जेलीफिशाच्या प्रजातींनुसार त्यांचा आकार ३ सेंमी. ते ३ मी.पर्यंत असतो. शरीराची वरची बाजू बहिर्वक्र व खालची बाजू अंतर्वक्र असते. छत्रीच्या काठावर अगदी जवळजवळ संस्पर्शके असून सारख्याच अंतरावर आठ खाचा असतात. प्रत्येक खाचेत दोन पदर असून त्यात ज्ञानेंद्रिये असतात. ही ज्ञानेंद्रिये तोल संवेदी, प्रकाश संवेदी व रसायन संवेदी अशी तीन प्रकारची असतात. त्यांचा उपयोग तोल सांभाळण्यासाठी, प्रकाश संवेदनासाठी व रसायने ओळखण्यासाठी होतो. काठावर वर्तुळ स्नायुतंतू आणि चेतापेशींचे जाळे असते. अधर बाजूस चार मुखबाहूंमध्ये तोंड असते. प्रत्येक मुखबाहूवर एक लांब खाच असून तिच्या कडांवर दंशपुटी असतात. तोंड आंतरदेहगुहेत उघडते. त्यापासून चार जठरकोष्ठ निघतात व त्यांत जठरतंतू असतात. जठरतंतूंवर दंशपुटी असतात. प्रत्येक जठरकोष्ठाच्या तळाशी एक प्रजनन ग्रंथी असते. छत्रीच्या काठावर एक वृत्तनाल असतो. त्यात जठरकोष्ठापासून निघालेले अरीय नाल उघडतात.
जेलीफिशाचे शरीर दोन स्तरांचे असते. बाह्य व अंत:स्तरामध्ये एक मध्यश्लेष्मस्तर असतो. त्यामधील द्रायू समुद्राच्या पाण्यासारखा पारदर्शी असतो. त्यात प्रत्यास्थ तंतू व काही अमीबीय पेशी असतात. या स्तराचे स्वरूप स्थूलमानाने जेलीसारखे असते. म्हणून या प्राण्याला जेलीफिश म्हणतात. छत्रीच्या लयबद्ध आकुंचनाने हे प्राणी शरीरातील पाणी बाहेर फेकतात आणि पाण्याचा फवारा मारून पुढे सरकतात. यांच्या काही जाती वेगाने पोहतात तर काही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात.
जेलीफिश मांसाहारी असून वलयी प्राणी, लहान मासे, कवचधारी प्राणी, त्यांची अंडी व डिंभ हे त्याचे अन्न आहे. मुखाजवळील बाहूंवर असलेल्या दंशपुटींनी भक्ष्याला अर्धमेले केले जाते आणि बाहूंनी पकडून मुखात घेतले जाते. जठरतंतूंवरील दंशपुटीमुळे भक्ष्य पूर्णपणे मारले जाते. आंतरदेहगुहेत अन्नाचे पचन होते. पचलेले अन्न अरीय नालात व वृत्तनालात जाते. तेथे याचे अभिशोषण होते आणि न पचलेले अन्न मुखावाटे बाहेर टाकले जाते.
जेलीफिश एकलिंगी असून त्याचे नर-मादी सारखेच दिसतात. जेलीफिशाची एखादी पिढी उत्पन्न होताना प्रजनन दोन टप्प्यांत भिन्न प्रकारे घडून येते. पहिल्या टप्प्यात, छत्रिक अवस्थेत लैंगिक प्रजनन होऊन बहुशुंडक निर्माण होतात आणि दुसऱ्या टप्प्यात बहुशुंडक अवस्थेत अलैंगिक प्रजनन (मुकुलन) होऊन जेलीफिश (छत्रिक) उत्पन्न होतात. अशा प्रकारच्या प्रजननाला एकांतरजनन (मेटाजेनेसिस) म्हणतात.
लैंगिक प्रकारात, नराच्या शुक्रपेशी मुखावाटे बाहेर पडून मादीच्या पचन गुहेत शिरतात आणि अंडाणूंचे फलन करतात. फलित अंडी मुखभुजेला चिकटतात आणि त्यांचा विकास होऊन पक्ष्माभिका असलेला प्लॅनूला डिंभ तयार होतो. मादीच्या शरीरापासून हा प्लॅनूला वेगळा होऊन एका आधाराला चिकटतो. त्याचा विकास होऊन पक्ष्माभिका नाहीशा होतात आणि अलैंगिक प्रजनन करू शकणारा पॉलिपसारखा सायफोस्टोमा डिंभ तयार होतो. याला तोंड व शुंडके असतात. या अवस्थेत अलैंगिक प्रजननाचा टप्पा सुरू होतो आणि सायफोस्टोमाच्या शरीराचे (काकडीच्या चकत्यांप्रमाणे) आडवे तुकडे पडून ते भाग वेगवेगळे होतात. या प्रत्येक भागाला एफायरा म्हणतात व त्याचे जेलीफिशामध्ये रूपांतर होते. काही जेलीफिशांमध्ये जीवदीप्ती दिसून येते.