घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या मूळ वन्य जातीच्या दोन अस्तित्वात असलेल्या उपजातींपैकी ही एक आहे. या जातीमध्ये जगातील सर्व माणसाळविलेल्या घोडयांचा समावेश होतो. गाढव, झीब्रा यांचाही समावेश ईक्विडी कुलात होत असून ते एकखुरी प्राणी आहेत. शक्तिमान आणि वेगाने पळू शकणाऱ्या घोडयाला माणसाळवून प्राचीन काळापासून प्रवासासाठी, वाहतुकीसाठी आणि युद्धात मनुष्य याचा वापर करीत आला आहे. जगातील निरनिराळ्या पर्यावरणांत जगण्याची क्षमता त्याच्या अंगी असते. सध्याच्या काळात त्यांचा वापर वाहतुकीसाठी जरी कमी झालेला असला, तरी मनोरंजनासाठी अजूनही तो लोकप्रिय आहे. आजही घोडयांच्या संख्येत वाढ होत आहे.
घोडयाच्या शरीराची लांबी सु. २१० सेंमी., खांदयापर्यंतची उंची सु. १४२ सेंमी., शेपूट सु. ९० सेंमी. आणि वजन सु. ३५० किग्रॅ. असते. शरीराचा रंग काळसर तपकिरी असून पोटाकडे फिकट होत जातो. डोके आकाराने मोठे व शरीराच्या रंगाहून गडद असते. कान लहान असून नाकाचे टोक बहुधा पांढरे असते. जमिनीवरील सस्तन प्राण्यांमध्ये घोडयाचे डोळे मोठे असतात. मान लांब आणि डोळे चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंवर असल्यामुळे त्याला चोहीकडचे दिसते. दोन्ही डोळे स्वतंत्रपणे हलविता येत असल्यामुळे घोडा एकाच वेळी समोर आणि मागे पाहू शकतो. अंधारातदेखील त्याला दिसते. मात्र, व्दिवर्णी दृष्टी असल्यामुळे त्यांना लाल रंगाच्या छटा हिरव्या दिसतात. अंगावरील केस हिवाळ्यात अधिक दाट होतात आणि उन्हाळ्यात गळल्यामुळे विरळ होतात. मात्र शेपूट आणि आयाळीतील केस गळत नाहीत. पायावरील केस गडद तपकिरी किंवा काळे असतात.
घोडयाच्या शरीरातील हाडांची संख्या सु. २०५ असते. विशेष म्हणजे, त्याच्या शरीरात जत्रुक हाड (कॉलर बोन) नसते. पुढचे पाय, स्नायू, कंडरा आणि अस्थिरज्जू यांनी मिळून पाठीच्या मणक्याला जुळलेले असतात. शरीराचा पूर्ण भार पुढच्या पायांवर असतो. गुडघ्यातील हाडांची रचना मनुष्याच्या मनगटातील मणिबंधास्थीसारखीच (कार्पल बोन) असते. पायाच्या खालच्या भागातील हाडे माणसाच्या हातापायांसारखी असतात. गुडघ्यापासूनच्या खालच्या भागात स्नायू नसतात. हा भाग त्वचा, केस, हाडे, कंडरा, अस्थिरज्जू, कास्थी आणि विशिष्ट ऊतींनी तयार झालेले खूर यांनी बनलेला असतो. खूर केराटिनाने बनलेले असून त्यांची रचना विशिष्ट असते. घोडा ताशी सु. ६५ किमी. वेगाने पळू शकतो.
घोडा हा मुख्यत: शाकाहारी असून गवत आणि तत्सम चारा खाण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये अनुकूलन घडून आले आहे. नरामध्ये साधारणपणे ४० दात, तर मादीमध्ये ३६ दात असतात. प्रौढ घोडयात पुढील १२ पटाशीचे दात गवत किंवा तत्सम वनस्पती खाण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत. तसेच आतील २४ दातांचा पृष्ठभाग सपाट असून ते चर्वणासाठी अनुकूलित झालेले आहेत. घोडा रवंथ करीत नाही. मनुष्याच्या तुलनेत त्याचे जठर लहान असून ते एका कप्प्याचे असते. आतडे मोठे असते. तो सेल्युलोज पचवू शकतो. घोडा उत्तम पोहू शकतो. पाण्याच्या खोलीचा अंदाज त्याला येतो. तो प्रामाणिक व बुद्धिमान प्राणी समजला जातो. अचानक स्वारावर संकट ओढवले असता घोडयाने जखमी स्वारांचे प्राण वाचविल्याच्या अनेक घटना आहेत. तो वेगवेगळ्या प्रकारचे संदेश आत्मसात करू शकतो. मात्र, हे संदेश पुन:पुन्हा शिकवावे लागतात.
घोडयाची श्रवणक्षमता व गंधक्षमता विकसित असते. घोडा आडवा झोपत नाही. घोडा आळीपाळीने एका पायास विश्रांती देतो आणि थोडा थोडा वेळ झोपतो. वन्य स्थितीत ते कळपाने राहतात. तो सतत सावध असतो आणि आजूबाजूला लक्ष ठेवतो. धोक्याची जाणीव झाल्यानंतर प्रथम पळून जाण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा तो शत्रूवर टाचांनी हल्ला करतो, चावे घेतो आणि स्वत:चे रक्षण करतो. त्यांच्या कळपात १५ ‒ २० मादया व एक नर असतो. नर कळप प्रमुखाचे काम करतो आणि कळपाच्या चरण्याची व संरक्षणाची जबाबदारी घेतो. इतर नर मोठे झाले की कळपापासून दूर जातात किंवा वयस्कर नराची जागा घेतात. अनेक वर्षे कळप प्रमुखाची जागा एकाच नराकडे असते. मादीचा गर्भावधी ३४० दिवसांचा असतो. ती एकावेळी एका पिलाला जन्म देते. त्याला शिंगरू म्हणतात. सहा ते आठ महिने मादी शिंगराला दूध पाजते. दोन वर्षांनंतर शिंगरू आईपासून वेगळे होते; त्यानंतर दोन वर्षांत शिंगरू प्रजननक्षम बनते. घोडयाचा आयु:काल २० ‒ ३० वर्षे असतो.
इ. स. पू. ४००० पासून मनुष्याने घोडा माणसाळवण्यास सुरुवात केली आणि इ.स.पू. ३००० सालापर्यंत हा प्राणी मोठया प्रमाणावर माणसाळविला गेला. जे घोडे कधीही माणसाळविले गेले नाहीत, त्यांसाठी ‘वन्य’ ही संज्ञा वापरली जाते. फेरल शेवालस्की आणि फेरल टारपन घोडे कधीही माणसाळविले गेले नाहीत. फेरल टारपन घोडे एकोणिसावे शतक संपत असताना अस्तंगत झाले. माणसाळविलेले घोडे वनामध्ये भटकले जाऊन तेथे त्यांची संख्या वाढल्याची उदाहरणे आहेत. मात्र, असे घोडे खरे ‘वन्य’ घोडे नाहीत. आजच्या घडीला वन्य स्थितीत केवळ फेरल शेवालस्की घोडे आढळतात. हे घोडे मुख्यत: मंगोलियात आढळत असल्याने त्याला मंगोलियन घोडा असेही म्हणतात. १९६९ – ९२ या कालावधीत ही वन्य जाती नामशेष झाल्याचे मानले जात होते. मात्र, जागतिक स्तरावरील काही प्राणिसंग्रहालयांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या वन्य घोडयांची संख्या वाढली आहे.
वन्य घोडयाच्या अंतर्जननातून आज पाळीव घोडयांचे सु. ३५० प्रकारचे वाण जगभर तयार झालेले आहेत. शेतकामासाठी, ओझे ओढण्यासाठी, खडतर प्रवासासाठी, रेताड प्रदेशात अधिक अंतर चालण्यासाठी, युद्धासाठी, डोंगराळ भागात वाहतुकीसाठी आणि केवळ शर्यतींसाठी असे घोडयांचे प्रकार असतात. घोडा ज्या कामासाठी वापरतात, तेच गुण पुढच्या पिढीत उतरतील, अशा उद्देशाने त्यांची पैदास केली जाते. घोडयांना प्रथम माणसाळविण्याचे प्रयत्न मध्य आशियात घडून आल्याचे दिसते. घोडेपालनाचे संशोधन करताना नरातील (Y) गुणसूत्र आणि मादीच्या तंतुकणिकातील डीएनए यांचा सविस्तर अभ्यास केला गेला. आधुनिक घोडयांचे डीएनए आणि घोडयांच्या जीवाश्मातील डीएनए यांची तुलना केल्यावर इ.स.पू. ४००० वर्षांपासून घोडापालनाचे प्रयत्न झाले आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यावेळच्या घोडयांच्या परस्पर अंतर्जननातून आजची पाळीव घोडयाची पिढी तयार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रंगांमध्ये विविधता आली असून पूर्ण काळा, बदामी, गडद तपकिरी, पूर्ण पांढरा, कबरा, लहान मोठे ठिपके असलेला असे विविध रंगांचे घोडे तयार झाले आहेत. वन्य घोडयामध्ये फक्त काळसर तपकिरी असा एकच रंग होता.
उत्तर अमेरिकेत सापडलेल्या जीवाश्मांवरून वैज्ञानिकांना असे दिसून आले आहे की ५∙५ कोटी वर्षांपूर्वी, इओसीन कल्पात आधुनिक काळातील घोडयाचे मूळ पूर्वज हायरॅकोथेरियम (किंवा इओहिप्पस) अस्तित्वात आले. इओहिप्पस हा कोल्ह्याएवढया लहान आकाराचा होता. त्याच्या पुढील पायांवर चार खूर आणि मागील पायांवर तीन खूर होते. केवळ पाने आणि कोवळे अंकुर खाण्यायोग्य दात, पायाची आखूड हाडे, धनुष्याकार पाठ व लहानसा आकार इत्यादींमुळे हा प्राणी घोडयाहून दिसायला भिन्न होता.
इओहिप्पस पासून तयार झालेल्या मेसोहिप्पसला आधुनिक घोडयाचे पूर्वज मानतात. ३∙५ कोटी वर्षांपूर्वी हे प्राणी होऊन गेले. त्यांची सरासरी उंची सु. ५१ सेंमी. होती आणि पाय लांब व निमुळते होते. प्रत्येक पायाला तीन बोटे होती आणि मधले बोट लांब होते. ३ कोटी वर्षांपूर्वी मेसोहिप्पसपासून घोडयासारखे दिसणारे मायोहिप्पस प्राणी निर्माण झाले. त्यांची उंची ६१‒ ७१ सेंमी. होती आणि पायांचे मधले बोट त्याच्या पूर्वजापेक्षा म्हणजे मेसोहिप्पसपेक्षा अधिक लांब आणि मजबूत होते.
साधारणपणे २.६ कोटी वर्षांपूर्वी मायोहिप्पस पासून चारा खाऊ शकणाऱ्या मेरिकहिप्पस प्राण्यांचा विकास झाला. हे प्राणी सु. १०२ सेंमी. उंच होते. या प्राण्यांनादेखील मायोहिप्पसप्रमाणे प्रत्येक पायावर तीन बोटे होती. त्यांपैकी कडेची दोन्ही बोटे निरुपयोगी होती. परंतु मधले बोट लांब आणि मजबूत होते. या बोटाची परिणती मोठया व बाकदार खूरामध्ये झाली होती आणि शरीराचा संपूर्ण भार या खूरांवर होता.
साधारणपणे ३० लाख वर्षांपूर्वी, मेरिकहिप्पस हे आधुनिक घोडयांप्रमाणे दिसू लागले. आकाराने ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा मोठे झाले, त्यांच्या पायातील कडेच्या बोटांची हाडे आखूड होत गेली आणि मधल्या बोटांचे रूपांतर मजबूत खूरात झाले. दातांमध्येही बदल होऊन ते गवत खाण्यायोग्य झाले. वैज्ञानिक या घोडयांचा आधुनिक पाळीव घोडयांबरोबर ईक्वस गटात समावेश करतात.