चित्रबलाक उंच व सडपातळ असून त्याची उंची सु.१ मी. आणि वजन २-३.५ किग्रॅ. असते. पाठीवरील पिसे पांढरी असून पंख आणि छातीवरील पिसांवर हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात. पाठीवरच्या पिसांच्या टोकांकडील गुलाबी रंगामुळे या पक्षांना त्यांचे नाव मिळाले आहे. त्यांच्या पायांवर पिवळ्या व लाल रंगाच्या फिकट छटा असतात. चेहरा मेणासारखा पिवळया रंगाचा असून त्यावर पिसे नसतात. डोक्याचा थोडासाच भाग पिसांनी झाकलेला असून त्यांचा रंग फिकट केशरी असतो. चोच लांब व रंगाने पिवळी असून टोकाला बाक असतो. मादी नरापेक्षा किंचित लहान असते.
मासे हे चित्रबलाकांचे प्रमुख अन्न असले, तरी ते बऱ्याचदा बेडूक, गोगलगाय इ. खातात. नदीत किंवा जलाशयाच्या किनाऱ्याला उथळ पाण्यात ते अन्न शोधताना दिसतात. मासे पकडताना ते डोके पाण्यात बुडवून चोच अर्धवट उघडी ठेवतात, डोके हलवत राहतात आणि चोचीला लागलेले मासे झटकन पकडतात. तसेच पाण्यात चालताना ते अधूनमधून पायाने पाणी हलवून तळाशी असलेले मासे पृष्ठभागावर आले की पकडतात. राहण्याच्या ठिकाणी बऱ्याचदा ते कुबड काढून तासनतास उभे राहिलेले दिसतात.
पावसाळा संपत आला की चित्रबलाकांचा विणीचा हंगाम सुरू होतो. या हंगामात त्यांच्या शरीराचे रंग अधिकच गडद व उठून दिसतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नर पंख साफ करतात व उड्डाणे करतात. समागमानंतर दोघे मिळून घरटे बांधतात. शांत जागी, बहुधा झाडांच्या उंच टोकावर त्यांची घरटी असतात. मादी ३—५ अंडी घालते. महिनाभरात पिले अंड्यांतून बाहेर येतात. पिलांचे संगोपन नर-मादी दोघे मिळून करतात. पिलांचा रंग पांढरा असून चोच राखाडी व चेहरा काळसर असतो. साधारणपणे तीन वर्षांनंतर पिलाचे प्रौढ चित्रबलाकात रूपांतर होते. विणीच्या हंगामात अनेक चित्रबलाक, अन्य पाणपक्ष्यांसमवेत, झाडांवर वसाहतीने राहतात. त्यानंतर मात्र विखुरतात.
वाघ, चित्ते, रानमांजरे, तरस आणि मगरी हे या पक्ष्याचे मुख्य शत्रू आहेत. या प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच त्यांची संख्या टिकून राहण्यासाठी चित्रबलांकाना विशेष संरक्षण देण्यात आले आहे.