हिरवे सागरी कालव

मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या परशुपाद किंवा शिंपाधारी (बायव्हाल्व्हिया) वर्गातील एक प्राणी. बहुसंख्य कालवे सागरी असून काही गोड्या पाण्यात राहतात. सागरी कालवांना ‘तिसर्‍या’ असे सामान्य नाव आहे. लॅमेलिडेन्स प्रजातीच्या अनेक जाती भारतात आढळतात. सागरी कालवाचे शास्त्रीय नाव मायटिलस व्हिरिडिस आहे.

ओढे, नद्या व तलाव यांतील पाण्याखालील चिखलात किंवा वाळूत कालवे सामान्यतः अर्धवट पुरलेल्या स्थितीत राहतात. ते आकाराने १० सेंमी. पर्यंत वाढतात. त्याचा आकार लंबवर्तुळाकार व चपटा असून शरीर खंडरहित व मऊ असते. हे शरीर दोन पुटे म्हणजेच शिंपा असलेल्या कठिण कवचात सुरक्षित असते. पुटांचे बाह्यपृष्ठ हिरवट तपकिरी रंगाचे असून त्यावर संकेंद्री वृद्धिरेखा असतात. बाह्यपुटावर चोचीसारखा एक उंचवटा असतो, त्याला ककुद म्हणतात. हा कवचाचा सर्वात जुना भाग असतो. पुटांचे आतील पृष्ठ गुळगुळीत व मोत्यांसारखे चमकदार असते. कवच कायटीन व कॅल्शियम कार्बोनेट यांचे बनलेले असते. दोन्ही पुटांच्या उत्तर कडा बंधनीने अथवा दातांनी एकमेकांना बिजागिरीप्रमाणे जोडलेल्या असतात. पुटांची उघडझाप अभिवर्ती आणि प्रतिकर्षी स्नायूंमुळे होते.

कवचाची पुटे काढून टाकल्यावर कालवाचे शरीर दिसून येते. सर्व शरीर पातळ प्रावराने (त्वचेसारखे आवरण) झाकलेले असते. शरीराच्या एका बाजूस एक असे प्रावराचे दोन भाग असतात. प्रावरांच्या दोन भागांच्या आत प्रावर गुहा असून त्यात कल्ले, पाद व आंतरांगे असतात. कवचाच्या मागच्या टोकाशी किंचित बाहेर डोकावणारे अंतर्वाही आणि बहिर्वाही असे दोन निनाल असतात. अंतर्वाही निनालातून पाणी आत जाते आणि बहिर्वाहीतून ते बाहेर पडते. पाण्याचा प्रवाह कल्ल्यांवर असलेल्या केसांसारख्या पक्ष्माभिकांच्या हालचालीमुळे सतत चालू राहतो. आत येणा-या पाण्यातून कालवाला ऑक्सिजन आणि अन्न मिळते, तर उत्सर्ग पदार्थ व न पचलेले अन्न पाण्याबरोबर बाहेर पडते. डायाटम, प्लवक वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे कालवाचे अन्न असते.

कालवाचा पाद अग्रभागाकडे असून स्नायुमय व नांगराच्या फाळासारखा किंवा जिभेच्या आकाराचा असतो. पाद कवचाबाहेर काढता येतो व आत ओढून घेता येतो. पादामुळे कालवाचे चलन होते; परंतु त्याची गती अगदी मंद असते. सागरी कालवात पादाबरोबर सूत्रगुच्छ धागे असतात. पाद आणि सूत्रगुच्छ धाग्यांनी कालवे चिखलात, वाळूत अगर दगडाला घट्ट चिकटून एका जागी स्थिर राहतात. बाह्य लक्षणांवरून नर व मादी वेगवेगळे ओळखता येत नाहीत. फलित अंड्यातून डिंभ तयार होतो. डिंभ कालव्यातून बाहेर पडून माशांच्या त्वचेला, परांना किंवा कल्ल्यांना चिकटतात. या ठिकणी कवच तयार होण्याची क्रिया होऊन काही काळानंतर डिंभाचे प्रौढ कालवात रूपांतर होते.

गोड्या पाण्यातील आणि समुद्राच्या पाण्यातील कालवे खाद्य म्हणून वापरली जातात. पुटांपासून किंवा शिंपल्यांपासून विविध शोभिवंत वस्तू, बटणे, दागिने इ. बनवितात. शिंपल्यांपासून उत्तम दर्जाचा चुना मिळतो. त्याचा उपयोग बांधकाम व रंगकामासाठी करतात. कालवांचे शिंपले नैसर्गिक कॅल्शियमचा स्रोत आहेत. सागरी कालवांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यात येते.