भारतात सर्वत्र आढळणारे शोभेच्या फुलाचे एक झुडूप. ही वनस्पती फुले येणाऱ्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोजा-सायनेन्सिस आहे. ती मूळची चीनमधील असून नंतर तिचा प्रसार भारतात झाला असावा, असे मानतात. हिबिस्कस प्रजातीत सु. २३२ वनस्पतींचा समावेश होत असून या वनस्पती जगातील उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत आढळतात. भारतात सर्वत्र जास्वंदीची फुलांसाठी लागवड करतात. जास्वंद हे मलेशियाचे राष्ट्रीय फूल आहे.
जास्वंद : फूल व कळीसहित फांदी

जास्वंद ही बहुवर्षायू वनस्पती २-५ मी. उंच वाढते. पाने साधी, दंतुर व एकाआड एक असतात. पानांच्या आकारमानांत फरक असला तरी ती गर्द हिरवी, मोठी व चकचकीत असतात. फुले फांदीच्या टोकाला एकाकी येतात. निदलपुंज ५-७ असून दलपुंज ७.५ सेंमी. व्यासाचे असते. फुले घंटेच्या आकाराची असून ती लालभडक, टवटवीत व आकर्षक असतात. फुलातील पुंकेसरनलिका पाकळ्यांपेक्षा लांब असल्यामुळे पुंकेसरदेखील उठून दिसतात. जास्वंदाच्या संकरीत फुलांमध्ये जरी पुंकेसर आणि बीजांड असले तरी त्यांच्यात फलन घडून येत नाही. त्यामुळे त्यांना फळे येत नाहीत. मात्र, वन्य जास्वंदीला फळे येतात.

जास्वंदाला फुले वर्षभर येतात. त्याच्या फुलांमध्ये खूप विविधता असून ती नारिंगी, पिवळी भडक, लाल, गुलाबी व पांढरी अशाही रंगांत येतात. वैज्ञानिकांनी सु. ७० विविध रंगांची फुले असलेले जास्वंदाचे संकर तयार केले आहेत. पुष्पमुकुट असलेले फुलांचे संकरण प्रकार बागेतून आढळतात. काळ्या बुटाला लाल फुले चुरडून लावल्यास चांगली चकाकी येते, त्यावरून ‘शू-फ्लॉवर’ हे इंग्रजी नाव पडले आहे.

जास्वंदाची मुळे तिखट, थोडीशी खारट व कडवट असतात. त्यांचा उपयोग खोकला, ताप व त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी होतो. पाने वेदनाशामक व सौम्य रेचक समजली जातात. फुले वेदनाशामक व शोथशामक आहेत. फुलांच्या पाकळ्यांचा रस, ऑलिव्ह तेलाबरोबर त्यातील पाणी निघून जाईपर्यंत मंद अग्नीवर उकळून तयार झालेले तेल केसांच्या वाढीसाठी व केस रंगविण्यासाठी उपयुक्त असते. फुलांपासून अँथोसायनिन हे लाल रंगद्रव्य मिळवितात; ते खादय रंग म्हणून वापरतात. जास्वंदाचे फूल सामूदर्शक वापरता येते. आम्ल टाकले असता फुलांच्या पाकळ्यांचा रंग भडक गुलाबी तर आम्लारीत रंग हिरवा होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा