वारंवार, थेंबथेंब आणि वेदनायुक्त मूत्रोत्सर्ग होणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे या लक्षणांच्या समुच्चयाला ‘उन्हाळे लागणे’ म्हणतात.

मूत्राशय आणि मूत्रनलिकेचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे ही लक्षणे होतात. मूत्राशय आणि मूत्रनलिका यांमध्ये दाह झाल्यास, मूतखडा झाल्यास अथवा जीवाणूंचा संसर्ग झाल्यास उन्हाळे लागतात. मूत्राशयाच्या खाली व मूत्रमार्गाला वेढणाऱ्या ग्रंथीचा दाह झाल्यामुळे किंवा गळू झाल्यामुळे मूत्रोत्सर्गास अडथळा उत्पन्न झाल्याने अशीच लक्षणे दिसतात. उष्ण प्रदेशात शरीरातून घाम जास्त बाहेर टाकल्याने आणि त्याप्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे मूत्राची आम्लता वाढून उन्हाळे लागतात. मात्र या प्रकारात दाह होत नाही. उन्हाळे लागल्यामुळे मूत्र आम्लीय होऊन ते लालसर दिसते. काही वेळा मूत्रातून रक्तही बाहेर टाकले जाते. संसर्गामुळे उन्हाळे लागल्यास मूत्रातून पू दिसून येतो. उन्हाळे लागलेल्या व्यक्तीचे मूत्र सूक्ष्मदर्शीखाली असता मूत्रामध्ये रक्त आणि पूपेशी आढळतात.

या रोगाचे कारण शोधून त्यानुसार त्यावर योग्य ते उपचार केले जातात. भरपूर पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबाचे सरबत, जवाचा काढा इ. दिल्यास मूत्राचे प्रमाण वाढते आणि मूत्राची आम्लता कमी होते. तसेच मूत्रातील आम्लता कमी करण्यासाठी काही वेळा पाण्यात खाण्याचा सोडा मिसळून पिण्यास देतात. संसर्ग असल्यास प्रतिजैविके देतात