कोरफड

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण भारतात ती रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीजमध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे.

कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात. पाने मांसल, गुच्छासारखी एकत्र, ४५-६० सेंमी. लांब, एकाआड एक, मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी, बिनदेठाची, भाल्यांसारखी पण टोकाकडे बोथट झालेली, टोकांवर व कडांवर काटे असलेली असतात. फिकट हिरव्या पानांवर पांढरट ठिपक्यांच्या रांगा असतात. ऑगस्ट-डिसेंबरमध्ये लांब दांड्यावर अनेक लोंबत्या पिवळसर केशरी रंगाच्या लांबट फुलांचा फुलोरा येतो. बोंडे त्रिकोणी व अनेकबीजी असतात.

कोरफडीची पाने औषधी आहेत. त्यांचा आसव करण्यासाठी उपयोग करतात. ती भूक वाढविणारी ( दीपक ), रेचक, कृमिनाशक व शामक आहेत. तसेच ती कडवट, थंडावा देणारी आणि डोळे, यकृत, श्वासनलिका इत्यादींच्या विकारांवर व ज्वरामध्ये उपयुक्त आहे. पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, असे दिसून आले आहे. चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.