मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास. मानवामुळे अथवा नैसर्गिक प्रक्रियांमुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये बिघाड होऊन तसेच हवा, जल, मृदा अशा संसाधनांचा अवक्षय होऊन पर्यावरणाची गुणवत्ता घटते. संयुक्त राष्ट्रसंघानुसार सामाजिक व पारिस्थितिकीय उद्दिष्टांची आणि गरजांची पूर्तता करण्याच्या पर्यावरणक्षमतेत झालेली घट म्हणजे पर्यावरण अवनती होय.

काही नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती पर्यावरणाची अवनती होण्यास कारणीभूत ठरतात. नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर आणि निरंतर वापर हे पर्यावरण अवनतीचे प्रमुख कारण आहे. मनुष्य आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांचा कच्चा माल म्हणून वापर करतो. वस्तूंच्या वाढत्या निर्मितीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक ऱ्हास होत असतो. तसेच संसाधनांच्या अतिवापरांमुळे अपशिष्ट निर्माण होते. अपशिष्टे अतिसंचित झाल्यामुळे सजीवांचे स्वास्थ्य बिघडते आणि सामाजिक, आर्थिक तसेच पारिस्थितिकीय समस्या निर्माण होतात. स्थायू व अपायकारक अपशिष्टांमुळे मृदा व भूमी यांची अवनती होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादनासाठी वाढलेला वापर हेही पर्यावरण अवनतीचे कारण आहे.

विकासकामासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने नैसर्गिक पर्यावरणात बदल होतात. उदा., मोठ्या धरणांच्या बांधकामामुळे जलाशय निर्मिती होते परंतु खडकांचे संतुलन बिघडते तसेच जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. वाढती लोकसंख्या पर्यावरणाच्या अवनतीस कारणीभूत असते. वाढलेल्या लोकसंख्येमुळे संसाधनांची मागणी वाढते. मात्र, संसाधने मर्यादित असल्यामुळे सर्व गरजांची पूर्तता करणे अशक्य होते. दरवर्षी सु. ८.६ कोटी एवढी जागतिक लोकसंख्येत वाढ होते. २०५० सालापर्यंत जगाची लोकसंख्या सु. १० अब्ज होईल, असा अंदाज आहे. त्यावेळी नैसर्गिक संसाधनांचा अवक्षय होऊन पर्यावरण अवनती प्रचंड प्रमाणावर होईल. अधिक्षेत्र, ऊर्जा आणि इतर पदार्थांच्या उपलब्धतेसाठी नैसर्गिक परिसंस्थांचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे निर्वनीकरण होते. शेतीचा विस्तार, स्थलांतरित शेती, डोंगर उतार शेती यांमुळे तसेच वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण झाले आहे व होत आहे. त्यामुळे मृदा व भूमीची आणि परिणामी पर्यावरणाची हानी होते.

प्रदूषण हेही पर्यावरण अवनतीचे एक महत्त्वाचे कारण आहे. पर्यावरण अवनती आणि प्रदूषण या दोन्ही संज्ञा परस्परपर्यायी म्हणून वापरल्या जातात. परंतु या दोन्ही संज्ञा भिन्न आहेत. पर्यावरणाचे प्रदूषण स्थानिक पातळीवर मानवी कृतींमुळे पर्यावरणाची गुणवत्ता घटल्याने होते. प्रदूषण सावकाश आणि क्रमबद्ध होत असते. पर्यावरणाचे व्यवस्थापन योग्य केल्यास प्रदूषणापासून पर्यावरणाचे संरक्षण करता येते. पर्यावरण अवनतीमध्येही मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते. त्यामुळे पारिस्थितिकीय असमतोल निर्माण होऊन परिसंस्था आणि जैवविविधता यांवर विपरीत परिणाम होतो. पारिस्थितिकीय असमतोल हे पर्यावरण अवनतीचे ठळक लक्षण आहे. सजीवांच्या निरीक्षणातून ते सहज दिसून येते.

काही वेळा भूकंप, ज्वालामुखी, भूमिपात, चक्रीवादळे, वणवा, पूर, अवर्षण, उष्ण व शीत वातलहरी इत्यादी नैसर्गिक प्रक्रियांमुळे जलदतेने पर्यावरण अवनती होते. त्यामुळे पर्यावरण उपयुक्ततेचे मूल्य कमी होते. पर्यावरणातील बिघाडामुळे मानवासह इतर काही सजीवांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. नैसर्गिक पर्यावरणाच्या स्वास्थ्यास आपत्तिजनक स्थिती निर्माण होते. जैवविविधतेत लक्षणीय घट होते. पृथ्वीवरील सजीवांमध्ये एक विलक्षण अशी आंतरवीण असते. त्यातील एखाद्या घटकांतील गुणधर्मात बदल झाल्यास, या घटकाशी निगडित असलेल्या इतर घटकांच्या गुणधर्मावर परिणाम होतो. पर्यावरण अवनतीमुळे नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास होतो. नैसर्गिक परिसंस्थेत बदल होतात. काहीवेळा हे बदल विशाल भूप्रदेशावर घडून येतात. या बदलांचा भौतिक परिसंस्थांवर परिणाम होतो. परिसंस्थापूरक चक्रे विसकळित होतात. ओझोन अवक्षय, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र इत्यादींमध्ये घडून आलेले बदल ही याची उदाहरणे आहेत. जागतिक तापन (हवामान बदल) हे व्यापक स्तरावरील परिसंस्था बिघाडाचे व पर्यावरण अवनतीचे ज्वलंत उदाहरण आहे. पर्यावरणाच्या अवनतीमुळे असंख्य किनारी परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. आशियातील ६९% तर यूरोपातील ८६% किनारी प्रदेश पर्यावरण अवनतीग्रस्त आहेत. जगातील ५८% प्रवाळ बेटे, ३४% माशांच्या प्रजाती यांना पर्यावरण अवनतीचा धोका निर्माण झाला आहे.

विकास प्रक्रियेमुळे पर्यावरण अवनती अपरिहार्य आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर दबाव वाढून पर्यावरण गुणवत्तेत घट झाल्यामुळे पर्यावरण अवनती होत राहणार आहे. मात्र, प्रगत तंत्रज्ञान आणि धोरणांची काळजीपूर्वक अंमलबजावणी केल्यास पर्यावरण अवनतीच्या प्रमाणात घट करणे शक्य आहे. पर्यावरणाची गुणवत्ता टिकविण्यासाठी, संसाधनांचे संधारण करण्यासाठी व्यापक स्तरावर गांभीर्याने कृती करण्याची गरज आहे. नैसर्गिक प्रक्रियांवर मानवाचे नियंत्रण नसते. मात्र, निरनिराळ्या योजना राबवून त्यांच्या परिणामात घट आणण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. पर्यावरण अवनतीपासून वाचविण्यासाठी सरल व सोपे उपाय शोधणे आणि ते अंमलात आणणे वैयक्तिक पातळीवर शक्य आहे. पर्यावरण अवनतीचे घटक शोधणे, त्यावर योग्य उपायांनी कृती करणे आणि पर्यावरण अवनतीला कारणीभूत ठरणारे घटक नाहीसे करणे हे महत्त्वाचे उपाय आहेत.