महाराष्ट्रातील लोकदैवत खंडोबाच्या जागरण विधीनाट्यात वाघ्यांकरवी वाजविले जाणारे लोकप्रिय लोकवाद्य. भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्रातील वर्गीकरणानुसार अशा वाद्यास अवनध्द वाद्य असे म्हणतात. लाकडी कड्यावर ताणून बसवलेल्या कातड्यामुळे यातून नाद निर्मिती होते म्हणून संगीतज्ञ यासकुर्ट सॅक्सच्या वर्गीकरणानुसार त्यास कंपित पटल वाद्य असेही म्हटले जाते.दिमडी हे आघाताने वाजविले जाणारे वाद्य आहे. दिमडीचा व्यास साधारणत: १५ से.मी. तर उंची ३ ते ४ इंच असते. गोलाकार लाकडी कडे हे आतील बाजूस निमुळते होत जाते हे लाकडी कडे बाभूळ, चिंच, शिसम, साग इ. झाडाचे असते.गोलाकार लाकडी कड्यावर डिंकासारखा चिकट पदार्थ लाऊन त्यावर चामडे बसविलेले असते हे चामडे बकऱ्याचे अथवा घोरपडीचे असते; परंतु अलीकडील काळात वन्य प्राण्यांच्या शिकारीवर आणि कातड्यावर बंदी असल्यामुळे बकऱ्याचे चामडे वापरतात.अलीकडे दिमडीला सहा ठिकाणी स्क्रू बसवतात त्यामुळे दिमडी सुरात लावता येते ; परंतु पूर्वी दिमडीला स्क्रू लावत नसत,दिवटी वर हलकी तापवून ती सुरात लावली जात होती. जास्त तापून जर तिची तारता वाढली म्हणजेच तिचा टणत्कार वाढला तर थोड पाणी लावून सुराला ती खाली आणता येते. दिंमडीच्या गोलाकार लाकडास छिद्रे पडून त्यात गोलाकार धातूच्या चकत्या बसविल्यास त्यास खंजिरी असे म्हणतात. घोरपडीच्या कातड्याची दिमडी ही छोट्या छोट्या चौकोनाकृती खळग्यांमुळे उंच आणि खर्ज स्वराला अगदी उत्तम वाजते कारण या छोट्या छोट्या चौकोनाकृती खळग्यांमुळे कंपन तीव्रता वाढते. बोकडाच्या कातड्याची दिमडी ही पखवाजाच्या धुम्पुडासारखी वाजते कारण बोकडाच्या कातड्याचा पृष्ठभाग हा घोरपडीच्या कातड्यासारखा उंचसखल नसतो; त्यामुळे त्याची कंपनतीव्रता घोरपडीच्या कातड्याएवढी प्रभावी नसते. खंडोबाच्या जागरणामधे दिमडी लावताना वाघ्ये चढा स्वर काढ, ढाल्या स्वर काढ, गुबकी चाल वाजव अशा सूचना परस्परांना देतात. गुबकी चाल म्हणजे दिमडी डाव्या हातात ठेऊन डाव्या हाताचे मधले बोट दिंमडीच्या आतून कातड्यावर ठेऊन आघात करून ठेका वाजवतात, तेव्हा गुबकी चाल तयार होते. गुबकी चाल प्रामुख्याने बोकडाच्या कातड्याच्या दिमडीने अधिक सुलभ होते.द्रुतलयीतील नृत्याच्या वेळी दुडकी चाल, तर संथ लयीतील नृत्याच्या वेळी गुबकी चाल वाजवितात.

जागरणातील दिमडीचे वादनसंकेत गुबकी चाल, दुडकी चाल असे असले तरी जागरणात दिमडीचे ठेके हे साधारणत: दादरा, केरव्याच्या अंगाने वाजविले जातात. गण गाताना दिमडी दादरा व केरवासदृश्य ठायी लयीत वाजविली जाते  तर पदाची गायनातील लय वाढते तशी दिमडीची लय वाढून दादरा केरवा द्वैगुणित किंवा चौपटीत लय वाढविली जाते. जागरणातील गायन हे शब्दप्रधान भावगायन असल्याने पदातील भावानुसार दिमडीची लय कमीजास्त केली जाते. ही लय कमी-जास्त करताना वाघ्या कधी दिमडी छातीवर ठेवून एखाद्या शाहिराने डफ छातीवर धरून एक पाय पुढे करून पवित्रा घ्यावा तसा पवित्रा घेतो तर कधी खाली वाकून पवित्रा घेतो, हे वाकणे म्हणजे वाकणे नसते, तर झुकणे असते. या झुकण्याचा संबंध दिमडीच्या झोल देण्याशी असतो. दिमडीचा झोल देणे म्हणजे दिमडीवर संथ, द्रुत अशी लयकारी करणे. दिमडी पखवाजासारखी अभंगसदृश भक्तिरसपूर्ण पदगायनासाठी, ढोलकीसारखी लावणीसदृश शृंगारिक पदगायनासाठी, डफासारखी , पोवाड्यासारखे वीररसपूर्ण पदगायनासाठी वापरली जाते. त्यामुळे दिमडी ही जागरणात केवळ साथसंगत करत नाही, तर संपूर्ण जागरणाचा ताल आणि तोल सांभाळते. पदगायनातून भक्तीची उत्कटता, भक्तीचे झपाटलेपण सिद्ध करण्यासाठी दिमडीचा उपयोग होतो. एखाद्या भगतात देव संचाराचे संचारीपण दिमडीच्या तारतेने दाखविले जाते. किंबहुना या संचाराचे भान दिमडीवादनच देते. भगताच्या अंगात देवाचे आगमन आणि निर्गमन होताना दिमडीचे विशिष्ट ठेके संथ लयीत असतात व देवाचा संचार सुरू असताना दिमडी दुत लयीत वाजते. म्हणजेच जागरणात दिमडीवादन हे विशिष्ट संकेतांनी बद्ध असते.जागरणातील दिमडीचे ठेके हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. हे ठेके दिमडी दत्तपंथी भजनात किंवा अन्य कोणत्याही संकीर्तन प्रकारात असताना तसे वाजत नाहीत.

दिमडी हे वाद्य जागरण या लोककला प्रकारातील प्रमुख वाद्य असले तरी शाहिरी पोवाडा, दत्त पंथी भजन यासारख्या कला प्रकारात तसेच जंगम, बैरागी, गोसावी, इ. यालोकसंस्कृतीचे उपासक देखील दिमडी हे वाद्य वाजवितात. अलीकडील काळात चित्रपट संगीत,लोकनृत्य,वाद्यवृंद इ. लोकसंगीतप्रकारात दिमडी हे वाद्य वाजवितात. ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘सोला बरस की बाली उमर को सलाम’ इ. चित्रपट गीतामधून दिमडीचा प्रभाव जाणवतो. दिमडी या वाद्यावर शास्त्रीय ताल, लग्ग्या, वाजविणारे  कलावंत महाराष्ट्रात आहेत.

संदर्भ :

  • क्षेत्रअध्ययन

प्रतिक्रिया व्यक्त करा