पृथ्वीवरील पर्यावरण बदलत आहे आणि या बदलांमुळे अन्न-धान्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यामुळे मानवजातीची उपासमार होण्याचीही भीती आहे. असे होऊ नये या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहमतीने उत्तर युरोपमधील नॉर्वे या देशाच्या ध्रुवप्रदेशातील स्पिट्सबर्गेन  या सध्याच्या समुद्रसपाटीपासून १३० मीटर उंचीवर, कायम बर्फाच्छादित असलेल्या बेटावरील डोंगराखाली खोलवर एक प्रचंड व अतिसुरक्षित तळघर बांधण्यात आले आहे.  ही जागा उत्तर ध्रुवापासून केवळ १३०० किलोमीटर दूर आहे. या तळघराच्या निरनिराळ्या कप्प्यात पृथ्वीवरच्या सर्व देशांतील अति-महत्त्वाच्या अन्नधान्यांचे लाखो प्रकारचे बियाणे साठविलेले आहे. या तळघराला स्वालबार जागतिक बियाणे पेढी (Swalbard Global Seed Vault)   असे नाव आहे. पुराणातील ‘नोहाज आर्क’ प्रमाणेच या तळघराचे कार्य असल्याने याला “आधुनिक नोहाज आर्क’ म्हटले जाते.

या प्रकल्पाची सुरुवात जून २००६ मध्ये झाली आणि  २००८ मध्ये सर्व महत्त्वाच्या सुमारे तीस लाख बियाणांचे नमुने साठविले गेल्यानंतर या आर्कचे अधिकृत उद्घाटन झाले. त्याच वेळी ही आधुनिक ‘आर्क’ संकट आल्याशिवाय कधीही न उघडण्यासाठी सीलबंद करण्यात आली. तापमान वाढ, अणुयुद्ध अशा संकटापासून महत्त्वाची बियाणे संरक्षित राहावी या उद्देशाने ही उणे १८ डिग्री से. या तापमानात ठेवली जाते. या २ कोटी बियाणे साठविण्याची क्षमता असलेल्या पेढीमध्ये ८,९०,८८६ बियाणे नमुने साठविलेले आहेत.

अलीकडेच, २०१६ मध्ये, वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन उत्तर ध्रुवाच्या परिसरातील काही बर्फ वितळल्यामुळे पाणी या तळघराकडे जाणाऱ्या बोगद्यात शिरले. परंतु तळघरातील सर्व कप्पे सुरक्षित राहिले आणि साठविलेल्या बियाण्यांना कोणतीही हानी झालेली नाही असे दिसून आले. बियाणे साठविण्याच्या  कल्पनेस पाठबळ मिळत असले तरीही सुरक्षा वाढविण्याचे मार्ग शोधले जात आहेत.

भारतातही याच धर्तीवर लडाखमधील चांग – ला  या १७,५०० फूट (सु.६००० मीटर)  उंचीच्या  डोंगरमाथ्यावर  बियाणे  पेढी  उभारलेली  असून  त्यामध्ये  ५,००० बियाणे  नमुने – ४० डिग्री से. तापमानात  साठविलेले  आहेत.  या पेढीमध्ये  ५०,००० बियाणे नमुने साठविण्याची क्षमता असून स्वालबार पेढीला पूरक म्हणून  या  प्रकल्पाकडे  पाहिले  जाते.

समीक्षक शरद चाफेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा