिता २ ब्रिटिश इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनला निवडण्यात आले आणि कोहीमाच्या सान्निध्यात वेगाने त्यांची जमवाजमव सुरू झाली. जपान्यांच्या नागा खेडे आणि कोहीमा रिजवरील बाहेरच्या मोर्चावर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून हल्ले चालू झाले. प्रगती अत्यंत धिमी होती. पावसालाही सुरुवात झाली होती. ४ मे या दिवशी नागा खेड्याच्या पूर्वेकडील भागात पाय रोवण्यात ब्रिटिश भारतीय सैन्य यशस्वी झाले. त्याच दिवशी जी. पी. टी. रिजचा एक कोपरा ब्रिटिश ४ ब्रिगेडच्या हातात आला. त्यानंतरचे हल्ले इतके तीव्र व संघर्षपूर्ण होते की, ब्रिटिश ४ ब्रिगेडचे दोन कमांडर एकामागून एक मारले गेले. शेवटी ११ मे रोजी जेल हिल, कुकी पिकेट आणि एफ. एस. डी. मोर्चा ३३ ब्रिटिश भारतीय इन्फन्ट्री डिव्हिजनने प्रखर विरोधानंतर जिंकून घेतले. १३ मे रोजी एक रणगाडा कोहीमाला पोचला. त्याने जपान्यांच्या टेनिस कोर्टवरील मोर्चावर हल्ला चढवला आणि तो उद्ध्वस्त केला. हा कोहीमा कडेपठारावरील शेवटचा बालेकिल्ला होता आणि त्या दिवशी संपूर्ण कोहीमा कडेपठार ब्रिटिश भारतीय सैन्याच्या हाती आले होते.

परंतु जपानी सैन्य अजूनही उत्तरेला नागा खेडे आणि अरादुरा स्परवरील मोर्चे लढवीत होते. या शेवटच्या टप्प्यातील कारवाईसाठी ११४ भारतीय इन्फन्ट्री ब्रिगेड आणि २६८ भारतीय इन्फन्ट्री ब्रिगेडने पदार्पण केले आणि पुढील दहा दिवस कोहीमाच्या उत्तरेतील नागा खेडे आणि अरादुरा स्परवरील जपान्यांच्या तुकड्यांचा एकामागून एक धुव्वा उडवला. २५ मे रोजी जपानी ३१ डिव्हिजनचा कमांडर लेफ्टनंट जनरल साटो यांनी मुटागाचीला संदेश पाठविला की, उरल्यासुरल्या सैन्यासह तो माघार घेतो आहे आणि आल्या मार्गाने त्याचे सैन्य परतले. याचबरोबर इंफाळवर चालून आलेल्या जपानी सैन्यानेही आपले बस्तान गुंडाळले आणि तेही चिंडविन नदीपार चालते झाले.

ब्रिटनच्या जगप्रसिद्ध नॅशनल आर्मी म्युझियमने आतापर्यंतच्या ब्रिटनने लढलेल्या लढायांत सर्वोत्तम लढाई कोणती हे ठरवण्यासाठी एका स्पर्धा-चर्चेचे आयोजन केले होते. त्यात ‘डी डे’चे नॉर्मंडी लँडिंग, वॉटर्लूची लढाई, बॅटल ऑफ ब्रिटन या सर्वांना मागे टाकून कोहीमाच्या लढाईने प्रथमस्थानी बाजी मारली होती.

 

 

संदर्भ :

  • Shermer, David R.; Heiferman, Ronald; Mayer, S. L. Wars of 20th Century, London, 1975.
  • Slim, William, Defeat into Victory, London, 1957.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा