श्रीनागेश, एस. एम. : (११ मे १९०३ ‒ २७ डिसेंबर १९७८). स्वतंत्र भारताचे दुसरे भूसेनाध्यक्ष. नायडू या लष्करी परंपरा असलेल्या तमिळ कुटुंबात कोल्हापूर येथे जन्म. त्यांची आई महाराष्ट्रीयन होती. वडील मल्लिनाथ हे सुरुवातीस हैदराबादच्या निजामाचे व्यक्तिगत वैद्य होते. श्रीनागेशांचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. पुढे केंब्रिज विद्यापीठातून पदवी घेऊन त्यांनी सँडहर्स्ट येथील शाही लष्करी महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले.

ब्रिटिश पलटणीत प्रशिक्षणार्थी म्हणून श्रीनागेशांची नियुक्ती झाली. त्यानंतर एकोणिसाव्या हैदराबाद रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. हैदराबादला दुसऱ्या महायुद्धात मलायाला धाडलेल्या पलटणीत ते अ‍ॅडज्यूटंट कॅप्टन होते (१९३९). नंतर ते मेजर झाले आणि त्यांची लंडीकोटल या वायव्य सरहद्द प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेवर नेमणूक झाली. तिथून पुन्हा त्यांना डिसेंबर १९४२ मध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यासाठी लुशाई टेकड्यांत पाठविण्यात आले आणि पुढे ते १९४५ मध्ये म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) गेले. युद्धसमाप्तीनंतर डेहराडूनच्या लष्करी अकादमीत त्यांची अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या अकादमीतील ते पहिले भारतीय अध्यापक होते. जानेवारी १९४८ मध्ये भूसेनेच्या मुख्यालयात अ‍ॅडज्यूटंट जनरल आणि नंतर ऑक्टोबरमध्ये जम्मू-काश्मिरमधील उधमपूरला नव्याने स्थापन झालेल्या पाचव्या भूसेनादलाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. त्या ठिकाणी त्यांनी पाकिस्तानी सैन्याबरोबर मुकाबला करावा लागला. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करिअप्पांना भूसेनेचे कमांडर-इन-चीफ म्हणून नेमल्यानंतर त्यांच्या जागी पश्चिम विभागीय भूसेनेचे ते प्रमुख झाले. त्यानंतर त्यांची जनरल व कमांडर-इन-चीफ ऑफ इंडियन आर्मी या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली (१५ मे १९५५). पुढे त्यांची नव्याने स्थापन झालेल्या हैदराबादच्या प्रशासकीय लष्करी महाविद्यालयात फर्स्ट कमांडंट म्हणून नेमणूक झाली. त्यानंतरच्या काळात अनुक्रमे आसाम (१९५९), आंध्र प्रदेश (१९६२) व कर्नाटक (१९६४) या तीन राज्यांचे राज्यपालपद त्यांनी सांभाळले. स्वतंत्र नागालँडचे उद्‌घाटन त्यांच्याच हस्ते झाले (१९६१). उर्वरित जीवन त्यांनी लेखन-वाचन व आपले आवडते छंद जोपासण्यात व्यतीत केले.

वृद्धापकाळाने दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा