पावसामुळे जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे जलोत्सारण व्यवस्थापन. यालाच पाणलोट जलोत्सारण क्षेत्र व्यवस्थापन किंवा जलविभाजक व्यवस्थापन असेही म्हणतात. यामुळे भूमी व जलसंधारणाबरोबर पडीक जमिनीचा विकास, वन लागवड आणि पावसाच्या पाण्याची साठवण करता येऊ शकते. त्याचबरोबर काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटू शकते.
जलोत्सारण व्यवस्थापन

एखादया पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांचे फारसे नुकसान होऊ न देता, विशेषत: जमीन व पाणी यांचा आपल्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य पद्धतीने वापर करणे म्हणजे पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन होय. हे व्यवस्थापन मुख्यत: भूमी व जलसंधारणाच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यामुळे योग्य भूमि-उपयोजन करण्यास, मृदेची सुपीकता राखण्यास व जलसंधारण करण्यास मदत होते. तसेच स्थानिक स्वरूपात पूरनियंत्रण करण्यासाठी, गाळाचे संचयन थांबविण्यासाठी व उपलब्ध मृदेची उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोग होतो.

पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची उद्दिष्टे :

(१) योग्य भूमि-उपयोजन करून, जमिनीची धूप थांबवून व मृदेची उत्पादकता वाढवून शेतकऱ्याचा आर्थिक विकास करणे. (२) पाणलोट क्षेत्रात जलसंधारण करणे. (३) नैसर्गिक आपत्ती, पूर, अवर्षण, भूमिपात इत्यादींना आळा घालणे. (४) आर्थिक विकासातून ग्रामीण विकास करणे. (५) वरील सर्व उद्दिष्टांची एकत्रित स्वरूपात पूर्तता करणे.

पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पद्धती अथवा दृष्टिकोन :

(१) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व सांस्कृतिक पद्धतीने भूमी व पाणी यांचे संधारण करणे. (२) पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा साठा करून उन्हाळ्यात त्याचा वापर करणे. (३) वनाच्छादन वाढवून व पाण्याचे साठे करून भूजल पातळीत वाढ करणे. (४) पिकासाठी उपयुक्त नसलेल्या मृदेचा वापर फळझाडे, कुरणे इत्यादींसाठी करणे. (५) शाश्वत स्वरूपाची पर्यावरणीय परिसंस्था निर्माण करून मानव-जमीन-पाणी-वनस्पती-प्राणी यांच्या परस्परसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करणे. (६) उपलब्ध पाण्याचा वापर करून प्रती एकक क्षेत्रातील पर्यटन कृषी उत्पादकता वाढविणे. (७) तंत्रज्ञानाचा वापर करून बांध बंदिस्त करणे, समतल चर खोदणे, योग्य पीक प्रारूप वापरणे व पिकांच्या नवनवीन जातींचा वापर करणे. (८) पाणलोट विकास व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग वाढविणे आणि लोकजागृती करणे. (९) पायाभूत सुविधांचा विकास करून पाणलोट क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचाविणे. (१०) परिसंस्थेची अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करणे. (११) उद्देशांनुसार क्रिया आणि प्रगतीच्या परिणामांचे मूल्यांकन करणे.

राष्ट्रीय पातळीवर पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले जात असून वेगवेगळ्या प्रदेशांतील पाणलोट क्षेत्राची निवड करून त्या परिसराचा विकास केला जात आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते आणि हा पाऊस अनियमित व अनिश्चित स्वरूपाचा असतो. पिण्यासाठी, शेतीसाठी व ग्रामीण विकासासाठी निश्चित स्वरूपाचा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात निरनिराळ्या जलविभाजकांचा अभ्यास करून पाणलोट क्षेत्राची निवड करण्यात आलेली आहे व त्यांचा विकास केला जात आहे.

This Post Has One Comment

  1. Hanmant shinde

    धन्यवाद..खूप सुंदर माहिती..

प्रतिक्रिया व्यक्त करा