मोनेरा सृष्टीतील सजीवांना जीवाणू म्हणतात. जीवाणू सूक्ष्म असून ते एकपेशीय असतात. त्यांची लांबी ०.२ – २० मायक्रॉन असते व ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात. जीवाणू दंडगोल, चक्राकार, वर्तुळाकार, स्वल्पविराम अशा वेगवेगळ्या आकारांचे असतात. माती, आम्ले, उष्ण पाण्याचे झरे, बर्फ, किरणोत्सारी अपशिष्टे, पाणी व खोलवर जमीन अशा सर्व ठिकाणी आणि काही वेळा प्रतिकूल परिस्थितीत जीवाणू आढळतात. एका अंदाजानुसार १ ग्रॅ. मातीत सु. ४ कोटी तर १ मिलि. गोडया पाण्यात सु.१० लाख जीवाणू असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे निष्क्रीय अवस्थेमध्ये ते अनेक महिने राहू शकतात. पोषक वातावरण मिळाले की ते सक्रीय होतात. सर्व जीवाणूंचे जैववस्तुमान पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि प्राण्यांच्या जैववस्तुमानापेक्षा अधिक आहे. अन्नघटकांचे पुनर्चक्रण व अन्नघटकांच्या निर्मितीतील अनेक पायऱ्या जीवाणूंवर अवलंबून आहेत. नायट्रोजन स्थिरीकरण तसेच कार्बनी द्रव्यांचे विघटन जीवाणूंदवारा घडून येते. जीवाणुविज्ञान शाखेत जीवाणूंचा सर्वांगीण अभ्यास केला जातो.

जीवाणू संरचना

जीवाणूंची पेशी आदिकेंद्रकी असते. या एकपेशीय जीवांमध्ये केंद्रक नसून केंद्रकासारखा भाग असतो. त्याला केंद्रकाभ म्हणतात. पेशीअंगकाभोवती पटल नसते. डीएनएचा रेणू पेशीद्रवामध्ये अनियमित वेटोळ्याच्या स्वरूपात असतो. हरितलवक व तंतुकणिका यांसारखी पटलबद्ध अंगके जीवाणूंमध्ये नसतात. नीलहरित जीवाणूंमध्ये (सायनोबॅक्टेरिया) हरितलवकातील फक्त बाह्यपटल असते. त्यांच्यात असलेल्या हरितद्रव्याच्या क्लोरोफिल – ए मदतीने ते प्रकाशसंश्लेषणादवारे अन्न तयार करतात. मायकोप्लाझ्मा जीवाणू गटाखेरीज इतर सर्व जीवाणूंमध्ये पेशीपटल पेशीभित्तिकेने वेढलेले असते. पेशीभित्तिकेबाहेर संपुटिका असते. झलरिका (पीली) बाह्यभागावर दिसून येतात आणि त्या पेशीपटलातून बाहेर पडलेल्या असतात. बहुतेक सर्व जीवाणूंमध्ये द्विखंडनाने अलैंगिक प्रजनन घडून येते. काही जीवाणूंमध्ये द्विखंडन वेगाने घडून येते, तर काही जीवाणूंमध्ये त्यांची संख्या दुप्पट व्हायला १० तास लागतात. द्विखंडनातून तयार झालेल्या जीवाणूंच्या दोन्ही पेशींतील डीएनएचा रेणू मूळच्या जीवाणूसारखा असतो. काही जीवाणूंमध्ये संयुग्मन प्रक्रियेने लैंगिक प्रजनन घडून येते. या प्रक्रियेत जीवाणूच्या दोन पेशींमध्ये डीएनए रेणूंची देवाणघेवाण होते. डीएनएचा रेणू दिला जातो.

पेशीभित्तिकेच्या रासायनिक घटकांवरूनही जीवाणूंचे वर्गीकरण केले जाते. जिवाणूची पेशीभित्तिका कर्बोदक व प्रथिन यांच्या पेप्टिडोग्लायकॉनपासून बनलेली असते. क्रिस्टल व्हायोलेट या रंजकाबरोबर पेशीभित्तिकेचा रंग जांभळा झाल्यास त्या जिवाणूला ग्रॅम पॉझिटिव्ह म्हणतात. या जीवाणूंत झलरिका बहुवारित असतात. काही जीवाणूंची भित्तिका दुहेरी असते. पेशीभित्तिकेवर कर्बोदके, प्रथिने आणि मेदाम्लांचे बाह्य आवरण असते. त्यामुळे क्रिस्टल व्होयोलेट या विरंजकाची क्रिया बाह्यभित्तिकेवर होत नाही. अशा जीवाणूंना ग्रॅम-निगेटिव्ह म्हणतात. ही पद्धती क्रिस्त्यान योआक्रिम ग्रॅम यांनी १८८४ मध्ये शोधून काढली.

प्रारंभीच्या काळात सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या जीवाणूंच्या आकारावरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आणि त्यांना गोलाणू (कॉकस), दंडाणू (बॅसिलस), मळसूत्रासारखे (स्पिरीलम) आणि तंतुमय (फिलामेंट्स) अशी नावे देण्यात आली. वर्गीकरणाची वेगळी पद्धत म्हणजे वृद्धिमिश्रणात पेट्रीबशीमध्ये वाढविल्यानंतर त्यांचा आकार दिसतो. परीक्षणावरून देखील जीवाणू कोणत्या प्रकारचा आहे, हे ठरविता येते. जीवाणूंचा सूक्ष्म आकार हे त्यांचे महत्त्वाचे लक्षण आहे. एश्चेरिकिया कोलाय जीवाणू सरासरी आकाराचा आहे, असे समजले जाते. त्याची लांबी २ मायक्रॉन, रुंदी ०.५ मायक्रॉन, पेशीचे घनफळ ०.६ – ०.७ घन मायक्रॉन, तर पाण्यासहित वजन १ पायकोग्रॅम (म्हणजेच १.० × १०-१२ ग्रॅम) एवढे असते. एक लिटर ए. कोलाय संवर्धकामध्ये १ ग्रॅ. वजनाचे जीवाणू असतात. याचाच अर्थ, १ मिलि. मध्ये त्यांची संख्या सु. १०  एवढी असते.

जीवाणूंच्या पटलापासून १-२ किंवा अनेक कशाभिका निघालेल्या असतात. कशाभिकांच्या हालचालीनुसार जीवाणूंची हालचाल होते. हालचालींसाठी कशाभिकापेक्षा लहान झलरिका असतात. पेशीपटलामध्ये कशाभिकेच्या तळाशी असलेल्या पेशीपटलापासून निघालेल्या बुळबुळीत पदार्थामुळे ते पृष्ठभागावरून सरकतात. कशाभिका असलेल्या जीवाणूंपासून सहसा बुळबुळीत पदार्थ स्रवत नाही.

ऊर्जा मिळविण्याच्या पद्धतीनुसार जिवाणूंचे वर्गीकरण करता येते: (१) स्वयंपोषी आणि (२) परपोषी. स्वयंपोषी जीवाणू कार्बन डाय-ऑक्साइडपासून स्वत: अन्ननिर्मिती करतात. त्यांना प्रकाशसंश्लेषी जीवाणू म्हणतात. नायट्रोजन, सल्फर (गंधक) किंवा इतर द्रव्यांच्या ऑॅक्सिडीकरणाने ऊर्जा मिळविणाऱ्या जीवाणूंना रसायनपोषित (केमोऑटोट्रॉफिक) जीवाणू म्हणतात. रसायनपोषित जीवाणूंची संख्या तुलनेने कमी आहे. प्रकाशसंश्लेषी जीवाणूंत अधिक विविधता असते. सायनोबॅक्टेरिया, हिरव्या-जांभळ्या आणि जांभळ्या सल्फरविरहित जीवाणूंचा यात समावेश होतो. त्यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांचा हायड्रोजन दाता पाण्याचा रेणू नसून हायड्रोजन सल्फाइड असतो. प्रकाशसंश्लेषी सायनोबॅक्टेरियाचा हायड्रोजन दाता मात्र पाण्याचा रेणू असतो. परपोषी जीवाणू आपली ऊर्जा कार्बनी संयुगापासून विघटनाने मिळवितात. ही कार्बनी रसायने त्यांना परिसरातून मिळतात. याच गटात मृतोपजीवी जीवाणूंचा समावेश होतो. कुजणाऱ्या कार्बनी संयुगापासून मिळणारी ऊर्जा वितंचनातून किंवा श्वसनक्रियेतून मिळते. मायकोप्लाझ्मा गटातील अनेक जीवाणू परपोषी आहेत.

ऑक्सिश्वसन करणारे जीवाणू ऑक्सिजनयुक्त स्थितीमध्ये राहतात. त्यांच्या वाढीसाठी आणि अस्तित्वासाठी ऑक्सिजनची गरज असते. काही जीवाणू विनॉक्सी असतात. त्यांच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन मारक असतो. खोल समुद्रात सापडणारे जीवाणू, अन्ननलिकेतील जीवाणू तसेच अन्न दूषित करणारे जीवाणू या प्रकारात आहेत. याशिवाय त्यांचा आणखी एक वर्ग आहे. या वर्गातील जीवाणू ऑक्सिजनयुक्त वातावरणात राहतात. मात्र ऑक्सिजनशिवाय त्यांची वाढ होत राहते.

मानवी पेशींच्या एकूण संख्येहून अधिक जीवाणू आणि सूक्ष्मजीव मानवी शरीरात असतात. यातील जीवाणू मनुष्याच्या प्रतिकारशक्तीमुळे निरुपद्रवी अवस्थेत असतात. काही जीवाणू उपयुक्त असतात तर काही आजाराला कारणीभूत होतात. उदा. पटकी (कॉलरा), सांसर्गिक काळपुळी, कुष्ठरोग, क्षय हे आजार जीवाणूंमुळे होतात. काही जीवाणू आजार बरे करणारे व प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात. औदयोगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी, चीज, योगर्ट, दही, ब्रेड आणि मद्य तयार करण्यासाठी (किण्वन) जीवाणूंचा वापर होतो. द्विदल वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू, मृत शरीराची विल्हेवाट लावणारे जीवाणू, अन्नसाखळीत महत्त्वाचा भाग असलेले, असे जीवाणूंचे प्रकार आहेत.

सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये जीवाणूंचा सहभाग असल्याचे दिसून येते. सु. ३५० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या जीवाणूंचे जीवाश्म सापडले आहेत. जीवाणूसंबंधी जसजशी माहिती उपलब्ध होत गेली त्यानुसार उत्क्रांतीचे दुवे अधिक समजत गेले आहेत. जीवाणूंसह सर्व सजीवांची उत्पत्ती एकपेशीय सजीवांपासून झालेली आहे. सध्या चालू असलेल्या जीनोम प्रकल्पात यासंबंधीचा अभ्यास चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा