डायनोसॉर म्हणजे विलुप्त झालेले प्रचंड आकाराचे सरडे. त्यांचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायॉप्सिडा उपवर्गाच्या पुरासरडे (आर्कोसॉरिया) या महागणात केला जातो. २३ कोटी वर्षांपूर्वीपासून ते ६.६ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मध्यजीव महाकल्पात डायनोसॉर भूचरांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. प्रचंड आकाराचे सरडे या अर्थाने डायनोसॉर हा ग्रीक भाषेतील शब्द आहे.

डायनोसॉराचे पहिले जीवाश्म १८१५ सालाच्या सुमाराला काही दात आणि हाडांच्या स्वरूपात विल्यम बकलँड (ऑक्सफर्ड, इंग्लंड) याला आढळून आले. त्यानंतर १८२२ सालाच्या सुमारास गिडीऑन मेंटॉल (ससेक्स, इंग्लंड) याला डायनोसॉराच्या दातांचे आणि हाडांचे आणखी जीवाश्म सापडले. त्यानंतर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी डायनोसॉरांचे जीवाश्म सापडले असून भारतात कोलकाता (पश्चिम बंगाल), जबलपूर (मध्य प्रदेश), राओली व बालासिनोर (गुजरात), पिंजदुरा (महाराष्ट्र) या ठिकाणी डायनोसॉरांचे जीवाश्म सापडले आहेत.

डायनोसॉरांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, त्यांचे स्वरूप आणि आकार यांत भिन्नता दिसून आली आहे. तसेच विविध अधिवासासाठी त्यांच्यात अनुकूलन घडून आल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या वजनात खूप फरक होता. उदा. काही डायनोसॉरांचे वजन २-३ किग्रॅ. होते तर काहींचे सु. ७३,००० किग्रॅ. होते. बहुतेक डायनोसॉर शाकाहारी होते; परंतु काही मांसाहारी होते. डायनोसॉरांना चार पाय होते; परंतु काही मांसाहारी डायनोसॉर मागील दोन पायांवर उभे राहत. त्यांच्या शरीरक्रिया, तसेच शीतरक्त आणि बाह्यतापी अशा त्यांच्या गुणधर्मांवरून ते सरीसृप असावेत असे समजले गेले आणि त्यानुसार डायनोसॉरांचे वर्गीकरण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सरीसृप वर्गात केले गेले. अजूनही अशाही मताचा एक गट आहे की, पक्षी आणि सस्तन प्राण्यांप्रमाणे डायनोसॉर हे उष्ण रक्ताचे आणि चयापचयाचा वेग उच्च असलेले प्राणी असावेत. त्यांची उभे राहण्याची आणि चालण्याची पद्धत, सस्तन प्राण्यांप्रमाणे हाडांची सूक्ष्मस्तरीय संरचना, दातांची विशिष्ट रचना आणि हाडांच्या रचनेवरून ते सतत क्रियाशील असावेत असा तर्क काढला जातो. मात्र, हा तर्क अजून अंतिम मानला जात नाही. फ्रान्स आणि मंगोलियामध्ये जीवाश्माच्या स्वरूपात डायनोसॉरांची अंडी सापडली आहेत. तसेच ब्राझील, अमेरिका, पोर्तुगाल येथेही डायनोसॉरांच्या अंड्यांची कवचे सापडली आहेत. त्यावरून डायनोसॉर हे अंडज असावेत, हे निश्चित झाले आहे.

आर्कोसॉरिया अधिगणाचे सॉरिशिया आणि ऑर्निथिशिया असे दोन गण आहेत. डायनोसॉरांच्या श्रोणिभागातील (नितंब) तीन हाडांची रचना गट पाडण्यासाठी निर्णायक ठरली आहे. सॉरिशियाचा अर्थ सरड्याची श्रोणी असा आहे; या डायनोसॉरांच्या श्रोणीची हाडे, सरडे आणि सुसर यांच्या हाडांप्रमाणे, त्रिअरी स्वरूपात असतात. ऑर्निथिशियाचा अर्थ पक्ष्यांची श्रोणी असा असून या डायनोसॉरांची श्रोणी सामान्यपणे आयताकार किंवा चतुररी असते.

सॉरिशिया : या गणात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या डायनोसॉरांचा समावेश होतो; (१) मांसाहारी (थेरोपोडा उपगण) आणि (२) धिप्पाड, शाकाहारी व त्यांचे पूर्वज (सॉरोपोडोमॉर्फा उपगण). सॉरिशिया गटात श्रोणीच्या रचनेखेरीज, या दोन्ही उपगणांच्या प्राण्यांमध्ये काही शारीरिक लक्षणे समान होती.

थेरोपोडा उपगण : सर्व थेरोपोडा डायनोसॉर द्विपाद होते. त्यांचे मागचे पाय मजबूत होते आणि पावले पक्ष्यांसारखी होती. काहींमध्ये मागच्या पायांच्या प्रमाणावरून असे लक्षात येते की, ते वेगाने पळत असावेत. त्यांच्या पुढच्या पायांवर टोकदार व वाकड्या नख्या होत्या व त्यांद्वारे ते भक्ष्य पकडीत. सर्व थेरोपोडा डायनोसॉरांना लांब शेपूट होते व त्यांचा वापर ते शरीराचा तोल सांभाळण्यासाठी करीत. डोके शरीराला अनुसरून मोठे होते. जबड्यात अनेक टोकदार पात्यांसारखे दात असून त्यांच्या कडा दंतुर होत्या. यावरून ते मांसाहारी असावेत. थेरोपोडा डायनोसॉरांच्या सेरॅटोसॉरिया आणि टेटॅन्युरी या दोन मुख्य शाखा होत्या. त्यांतील टेटॅन्युरीपासून अ‍ॅव्हेथेरोपोडा ही शाखा निर्माण झाली. त्यापासून सील्युरोसॉरिया आणि कार्नोसॉरिया या दोन उपशाखा उद्भवल्या. शहामृग डायनोसॉर (सील्युरोसॉरिया) यांना दंतहीन जबडे होते व ते कदाचित पक्ष्यांसारख्या चोचीने आच्छादले असावेत. यावरून असा निष्कर्ष काढला जातो की, सर्व थेरोपोडा मांसाहारी नव्हते. कार्नोसॉरिया प्रकारचे डायनोसॉर लांबट डोक्याचे आणि आखूड मानेचे होते. उदा., टायरॅनोसॉरस हे डायनोसॉर हिंस्र व मांसाहारी होते. त्यांच्या कवटीची लांबी १.५ मी., शरीराची लांबी १६ मी. आणि उंची ६.५ मी. होती. शेपूट लांब व जाड होती. थेरोपोडा डायनोसॉर क्रिटेशस कल्पापर्यंत (६.६ कोटी वर्षांपूर्वी) जिवंत होते.

सॉरोपोडोमॉर्फा उपगण :या उपगणात प्रोसॉरोपोडा आणि सॉरोपोडा हे दोन प्रकार आहेत. प्रोसॉरोपोडा डायनोसॉर ट्रायासिक कल्पाच्या (२३ कोटी वर्षांपूर्वी) शेवटापर्यंत होते आणि अंटाक्र्टिका व ऑॅस्ट्रेलिया वगळता ते सर्वत्र आढळत. कवटी आणि दातांची रचना सोडल्यास ते दिसायला सॉरोपोडाहून वेगळे होते. प्रोसॉरोपोडा आकाराने लहान होते. त्यांना चार पाय असले तरी दोन पायांवर उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात होती. ते सर्व शाकाहारी होते. प्रोसॉरोपोडाचे उदाहरण म्हणजे प्लॅटिओसॉरस. त्यांचे वजन १००-१,५०० किग्रॅ. व शरीराची लांबी ६ मी. असून दात चपटे व बोथट होते.

सॉरोपोडा गटात आकाराने सर्वांत मोठ्या डायनोसॉरांचा समावेश होतो. ते उभयचर असावेत. त्यांच्यापैकी लहान डायनोसॉर हे हत्तीहून मोठे होते. सर्व सॉरोपोडांच्या शरीरामध्ये समान लक्षणे होती. मोठे व अजस्र शरीर; मजबूत व खांबाप्रमाणे पाय; लांब व जाड शेपूट आणि लांब व मजबूत मान आणि त्यावर लहान डोके. त्यांच्या पावलांवरून ते जमिनीवर वावरत असत आणि लांब मानेने ते झाडाच्या वरून पाहत असावेत, असे मानले जाते. उदा. अ‍ॅपेटोसॉरस डायनोसॉर हे शरीराने सडपातळ असून शरीराची लांबी सु. २९ मी. व वजन ३५००० किग्रॅ. होते. हे प्राणी दलदलीच्या जागी व सरोवरात राहात असत.

ऑर्निथिशिया : या गणात पाच उपगण आहेत : (१) ऑर्निथोपोडा, (२) स्टेगोसॉरिया, (३) अँकिलोसॉरिया, (४) सेराटॉप्सिया आणि (५) पॅचिसेफॅलोसॉरिया.

ऑर्निथोपोडा उपगण : या उपगणातील डायनोसॉर सर्वांत यशस्वी मानले जातात. ते क्रिटेशस कालखंडापर्यंत अस्तित्वात होते आणि शाकाहारींमध्ये त्यांची संख्या सर्वाधिक होती. ते द्विपाद होते; परंतु ते चार पायांवर उभे राहत किंवा पुढे सरकत. त्यांच्या दातांची रचना विशिष्ट असून ते वनस्पती चावून खात. तोंडात लहान-लहान शेकडो दातांच्या रचनेवरून असे लक्षात आले की, ते एका वेळी खूप अन्न खात असावेत. उदा.,कॅम्प्टोसॉरस. यांच्या शरीराची लांबी सु. ४ मी. होती.

स्टेगोसॉरिया (पट्टीधारी) उपगण : यातील डायनोसॉर इतर ऑर्निथिशियन डायनोसॉरप्रमाणे शाकाहारी होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मानेपासून शेपटापर्यंत भरीव हाडे आणि मांसल व त्रिकोणी चकत्यांच्या रांगा होत्या. हे पट्टे शरीराचे तापमान नियंत्रित करीत असावेत असा अंदाज आहे. स्टेगोसॉरची लांबी सु. ७ मी. होती. डोके लहान असून ते जमिनीलगत होते.

डायनोसॉरांचे काही प्रकार

अँकिलोसॉरिया उपगण : या डायनोसॉरांच्या शरीरावर ढालीप्रमाणे पट्ट आणि तीक्ष्ण काटे होते. ते प्रामुख्याने शाकाहारी होते. उदा., अँकिलोसॉर. ते उंचीने कमी, रुंदीने जाड असून त्यांचे पाय आखूड व खांबाप्रमाणे होते.

सेराटॉप्सिया उपगण : यातील डायनोसॉर शेवटी उदयाला आले, असे मानतात. ते सामान्यपणे वासरांच्या आकाराचे होते. त्यांच्या दातांची रचना वनस्पतींचे चर्वण करण्यापेक्षा लचके तोडता येईल, अशी होती. उदा., ट्रायसेराटॉप्स. हे चतुष्पाद असून त्यांची लांबी ७-१० मी. होती. डोळ्यांजवळ दोन मोठी शिंगे आणि नाकाजवळ एक मोठे शिंग होते. म्हणून यांना ‘तीन शिंगी’ हे नाव पडले.

पॅचिसेफॅलोसॉरिया उपगण : यातील डायनोसॉर आकाराने लहान होते. त्यांच्या कवटीचा भाग जाड असून डोके घुमटासारखे होते. उदा., पॅचिसेफॅलोसॉरस. यांची कवटी २० सेंमी. लांब असून नाकावर व डोक्याच्या मागच्या बाजूला खिळ्यांसारखे भासणारे काटे आणि उंचवटे होते.

डायनोसॉरांच्या १४ कोटी वर्षांच्या कारकीर्दीत त्यांचे नवीन प्रकार उत्क्रांत झाले आणि जुने नष्ट झाले. सर्वच्या सर्व डायनोसॉर एकदम विलुप्त झाले, असे घडले नाही; परंतु शेवटचे डायनोसॉर क्रिटेशस कल्पात लयाला गेले. वैश्विक किरणांतील वाढ, हवामानातील बदल, ज्वालामुखी किंवा भूखंड अपवहन अशी वेगवेगळी कारणे त्यामागे असावीत. कारणे काहीही असली तरी डायनोसॉर आता विलुप्त झाले आहेत. काही पुराजीववैज्ञानिकांच्या मते पक्ष्यांची उत्क्रांती जुरासिक कल्पात डायनोसॉरांच्या एका शाखेपासून झाली आहे. त्यांनी आधुनिक तंत्रांच्या साहाय्याने पक्ष्यांचा उत्क्रांतिवृक्ष निश्चित केला आहे. थेरोपोडा उपगणाच्या अ‍ॅव्हेथेरोपोडा या शाखेपासून उदय झालेल्या सील्युरोसॉरिया या शाखेपासून आजच्या पक्ष्यांचे खरे पूर्वज उत्क्रांत झाले आहेत. यावरून पक्ष्यांच्या रूपाने डायनोसॉर अजूनही अस्तित्वात आहेत, असे म्हणता येईल.