शेर (युफोर्बिया टिरुकुलाय)

सपुष्प वनस्पतींच्या अनेक जातींमध्ये असलेला दाट आणि दुधाळ किंवा पाण्यासारखा रंगहीन द्रव पदार्थ. वनस्पतींपासून स्रवणारा हा चिकट स्राव जटिल व कलिली स्वरूपाचा असतो. त्यात प्रथिने, अल्कलॉइडे, स्टार्च, शर्करा, तेले, टॅनीन, राळ आणि वेगवेगळ्या डिकांचे प्रकार मिसळलेले असतात. मुख्यत: अस्क्लेपिएडेसी (रुई) कुलातील वनस्पतींच्या पेशींमध्ये हा चीक तयार होतो. तसेच ॲस्टरेसी, यूफोर्बिएसी, ॲपोसायनेसी, सॅपोटेसी, पॅपॅव्हरेसी आणि मोरेसी कुलांतील वनस्पतींपासूनही हा चीक मिळतो. बहुतेक वनस्पतींमध्ये हा चीक पांढऱ्या रंगाचा असतो; परंतु काही वनस्पतींमध्ये तो रंगहीन, पिवळा किंवा शेंदरी असतो. सामान्यपणे वनस्पतींना जखमा झाल्यावर चीक बाहेर पडतो. कीटकांपासून संरक्षण व्हावे यासाठी वनस्पतींमध्ये असलेली ही एक सुरक्षा यंत्रणा आहे. हवेच्या संपर्कात आल्यावर हा चीक वाळतो. चीक देणाऱ्या वनस्पतींना ‘आक्षीरी वनस्पती’ (लॅटिसीफर) असेही म्हणतात. रुई, शेर, अफू, चिकल, ग्वायूळ, गटापर्चा व रबर इत्यादी वनस्पतींपासून असा चीक मिळतो. उष्ण प्रदेशातील सु.१४% सपुष्प वनस्पती चीक निर्माण करतात, तर समशीतोष्ण प्रदेशातील सु.६% वनस्पतीत चीक आढळतो.

चीक गोळा करण्याची पद्धत

सुमारे ४० कुलांतील वनस्पतींच्या २०,००० जातींपासून हा चीक मिळतो. यात एकदलिकित आणि व्दिदलिकित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती आढळतात. या वनस्पतींमध्ये चिकाची निर्मिती, साठवण व वहन करण्यासाठी चिकाळ पेशी आणि चिकाळ वाहिन्या असतात. काही वनस्पतींमध्ये सर्व भागांत चिकाळ पेशी पसरलेल्या असतात. या चिकाळ पेशी स्वतंत्र असून त्या एकमेकांना जोडलेल्या नसतात. उदा., रुई, एरंड, वड व करवीर (ॲपोसायनेसी) या कुलांतील वनस्पती. काही वनस्पतींमध्ये चिकाळ पेशी एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यांच्या पेशीभित्तिका नष्ट झाल्यामुळे त्यांपासून ‘चिकाळ वाहिन्या’ तयार होतात. अशी संरचना अफू, पपई, रबर आणि चिकोरी या कुलांतील वनस्पतींमध्ये दिसून येते.

चिकाळ वनस्पतींपासून मिळणाऱ्या चिकापासून वेगवेगळ्या वस्तू बनविल्या जातात. उदा., रबराच्या झाडापासून मिळणाऱ्या चिकापासून रबर आणि गटापर्चापासून विदयुत तारांवरील वेष्टणे तयार करतात. तसेच अल्कली व आम्ल पदार्थ ठेवण्यासाठी लागणारी भांडी, पिपे, यंत्रांसाठी लागणारे पट्टे, बुटांचे तळवे तसेच वैदयक चिकित्सेत वापरले जाणारे बँडेज यांच्या निर्मितीसाठी गटापर्चाचा चीक वापरतात. चिकलच्या स्रावापासून च्युईंग गम तयार केले जातात. चिकापासून हातमोजे, गर्भनिरोधके, सुषिरी (कॅथेटर) इत्यादी तयार करतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा