निळा मोहर (जॅकरंदा मिमोसिफोलिया)

सुंदर व निळ्या आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. निळा मोहर हा वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव जॅकरंदा मिमोसिफोलिया आहे. तो मूळचा ब्राझील आणि अर्जेंटिना येथील आहे. भारतात तो मुख्यत: शोभेकरिता, बागेत किंवा रस्त्याच्या कडेला लावलेला आढळतो. तो जलद वाढणारा पण अल्पायुषी असतो. पाच वर्षांपासून फुले येतात. मात्र, वीस वर्षांनंतर हा वृक्ष बेढब दिसू लागतो.

निळा मोहर (जॅकरंदा मिमोसिफोलिया): फुले

निळा मोहर हा वृक्ष ५–१५ मी. उंच वाढतो. या वृक्षाची साल पातळ आणि करड्या-तपकिरी रंगाची असते. मऊ असलेली साल जून झाल्यावर खवलेदार होते. फांद्या बारीक, वेड्यावाकड्या व तांबूस तपकिरी असतात. पाने संयुक्त, नेच्यासारखी, मोठी व पिसांसारखी असतात; ती सु. ४५ सेंमी. लांब असून पर्णिका अनेक असतात. ज्या वातावरणात हा फुलत नाही अशा वातावरणातही त्याच्या संयुक्त पानांमुळे त्याची लागवड करतात. फुले येण्याचा हंगाम दोन महिने असून ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतात. फुले लांब, अनेक व निळ्या रंगाची असतात. फांद्यांच्या टोकाला असलेल्या या निळ्या फुलांमुळे हा वृक्ष शोभिवंत दिसतो. फळे चपटी व तपकिरी असून त्यात अनेक पंखधारी बिया असतात. फळे फुटल्यावर बिया दूरवर पसरतात.

निळा मोहराचे लाकूड पांढरट करडे असून ते कातीव कामासाठी वापरतात. त्यापासून लाकडी भांडी तयार करतात. पानांचा रस जीवाणू प्रतिबंधक आहे. लाखेचे कीटक पोसण्यासाठी हा एक उत्तम वृक्ष आहे.