(ॲनेलिडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांचे शरीर अनेक वलयांनी म्हणजेच खंडांनी बनलेले असते. शरीर लांबट असून त्यांच्या शरीरावरील खंड बाहेरून ठळकपणे दिसतात. खंडीभवन हे या प्राण्यांचे प्रमुख लक्षण असून खंडीभवन बाह्य व आंतरिक असते. शरीराचे प्रामुख्याने तीन भाग दिसतात; (१) अग्रशीर्ष, (२) कायखंड आणि (३) पुच्छ किंवा पार्श्व. काही प्राण्यांमध्ये शरीरावर प्रमेखला दिसून येते. हे प्राणी त्रिस्तरीय असून त्यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते. शरीरात देहगुहा (शरीरातील पोकळी) असून ती देहभित्ती व अन्ननलिका यांमधील पोकळीत असते. देहगुहेत असलेल्या पातळ पापुद्र्यांमुळे आंतरिक खंडीभवन झालेले असते. या पापुद्र्यांना आंतरखंडीय पडदा म्हणतात. प्रत्येक पडद्यावर अनेक छिद्रे असतात. या छिद्रांतून देहगुहाद्रव शरीरभर वाहू शकतो. काही प्राण्यांमध्ये देहगुहा जवळजवळ नाहीशी झालेली असते. शरीरावर कायटीनयुक्त दृढरोम (केटी) असतात. तसेच देहभित्तीमध्ये स्नायू असतात. दृढरोम व स्नायू यांच्या एकत्रित समन्वयातून शरीराची हालचाल होते. काही प्राण्यांमध्ये चूषकांच्या साहाय्याने हालचाल होते.

वलयांकित संघातील प्राण्यांच्या पचनसंस्थेत पूर्ण विकसित अन्ननलिका असते. अन्नाचे पचन पेशींबाहेर अन्ननलिकेच्या पोकळीत होते. रक्ताभिसरण आवृत (बंद) किंवा विवृत (खुले) प्रकारचे असते. देहगुहाद्रवापासून रक्तरस तयार होतो. रक्तरसामध्ये हीमोग्लोबिन किंवा एरिथ्रोक्र्युओरीन हे श्वसन रंगद्रव्य (रेस्पिरेटरी पिग्मेंट) विरघळलेले असून ते पेशींमध्ये नसते. श्वसन बहुतांशी बाह्य त्वचेद्वारे होते. काही प्राण्यांमध्ये क्लोमांद्वारे श्वसन होते. उत्सर्जन संस्थेत वृक्कके असून ती खंडीय असतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असून ती चेतापेशींच्या गंडिका व चेतातंतू स्वरूपात असतात. स्पर्शके, रूचिकलिका, प्रकाशसंवेदी पेशी व डोळे या स्वरूपात ज्ञानेंद्रिये असतात. बहुतांशी वलयांकित प्राणी उभयलिंगी असून एकाच प्राण्यात नर आणि मादी अशा दोन्ही जनन ग्रंथी असतात. काही प्राणी नर अथवा मादी असे एकलिंगीदेखील असतात. त्यांच्यात पुनरुद्भवनाची क्षमता असते. हे प्राणी गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, ओलसर मातीत आणि जमिनीवर आढळतात. ते बिळात किंवा स्वत: तयार केलेल्या नलिकांमध्ये राहतात. ते मुक्तजीवी तसेच परजीवी असतात. या संघात सु. ८,७०० जाती आहेत. वलयांकित संघाचे तीन वर्ग आहेत.

वलयांकित संघ : (१) नीरीज, (२) गांडूळ, (३) जळू.

वर्ग पॉलिकीटा : या प्राण्यांच्या हालचालीसाठी प्रत्येक खंडाला पार्श्वपादांची एक जोडी असून पार्श्वपादांवर अनेक दृढरोम असतात. त्यामुळे ते बहुरोमी (पॉलिकीटा) असतात. या वर्गातील बहुतांशी प्राणी खाऱ्या पाण्यात आढळतात, तर काही गोड्या पाण्यात असतात. ते विविध रंगांचे असतात. काही वाळूत बिळे करून राहतात, तर काही स्वत: तयार केलेल्या नलिकांत राहतात. डोके स्पष्ट दिसते. डोक्यावर डोळे आणि स्पर्शके असतात. खंडीभवन बाह्य व आंतरिक असे दोन्ही असते. प्रमेखला नसते. नर व मादी वेगवेगळे असून जनन ग्रंथी तात्पुरत्या स्वरूपात असून त्या अनेक खंडांमध्ये असतात. उदा., ॲफ्रोडाइट, नीरीज, कीटॉप्टेरस, ॲरेनिकोला, स्पायरॉर्बिस.

वर्ग ऑलिगोकीटा : या प्राण्यांच्या हालचालीसाठी प्रत्येक खंडावर दृढरोम असतात. मात्र त्यांची संख्या कमी असते. त्यामुळे ते अल्परोमी (ऑलिगोकीटा) असतात. या वर्गातील प्राणी बहुतकरून ओलसर जमिनीत राहतात, काही बिळे तयार करून करतात, तर काही गोड्या पाण्यात राहतात. शरीर लांब व खंडयुक्त असून प्रमेखला असते. डोके स्पष्ट नसते. ते उभयालिंगी असून शरीरात अंडाशयाची एक जोडी आणि वृषणांच्या दोन जोड्या असतात. उदा., गांडूळ, ट्युबिफेक्स, कीटोगॅस्टर, ब्रँकिओबडेल्ला.

वर्ग हिरुडिनिया : या वर्गातील प्राणी पृष्ठवंशी प्राण्यांवर बाह्यपरजीवी म्हणून वाढतात आणि त्यांचे रक्त शोषतात. रक्त शोषताना क्लथन होऊ नये यासाठी लाळ ग्रंथी हिरुडीन (रक्तक्लथनरोधी पेप्टाइड) स्रवतात. हिरुडीन स्रवणारे प्राणी म्हणून त्यांचा हिरुडिनिया असा वेगळा गट आहे. ते बहुतकरून गोड्या पाण्यात राहतात. काही मोजके खाऱ्या पाण्यात राहतात. शरीराच्या खंडांची संख्या ठराविकच असते. शरीराच्या पुढच्या व मागच्या टोकाला एकेक चूषक असते. देहगुहा जवळजवळ नाहीशी झालेली असून शरीरात लहानमोठ्या रक्तपोकळ्या असतात. ते उभयलिंगी असून शरीरात अंडाशयाची एकच जोडी असते, तर वृषणांच्या अनेक जोड्या असतात. प्रमेखला काही काळापुरतीच असते. फलित अंड्याची वाढ अंतर्गत होते. उदा., जळू.