पुनर्नवा ही वनस्पती निक्टॅजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बोऱ्हॅविया डिफ्यूजा आहे. गुलबक्षी व बुगनविलिया वनस्पतीही याच कुलातील आहेत. भारतात बोऱ्हॅविया प्रजातीच्या सहा जाती आढळतात. पुनर्नवा ही बहुवर्षायू वनस्पती कोठेही तणासारखी वाढत असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र झालेला आहे. आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमध्ये पुनर्नवा तिचा प्रसार झालेला दिसून येतो. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला किंवा रानावनांत ती मुक्तपणे वाढलेली आढळते.
पुनर्नवा वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ती १०–१५ सेंमी. उंच वाढत असून तिला अनेक फांद्या फुटतात. पाने साधी व समोरासमोर असतात; ती लंबगोल, वरून हिरवी आणि खालून पांढरी असतात. फुले गुच्छात येतात. ती लहान व गुलाबी असून घंटेच्या आकाराची असतात. फुलांत निदलपुंज व दलपुंज असा फरक नसतो. परिदले पाच व संयुक्त असतात. फळ शुष्कफळ प्रकारचे व एकबीजी असून त्यांवर बारीक काटेरी आवरण असते.
पुनर्नवा ही वनस्पती मूत्रल व प्रतिजैविक असून वेदना कमी होण्यासाठी तसेच रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी काही रुग्ण तिचा वापर करतात. तिच्या मुळांमध्ये पुनर्नव्हाइन नावाचे अल्कलॉइड असते. ते कर्करोगावर गुणकारी असल्याचे दिसून आले आहे. मलबांधणी, श्वेतप्रदर (अंगावर पांढरे जाणे), दाह, दमा इ. विकारांवर पुनर्नवा गुणकारी आहे, असा उल्लेख आयुर्वेदात आहे.