जांभूळ हा सदापर्णी वृक्ष मिर्टेसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी आहे. यूजेनिया जांबोलना या शास्त्रीय नावानेही हा ओळखला जातो. भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंडोनेशिया या देशांत हा वृक्ष स्थानिक असून जगभर त्याचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात तो नैसर्गिक स्थितीत तसेच लागवडीच्या रूपात, विशेषकरून नद्यांच्या काठावर आढळतो.
जांभूळ (सायझिजियम क्युमिनी): पाने व कच्ची फळे

जांभूळ वृक्षाची वाढ जोमाने होते आणि तो सु. ३० मी. उंच वाढू शकतो. खोड रुंद असून त्यावरची साल खवल्यांनी सुटते. पाने साधी, समोरासमोर, लंबगोल व वेगवेगळ्या आकारांची असतात. फुलोरा शाखायुक्त व टोकाला गुच्छाप्रमाणे असून त्यांवर मार्च ते मे महिन्यात लहान, हिरवट पांढरी सुगंधी फुले येतात. मृदुफळे लांबट गोल असून कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. फळे रसाळ असून त्यात एकच आठळीयुक्त बी असते. मोठी फळे असलेल्या वृक्षांना रायजांभूळ म्हणतात.

जांभूळची पिकलेली फळे

जांभळाची साल, फळे आणि बिया उपयुक्त आहेत. खोडाची साल तुरट, पाचक, आतड्यासाठी स्तंभक आणि कृमिनाशक आहे. साल किंवा फळे सुकवून, त्याची वस्त्रगाळ पूड करून किंवा फळांचे सरबत मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यासाठी दिली जाते. पिकलेली फळे लोक आवडीने खातात. त्यांत आणि ही जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असतात. फळे तुरट, आंबट-गोड आणि शीतल असतात. फळांपासून वाइन आणि शिरका तयार करतात. हा शिरका पौष्टिक आणि वायुनाशी असतो.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा