फुलांनी बहरलेला चेरी वृक्ष

‘चेरी’ याच नावाच्या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. हा रोझेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस ॲव्हियम आहे. यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, टर्की, वायव्य आफ्रिका आणि पश्चिम हिमालयात सस.पासून सु.२,५०० मी. उंचीवर यांचा प्रसार झालेला दिसतो. भारतात मुख्यत्वे काश्मीर, कुलू, सिमला येथे हा लागवडीखाली आहे.

चेरी हा पानझडी वृक्ष सु.२० मी.हून अधिक उंच वाढतो. याच्या खोडाची साल लालसर तपकिरी असते आणि आडव्या खवल्यांनी सुटून निघते. फांदया कमी उंचीवर फुटलेल्या असतात. पाने लांब, लोंबती, दतुर, खालच्या बाजूला केसाळ आणि कोवळेपणी लुसलुशीत असतात. ऑक्टोबर महिन्यात पाने गळतात. गळताना पानांचा रंग केशरी, गुलाबी किंवा लाल होतो. फुले पांढरी, बारीक देठाची व चवरीसारख्या फुलोऱ्यात एप्रिल-मेमध्ये येतात. फुले व्दिलिंगी असून त्यांचे परागण मधमाश्यांदवारे होते. फळे बोरांप्रमाणे आठळीयुक्त लाल, गोलसर व गुळगुळीत १-२ सेंमी. व्यासाची, लहान आणि आंबट- गोड असतात. फळे पौष्टिक आणि स्तंभक आहेत. गोड फळे मुखशुद्धीकरिता आणि आंबट फळे जेवणात वापरतात.
चेरी फळांचे घोस

चेरीच्या प्रूनस ॲव्हियम (स्वीट चेरी) शिवाय अनेक जाती आहेत. जपानमध्ये फुलांसाठी प्रसिद्ध असलेले चेरीचे वृक्ष प्रूनस प्रजातीतील सेऱ्यूलॅटा, लॅनेसीयाना,सिबोल्डाय, एडोएन्सिस इत्यादि जातींचे आहेत. या वृक्षांना एकेरी वा दुहेरी, गुलाबी वा पांढरी फुले येतात. फुलांनी बहर आलेला चेरी वृक्ष अतिशय सुंदर दिसतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा