काशाचा (ब्राँझचा) हा एक प्रकार आहे. पोलादाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यापूर्वी तोफा ओतण्यासाठी या मिश्रधातूचा फार उपयोग होई म्हणून तिला गन मेटल (तोफेची धातू) हे नाव पडले. तीत तांबे व कथिल यांखेरीज थोडे जस्तही असते. जस्तामुळे या मिश्रधातूचा द्रव जास्त पातळ बनतो व त्यातील ऑक्सिजनही काढून टाकला जातो. त्यामुळे दोषरहित ओतकाम– विशेषतः वाळूच्या साच्यातील ओतकाम– जास्त चांगले होते. ह्या मिश्रधातूची गंजप्रतिकारशक्ती उच्च प्रतीची आहे.

गन मेटल ही मुख्यत: ओतकामाची धातू आहे. तीत साधारणत: ८८ टक्के तांबे, १० टक्के कथिल व २ टक्के जस्त असते. ह्याच प्रतीच्या पण ह्याहून थोड्या स्वस्त प्रकारात ८८ टक्के तांबे, ८ टक्के कथिल व ४ टक्के जस्त असून तिचे ताणसामर्थ्य सु. २५ किग्रॅ./ चौ. मिमी. व लांबीतील वाढ ८–१२ टक्के असते. ओतीव वस्तू ७००० से. वर सु. ३० मिनिटे तापवून नंतर हळूहळू थंड केल्यास वरील गुणधर्मांत बरीच वाढ होते. कणांचा आकार लहान करण्यासाठी व बल वाढविण्यासाठी हल्ली गन मेटलमध्ये १ टक्का निकेल मिसळतात.

यंत्रांच्या अनेक महत्त्वाच्या भागांसाठी गन मेटलचा उपयोग होतो. उदा., वाफ एंजिनांच्या झडपा, बाष्पित्राच्या (वाफ तयार करण्याच्या साधनाच्या, बॉयलरच्या) नळ्या, पंपाची ओतिवे, लहान दंतचक्रे, दट्ट्या-खिळीचे धारवे (फिरते दंड बरोबर स्थितीत धरून ठेवण्यासाठी असणारे आधार, बेअरिंग) इत्यादी. ह्यांशिवाय घर्षणरहित धारवे तयार करण्यासाठी होणारा या मिश्रधातूचा उपयोग महत्त्वाचा आहे. याकरिता गन मेटलमध्ये ५–१० टक्के शिसे मिसळतात. शिसे मिसळल्याने काठिण्य कमी होऊन चिवटपणाही कमी होतो. यंत्रणास (यंत्राच्या साहाय्याने संस्करण करण्यास) सुलभ अशा प्रकारात २·५ टक्‍क्यांपर्यंत व पुतळे तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रकारात ५ टक्क्यांपर्यंत शिसे असते. मळसूत्र व दंतचक्र जोड (एकमेकांना काटकोनात असणारे पण न छेदणारे दोन दंड जोडणारा दंतचक्राचा एक प्रकार, वर्म गिअर) वगैरे घर्षण करणाऱ्या भागांसाठी वापरण्यात येणाऱ्या गन मेटलचे काठिण्य वाढविण्याकरिता तीत एक टक्क्यापर्यंत फॉस्फरस मिसळतात.

भारतीय मानक संस्थेने गन मेटलसंबंधीची पुढील मानके प्रसिद्ध केली आहेत. भारतीय मानक क्र. १४५८–१९५९,३०६–१९६० आणि ३१८–१९६२.

प्रतिक्रिया व्यक्त करा