आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील एक जलचर प्राणी. आंतरदेहगुही संघात प्राण्यांची दोन रूपे आढळतात. बहुशुंडक आणि छत्रिक. जलव्याल बहुशुंडक आहे. भारतात सामान्यत: आढळणाऱ्या जलव्यालाचे शास्त्रीय नाव हायड्रा व्हल्गॅरिस आहे. ध्रुवीय शीतप्रदेश वगळता जलव्याल जगात सर्वत्र स्वच्छ व स्थिर गोड्या पाण्याची डबकी, तलाव, सरोवरे यांमधील खडकांना आणि पाणवनस्पतींच्या विविध भागांना चिकटलेले आढळतात. तसेच घरगुती जलजीवालयामध्ये हायड्रिला या पाणवनस्पतींच्या विविध भागांना चिकटलेल्या अवस्थेत जलव्याल हमखास दिसून येतात.

जलव्याल (हायड्रा व्हल्गॅरिस)

बहुपेशीय प्राण्यांच्या संरचनेच्या पायाभूत अभ्यासासाठी जगभरात जलव्यालाचा वापर केला जातो. जलव्यालाचे शरीर साधे, सरळ, पोकळ दंडगोलाकार व ६-१३ मिमी. लांब असून शरीराचा बंद भाग, चक्रिका आधाराला चिकटलेली असते. शरीराच्या मुख्य पोकळीला आंतरदेहगुहा म्हणतात. जलव्यालाच्या दूरस्थ भागावर एका छोट्या उंचवटयावर जलव्यालाचे मुख असते. त्याला अधोमुख म्हणतात. त्याभोवती ४-७ पोकळ शुंडके असून मुख्य शरीराच्या तुलनेत शुंडकांची जाडी कमी असते. जलव्यालाचे शरीर लवचिक असते आणि शुंडके लवचिक व तन्य असतात.

शरीररचनेच्या विकासात पेशीय आणि ऊतीय रचना या अवस्थांच्या दरम्यानची ‘पेशी-ऊतीय रचना’ जलव्यालामध्ये आणि अन्य आंतरदेहगुही प्राण्यांमध्ये आढळते. जलव्यालाच्या या संरचनेला ऊतिमय संरचना असेही म्हणतात. त्याच्या शरीरभित्तिकेत बाह्यस्तर आणि अंत:स्तर असे पेशींचे दोन थर असतात. त्यांच्यामध्ये पेशीविरहित मध्यश्लेष्मस्तर असतो.

जलव्यालाच्या बाह्यस्तरात सात प्रकारच्या पेशी आढळतात. त्यांपैकी दंश-पेशी या केवळ आंतरदेहगुही संघातच आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत. त्यांच्यामध्ये नेमॅटोसिस्ट या कुप्या असून त्यांतील संमोहविष म्हणजे हिप्नोटॉक्सिन हे विषारी द्रव्य शत्रूच्या शरीरात सूक्ष्म अशा पेशी नलिकेतून अंत:क्षेपित केले जाते.

अत्यंत मंद गतीने सरपटत किंवा शरीर वाकवून सुरवंटासारखी हालचाल करीत, प्रसंगी कोलांट्या मारीत किंवा उलटे होऊन शुंडकांचा वापर पायांसारखा करून जलव्याल एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. तसेच तो हवेच्या बुडबुड्यांच्या आधारे उलटया स्थितीत पाण्याच्या पृष्ठभागाशी तरंगतो.

जलव्याल शुंडकांच्या साहाय्याने सायक्लॉप्स, पाणपिसू (डॅफ्निया) आणि अन्य छोटया जलचर प्राण्यांना पकडून खातात. आंतरदेहगुहेमध्ये पचन झाल्यानंतर खाल्लेल्या अन्नाचा न पचलेला भाग मुखावाटेच बाहेर टाकतात. जलव्यालामध्ये वेगळे गुदद्वार नसते. श्वसनासाठी आणि उत्सर्जनासाठी जलव्यालामध्ये वेगळी इंद्रिये नसतात. श्वसन आणि उत्सर्जन शरीरभित्तिकेद्वारे होते.

जलव्यालामध्ये अलैंगिक आणि लैंगिक असे दोन्ही प्रकारचे प्रजनन होते. अलैंगिक प्रजनन मुकुलनाने होते. मुबलक प्रमाणात खादय उपलब्ध असताना जलव्यालाच्या शरीराच्या मधल्या भागावर मुकुले वाढतात. प्रत्येक मुकुल एका छोट्या जलव्यालासारखे असते. काही वेळा एका मुकुलावर त्याचे उपमुकुलही वाढलेले दिसते. पूर्ण वाढलेले मुकुल जलव्यालाच्या शरीरापासून वेगळे होऊन आपले स्वतंत्र जीवन सुरू करते.

प्रतिकूल परिस्थिती निर्माण होताच जलव्यालामध्ये लैंगिक प्रजनन होते. अशावेळी शरीरभित्तिकेत उंचवट्यांच्या रूपात अंडाशय किंवा वृषण तयार होतात. चक्रिकेनजीकच्या भागात अंडाशय आणि शुंडकांनजीक वृषण तयार होतात. अंडाशय आणि वृषणे वेगवेगळ्या जलव्यालांच्या शरीरात तयार झालेली असतात. वृषणांपासून पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या शुक्रपेशी सोडल्या जातात. या शुक्रपेशी अन्य जलव्यालाच्या अंडाशयात फलन घडवून आणतात. फलित अंडी आपल्याभोवती एक कठिण आवरण स्रवतात. प्रौढ जलव्याल मृत झाल्यावर ही फलित अंडी जलाशयाच्या तळाशी जाऊन बसतात. अनुकूल परिस्थितीत या अंड्यांतून डिंभ बाहेर पडतात. जलव्यालाच्या जीवनचक्रात छत्रिक अवस्था नसते.

काही वेळा अपघाताने जलव्यालाचे तुकडे होतात. प्रत्येक तुकड्याला ध्रुवता असते. तो तुकडा आपल्याला पूरक असा भाग निर्माण करतो. याला पुनरुद्भवन म्हणतात. अशा पुनरुद्भवनासाठी पुरेशा संख्येत अंतराली पेशींची (अशी पेशी जिचे रूपांतर कोणत्याही दुसऱ्या प्रकारच्या पेशीत होऊ शकते) गरज असते. पुनरुद्भवन हे काही अलैंगिक प्रजनन मानता येत नाही. जलव्यालामध्ये चेतापेशींचे वितरित जाळे असते. प्रकाशसंवेदी अवयव किंवा यंत्रणा नसतात. मात्र, २०१० मध्ये प्रकाश संवेदनेशी निगडित ऑप्सिन या प्रथिनाची आवश्यक जनुके जलव्यालाच्या जीनोममध्ये आढळली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा