सर्वांच्या परिचयाचा एक पक्षी. पॅसरिडी कुलात चिमणीचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस आहे. पॅसर, पॅट्रोनिया, कार्पोस्पायझामाँटिफ्रिगिला अशा पॅसरिडी कुलाच्या चार प्रजाती मानल्या गेल्या आहेत. त्यांपैकी पॅसर प्रजातीत सर्वाधिक जाती आहेत. जगभर सर्वत्र हा पक्षी आढळतो. भारतातही तो आढळतो. मात्र दाट वनांत तो दिसत नाही.
बुलबुलपेक्षा हा पक्षी किंचित लहान असून चिमणी (मादी) आणि चिमणा (नर) आकाराने सारखे असतात.शरीराची लांबी १० – १५ सेंमी. असते. नर – मादीच्या रंगातील फरकामुळे ते वेगवेगळे ओळखता येतात. मादीचा रंग फिक्कट असून नर रंगाने अधिक गडद असतो. नराच्या डोक्याचा माथा आणि मागची बाजू भुऱ्या रंगाची असते. मानेचा मागचा भाग तांबूस काळसर व दोन्ही कडा पांढऱ्या असतात. हनुवटी, गळा व छातीचा अर्धा भाग काळा असून चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक काळसर पट्टा जातो. पाठ व पंख तांबूस काळसर असून पंखांवर दोन आडवे पांढरे पट्टे असतात. खालचा भाग पांढरा असतो. शेपूट गडद तपकिरी असते.
च‍िमणी (पॅसर डोमेस्टिकस)

मादीच्या डोळ्याच्या वर तांबूस-पांढरी रेघ असते. पाठ मातकट तपकिरी असून त्यावर काळ्या व तांबूस रेघोटया असतात. पंख व शेपूट काळसर तपकिरी असते; मादीच्या डोळ्याच्या वर तांबूस-पांढरी रेघ असते. पाठ मातकट तपकिरी असून त्यावर काळ्या व तांबूस रेघोट्या असतात. पंख व शेपूट काळसर तपकिरी असते; पंखांवर दोन आडवे पट्टे असतात. चोच आखूड, जाड आणि मजबूत असून चोचीपासून डोक्याच्या मागील भागापर्यंत काळ्या रंगाचे दोन पट्टे असतात. डोळे तपकिरी असतात.

या पक्ष्याचे पंख मजबूत नसल्यामुळे तो दूर अंतर उडू शकत नाही. कावळा, कबुतराप्रमाणे एकेक पाऊल टाकत न चालता दोन्ही पायांचा एकावेळी वापर करून टुणटुण उडया मारीत पुढे सरकतो.

चिमणी हा सर्वभक्षी पक्षी आहे. त्याचे वास्तव्य मानवी वस्तीत असल्यामुळे वाळत घातलेले धान्य, उभ्या पिकांवरचे धान्य, घरात साठविलेले व उघडे राहिलेले खादयपदार्थ यांवर तो उपजिविका करतो. तसेच सुरवंट, अळ्या, कीटक व कोळी यांचाही समावेश त्याच्या अन्नात होतो. पायाच्या बोटांच्या नख्यांनी जमीन व पालापाचोळा खरवडून तो खादय मिळवितो.

कावळ्याप्रमाणे चिमणी मानवी वस्तीत येऊन राहिलेली आहे. त्यांची संख्या अन्नाच्या पुरवठयावर अवलंबून असते. चिमणीची वीण वर्षातून किमान तीनदा होते. सोईस्कर व सुरक्षित, वळचणीच्या जागी त्या घरटी बांधतात. तसबिरींच्या मागील जागा, झुंबरे, भिंतीतील भोके व वापरात नसलेले कोनाडे अशा ठिकाणी कापूस, चिंध्या, गवत, काथ्या, लोकर व कागद असे साहित्य वापरून नर आणि मादी घरटे बांधतात. घरट्यांचा आकार वाडग्यासारखा असतो. घरटे तयार झाल्यावर मादी तीन – पाच अंडी घालते; अंडी पांढरी असून त्यात हिरव्या रंगाची छटा असते आणि त्यांवर तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविण्याचे, पिलांना चारा भरविण्याचे काम मादी व नर आळीपाळीने करतात आणि पिलांना सुरवंट, अळ्या आणून खायला घालतात. पिले मोठी झाल्यावर नर-मादी त्यांना उडण्याचे शिक्षण देतात.

चिमणी समाजप्रिय पक्षी आहे. त्यांचे लहान थवे मातीत लोळताना किंवा साचलेल्या पाण्यात आंघोळ करताना दिसतात. अन्न शोधण्यासाठी ते थव्याने फिरतात आणि खादय मिळविण्यासाठी इतर पक्ष्यांच्या थव्यांत घुसतात. रात्री झोपण्यापूर्वी तिन्हीसांजेला पुष्कळ चिमण्या एखादया झाडावर किंवा दाट झुडपांवर जमतात व सतत खूप कोलाहल करतात. जसजसा अंधार वाढत जातो तसतसा त्यांचा गोंगाट कमी कमी होत जातो. अखेरीस चांगला अंधार पडल्यावर त्या स्तब्ध होतात व झोपी जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा