लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव स्मायलॅक्स चायना आहे. चीन, जपान आणि भारत या देशांतील उबदार हवामानात ही वाढते. भारतात आसाममध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते. स्मायलॅक्स प्रजातीच्या ३००—३५० जाती आहेत. या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील वनस्पती काटक असतात. ही वनस्पती कापली किंवा आगीत जळाली तरी तिच्या मूलक्षोडांपासून ती पुन्हा वाढते.
पाने, फुले व फळांसहित चोपचिनी वेल

चोपचिनी ही कठीण प्रतानांच्या साहाय्याने वर चढणारी वेल आहे. तिच्या खोडावर शुके असतात. पाने साधी, एकाआड एक, लंबगोल आणि विशाल असून पानांच्या तळाशी ठळकपणे दिसणारी अनुपर्णे असतात. फुले अनेक, पांढरी व लहान असून फुलोरा चवरीसारखा असतो. फुले एकलिंगी असतात. फळे बोरांप्रमाणे गोलसर, लाल रंगाची असतात. बिया एकदोन असतात. बीजप्रसार पक्षी व अन्य लहान प्राण्यांमार्फत होतो.

चोपचिनी औषधी असून तिची मुळे पाचक आणि रेचक आहेत. संधिवात, उपदंश, कंडुरोग (सोरायसिस) व चर्मरोगावर ती उपयुक्त आहेत.

स्मायलॅक्स चायनाशी जवळची असणारी एक जाती म्हणजे स्मा. ग्लॅब्रा. तिला बडी चोपचिनी म्हणतात.ती बिनकाटेरी असून पानात फक्त तीन शिरा, पर्णतल गोलसर, पाने खालून पांढरट व देठ तळाशी आवरक असतो. फुले पांढरी शुभ्र असतात. ताज्या मुळांचा काढा जखमा व गुप्तरोग यांवर उपयुक्त आहे.

स्मायलॅक्स  प्रजातीची स्मा. झेलॅनिका ही जाती घोटवेल म्हणून ओळखली जाते. ही बहुधा रानटी अवस्थेत समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळते. हिचे खोड काटेरी असते. पाने चोपचिनीप्रमाणे हस्ताकृती व जाळीदार शिराविन्यासाची असतात. फुले एकलिंगी, पांढरट हिरवी असून फळे मृदू, लाल व मोठ्या वाटाण्याएवढी असतात. हिची मुळे सार्सापरिला या औषधी द्रवात वापरतात. ते गुप्तरोग आणि मासिक पाळीच्या तक्रारीवर, विशेषत: ३५ वर्षांवरील स्त्रियांकरिता उपयुक्त आहे. मुळे संधिवात, पाय दुखणे, आमांश इत्यादींवर उपयुक्त आहेत. बागेत शोभेकरिता ही वेल लावतात.

स्मायलॅक्स प्रजातीतील जगात वापरल्या जाणाऱ्या अन्य महत्वाच्या जाती म्हणजे स्मा. रिगेली आणि स्मा. ऑफिसिनॅलीस. या दोन्ही वनस्पतींच्या मुळांपासून सार्सापरिला हे पेय तयार करतात. तसेच मुळे कंडुरोग, संधिवात आणि कुष्ठरोगावर वापरली जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा