खरबूज : वेल व फळे

नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. खरबूज या नावाच्या फळाकरिता या वनस्पतीची लागवड केली जाते. ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुकुमिस मेलो आहे. भोपळा, कलिंगड इ. फळांच्या वनस्पती कुकर्बिटेसी कुलात मोडतात. या कुलातील अनेक जातींच्या फळांना ‘मेलॉन’ असे म्हणतात. मस्क मेलॉन ही त्यांपैकी एक जात आहे. या जातीचा अनेक वाणे विकसित केली गेली आहेत (उदा., हनीड्यू, कँटेलोप इ.). अभ्यासकांच्या मते तिचे मूलस्थान आफ्रिका व आशिया खंडांत असावे. या वनस्पतीची लागवड खास करून उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र येथे केली जात असली, तरी भारतात सर्वत्र नद्यांकाठच्या वाळूत केली जाते.

खरबुजाची पाने साधी, हस्ताकृती व पंचकोनी असतात. पानांच्या कडा दंतुर असतात. फुले पिवळी, एकेकटी व लांब केसाळ देठावर येतात. ती फक्त एक दिवसच उमलतात आणि त्यांचे परागण मधमाश्यांद्वारे होते. फळे गोल किंवा लंबगोल व राखाडी असून त्यांवर उभे पट्टे असतात. बिया अनेक व आकाराने चपट्या असतात. कच्चे फळ आंबट असते. पिकलेल्या फळातील गर नारिंगी, पिठूळ आणि चवीला आंबट गोड लागतो. फळात अ आणि  जीवनसत्त्वे असतात.

पिकलेल्या खरबुजातील गर शीतल, शक्तिवर्धक, कामोत्तेजक आणि मूत्रल असतो. वात, पित्त व थकवा दूर करण्यास फळांचा गर उपयुक्त ठरतो. तसेच दीर्घकालीन आणि तीव्र इसब त्वचारोगावर फळे व बिया गुणकारी ठरतात. बियांचे तेल पौष्टिक व चवदार असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा