धातू किंवा धातुपाषाण वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाची तरलता (पातळपणा) वाढविण्यासाठी व नको असलेली मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या स्वरूपात निघून जावीत म्हणून जे पदार्थ त्याच्यात टाकण्यात येतात, त्यांना ‘अभिवाह’ म्हणतात. धातुविज्ञानात अभिवाहांचा पुढील महत्त्वपूर्ण कामांत उपयोग होतो : (१) खनिजांपासून धातूंचे प्रद्रावण करताना (शुद्ध धातू मिळविताना), (२) धातूंचे ओतकाम करताना,(३) धातूंवर मुलामे चढवताना व (४) धातूंचे जोडकाम करताना.

धातु-प्रद्रावणात अभिवाह व इतर मलद्रव्ये यांच्यामध्ये विक्रिया होऊन धातुमळी तयार होते. प्रद्रावण-भट्टीत शिरणारी अधातू-खनिजे ऑक्साइडाच्या किंवा सिलिकेटाच्या स्वरूपात असून त्यांचे द्रवांक (वितळबिंदू) उच्च असल्याकारणाने भट्टी उच्च तापमानापर्यंत तापवावी लागते. अभिवाह वापरल्याने हे तापमान बरेच खाली येते व त्यामुळे भट्टीतील तापरोधी  विटांचे आयुष्य वाढते आणि इंधनातही बचत होते. कमी घनतेच्या धातुमळीचा थर धातुद्रवावर आवरण घालून त्यातील मलद्रव्ये शोषून घेतो.

अभिवाहांचे संयुगांप्रमाणेच अल्कधर्मी (अम्‍लधर्मीयाशी विक्रिया होऊन उदासीन होणारे), अम्‍लधर्मी किंवा उदासीन असे प्रकार असतात. मलद्रव्ये जर अल्कधर्मी असतील तर अभिवाह अम्‍लधर्मी व तसेच जर मलद्रव्ये अम्‍लधर्मी असतील तर अभिवाह अल्कधर्मी निवडावे लागतात. तांब्याच्या परिवर्तकामध्ये (धातू शुद्ध करण्याच्या भट्टीत) अम्‍लधर्मी सिलिका,बिडाच्या झोतभट्टीत अल्कधर्मी चुनखडी, तर पोलाद तयार करताना उदासीन फ्ल्युओरस्पार वापरतात.

ओतकाम – धंद्यात धातुद्रवावर अभिवाहद्रवाचा थर पसरवितात व वातावरणातील ऑक्सिजन अथवा वाफ यांची धातुद्रवाबरोबर होणारी विक्रिया थांबवितात.ॲल्युमिनियमाच्या द्रवाने शोषिलेला हायड्रोजन वायू काढून टाकण्याकरिता क्लोरीन तसेच लोहेतर धातूंचे प्रद्रावण करताना टाकणखार अभिवाह म्हणून वापरतात.

धातूच्या जोडकामात संघिस्थान निर्मल करण्यासाठी रोझीन, टॅलो इ. सौम्य अभिवाह किंवा हायड्रोक्लोरिक अम्‍ल, नवसागर इ. तीव्र अभिवाह वापरतात व नंतर धुऊन काढतात. धातूंवर मुलामे चढवितानासुद्धा असलेच अभिवाह वापरून पृष्ठभाग निर्मल करणे आवश्यक असते.

This Post Has One Comment

Vibha Dhiraj Sankhe साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.