पॉक्स कुलातील व्हॅरिओला मेजर आणि व्हॅरिओला मायनर या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग.व्हॅ. मेजर या विषाणूंमुळे झालेला देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा असतो तर व्हॅ. मायनर या विषाणूंमुळे झालेला आजार सौम्य स्वरूपाचा असतो. १९५० पर्यंत जगभर मोठ्या प्रमाणात देवी या रोगामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत असत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभर देवी लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने या रोगाचे उच्चाटन झाले आहे.

देवीचे व‍िषाणू

देवी हा फक्त मनुष्याला होणारा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे संक्रमण देवीबाधित रुग्णाच्या संपर्कातून किंवा रुग्णाच्या वस्तू वापरल्याने होते. या रोगात काही वेळा रुग्णाच्या त्वचेवर फोड येतात. मात्र, रुग्णाची प्रतिकारशक्ती तीव्र असल्यास त्वचेवर फोड येत नाहीत. रुग्णापासून आणि श्वसनमार्गावाटे पसरणाऱ्या विषाणूंपासून हा रोग पसरतो. शरीरात विषाणूंनी प्रवेश केल्यानंतर ते १२–१४ दिवस सुप्तावस्थेत असतात. या दिवसांत विषाणूंची संख्या वाढते. सुप्तावस्थेनंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात. ताप येणे, थंडी वाजणे आणि स्नायुदुखी ही रोगाची लक्षणे आहेत. त्यानंतर २–३ दिवसांत प्रथम चेहरा आणि खांद्यापासून कोपरापर्यंत त्वचेवर पुरळ उठतात. हळुहळू पुरळ छाती, पोट आणि पाठीवर पसरतात. पुरळ आल्यानंतर ७–१० दिवसांत रुग्णापासून विषाणूसंसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पुरळामध्ये पाण्यासारखा द्रव भरतो आणि १०–१२ दिवसांत पू भरतो. नंतर पुरळांवर खपली धरते आणि ते कोरडे पडतात. मात्र, ज्या ठिकाणची खपली निघाली आहे, तेथे त्वचेवर एक कायमचा व्रण शिलक राहतो. डोळ्यांमध्ये देवीचा संसर्ग झाल्यास कायमचे अंधत्व येते. ५ ते १०% रुग्णांमध्ये पुरळातून आणि नाकातोंडातून रक्तस्राव होतो. ही अतिशय गंभीर अवस्था असून त्यामुळे रुग्ण ७–८ दिवसांत मरण पावतो.

देवीचे पुरळ

लागण झाल्याच्या सुमारास देवी आणि गोवराचे पुरळ एकसारखेच दिसतात. मात्र, देवीचे पुरळ एकाच वेळी येतात तर गोवराचे पुरळ टप्प्याटप्प्याने येतात. देवीचे पुरळ चेहरा आणि हातावर अधिक प्रमाणात येतात तर गोवराचे पुरळ मात्र चेहरा आणि छाती किंवा पोटावर येतात. गोवर आणि देवीचे पुरळ एकसारखे दिसत असल्याने देवी झाल्याचा संशय आल्यास देवीचे निदान इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाद्वारे करून देवीचा आजार नसल्याची खात्री करून घेण्यात येते. संशयित रुग्णामध्ये पुरळ उठण्याआधी लघवी व रक्तामधील विषाणू आणि पुरळातील द्रवात असलेले विषाणू तपासण्यात येतात. देवी या रोगावर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे. या रोगाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी एकही उपचार उपलब्ध नाही. देवीवरील उपचारामध्ये रुग्णाला आराम मिळेल असे उपाय केले जातात. तसेच द्वितीय संसर्ग होऊ नये म्हणून उपाय केले जातात.

प्राचीन काळात भारत आणि चीनमध्ये लसीकरणाचा प्राथमिक प्रयत्न केला जात होता. ज्या व्यक्तींना देवीचा सौम्य रोग होतो त्यांना देवीचा तीव्र रोग होत नाही, हे या देशांतील लोकांना ठाऊक होते. म्हणून निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर फोडातील द्रव चोळून किंवा देवीच्या फोडावरील खपलीची भुकटी नाकावाटे हुंगून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न लोक करीत असत. मात्र, या प्रयत्नांमध्ये काही वेळा तीव्र संसर्ग होण्याची शक्यता आढळल्याने नंतर ही प्रथा बंद पडली. १७९८ साली एडवर्ड जेन्नर याने गोवर (काऊपॉक्स) झालेल्या व्यक्तीच्या रक्तरसापासून देवीची लस शोधून काढली. तेव्हापासून देवीच्या रोगाचा प्रसार थांबला. व्हॅक्सिनेशन हा शब्द ‘व्हॅक्सि’ या डॅनिश शब्दापासून आलेला आहे. लॅटिन भाषेतील व्हॅक्सि म्हणजे काऊ (गाय). गायीसाठी असलेल्या शब्दापासून आणि काऊपॉक्सपासून व्हॅक्सिनेशन हा शब्द रूढ झाला.

सामूहिक लसीकरणानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिल १९७७ मध्ये भारतातून देवी नष्ट झाल्याचे आणि १९८० साली जगातून देवी हा रोग समूळ नष्ट झाल्याचे जाहीर केले. देवी या रोगावरील सार्वत्रिक लसीकरण आता बंद करण्यात आले आहे. भविष्यात पॉक्स विषाणूंमध्ये जनुकीय बदलाने मानवी संसर्ग झाल्यास उपचार करणे शक्य व्हावे म्हणून जगातील दोन प्रयोगशाळांमध्ये सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (अॅटलांटा, जॉर्जिया, अमेरिका) आणि रशियन स्टेट सेंटर फॉर रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, (रशिया) येथे देवीचे विषाणू अधिकृतपणे जतन केले आहेत.