सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारपर्यंतच्या कोकणी पट्ट्यातील एक लोकप्रिय धरित्रीपूजनाचा नृत्योत्सव. प्रागैतिहासिक काळापासून हा उत्सव महत्त्वपूर्ण लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. धालो या शब्दाची उत्पत्ती धर्तरी अथवा मूळ मुंडारी भाषेतील ‘धालोय-धालोय’ म्हणजे पंख्यासारखे वाऱ्याच्या झुळकेवर अलगद डोलणे या शब्दातून झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. यातील सर्व विधी हे भूदेवीच्या पूजन-अर्चनासंबंधीचे आहेत. म्हणून हा उत्सव प्रसवशक्तीच्या उपासनेच्या विधी मानला जातो. या संपूर्ण उत्सवात एक बांधव (पुरूष) सोडला तर अन्य पुरूषांना मज्जाव असतो. गाण्याद्वारे मन मोकळे करून गावातील कुटुंबामधला सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याचे काम धालोत्सवाने केले आहे. ब्राह्मण आणि गौड सारस्वत ब्राह्मण यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व कष्टकरी समाजातील कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया या उत्सवात सहभागी होतात. दरवर्षी हिंदूबद्दल गावातून पौष आणि माघ (जानेवारी-फेब्रुवारी) महिन्यातील चांदण्या रात्री गीते आणि नृत्य करून ‘मांडा’वर पाच, सात, नऊ किंवा अकरा रात्री जागविल्या जातात. मांड म्हणजे गावातील सामायिक मालकीची अथवा गावप्रमुखाच्या मालकीची पवित्र मानलेली जागा.

धालो उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मांड शेणाने सारवून घेतात. मांडाच्या अग्रभागी तुळशी वृंदावनाची उभारणी कालवलेल्या मातीच्या साहाय्याने करतात. धालो सुरू व्हायच्या दिवशी पाने, फुले आणि रांगोळी घालून मांड सजविला जातो. तुळशी वृंदावनासमोर समई पेटवून ठेवतात. त्याचबरोबर ‘तळी’ (तांदूळ, नारळ, विडा, कुंकू व गूळ) ठेवून शेजारी पाण्याने भरलेली घागर ठेवल्यानंतर जमलेल्या सर्व जणी तुळशीला गाऱ्हाणे (प्रार्थना) घालतात. त्यानंतर दोन रांगा (फांती) बनवून समोरासमोर उभ्या राहून गीत-गायनाला सुरूवात करतात. गीते गाताना पहिली रांग दुसऱ्या  रांगेपर्यंत सामोरी जाते व पुन्हा  आपल्या जागी येते. तसाच पदन्यास करून दुसरी रांग प्रतिसाद देते. लयबद्ध पदन्यास आणि सोबतीला विविध लयीतील गीते गायली जातात. सुरवातीची गीते धर्तरी माता, स्थलदेवता, ग्रामदैवते, आणि निसर्गातील वनदेवीसारखी दैवते यांना नमन करणारी असतात. दैवतांच्या अभिवादनगीतानंतर कृष्णगीते, कौटुंबिक तसेच सामाजिक विषयावरील गीते गायली जातात. त्यात रामायण आणि महाभारतातील पात्रांविषयीची गीतेदेखील समाविष्ट असतात. त्यानंतर रांगा बदलून गीतगायन व नृत्य होते. त्या मागोमाग वर्तुळाकार नृत्य सुरू होते. यावेळी गायली जाणारी गीते बहुधा द्रुतगतीची असतात. फेर धरून नाचताना सगळया जणी टाळ्या वाजवतात. तसेच अधूनमधून तोंडातून फू-फू असा आवाज करतात. त्यामुळे या नृत्यप्रकाराला फुगडी म्हणतात. रात्री आठ-साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला धालो उत्तररात्री पर्यंत चालतो. वरील क्रमानेच सगळया रात्रींचा कार्यक्रम संपन्न होतो. मात्र शेवटची रात्र धालो-नृतिकांसाठी आणि संपूर्ण गावासाठी महत्त्वाची असते. त्यात समापनाचे वेगवेगळे विधी असतात. या रात्री मांडावर अनेक पात्रे आणली जातात. मात्र बहुतेक सर्व पात्रे स्त्रियाच आणतात. त्यात वाघ, रेमको, घाडी, पंगळी, नंदीबैल, खापुल्ले,नवरो-व्हंकल, सावजमारप, घाणचें पील, आंवाळा-कुंवाळो इत्यादी प्रकार सादर केले जातात. त्याशिवाय काही कुमारिका व काही प्रौढ स्त्रियांच्या अंगात येते व त्या सर्वजणी आपल्या बांधवाला आळवितात. अंगात आलेल्यांना रंभा असे म्हणतात. मांडावर परंपरेने ठरलेला बांधव (पुरूष) त्यांच्यावर तीर्थोदक शिंपडतो. मग त्या पूर्ववत होतात. शेवटच्या रात्रीची सर्व पात्रे येऊन गेल्यावर सगळया स्त्रिया एकमेकांची गळाभेट घेतात. त्यानंतर मांडावर पाणी शिंपडून शेणाचा शिंतोडा टाकला जातो. काही ठिकाणी त्यावर पोहे शिंपडतात तर काही गावात मूल नसलेली बाई ओलेल्या अंगाने विधीपूर्वक मांडावर पाणी शिंपडते. तिला पुढील वर्षापर्यंत अपत्यप्राप्ती होते असा समज आहे. शेवटच्या रात्री जमलेल्या सर्वांसाठी गोड-धोड पदार्थांचे वाटप होते.

धालो उत्सवाचे दोन उपविभाग अनुक्रम केपे-काणकोण आणि धारबांदोज येथे साजरे होताना दिसतात. केपे-कोणकोण या विभागातील हिंदू कुणबी ही आदिवासी जमात ‘धिल्लो’ अथवा धिन्लो या नावाचा उत्सव नवरात्रीपासून तीन आठवडयापर्यंत साजरा करतात. या उत्सवाचे स्वरूप आणि धालोत्सव यात खूप साम्य आहे. धिल्लो गावप्रमुखाच्या अंगणात वारूळाच्या मातीपासून बनविलेल्या आणि रानातील पानाफुलांनी सजविलेल्या मातीच्या गोळयाभोवती (धिल्लो) रांगा बनवून आणि  फेर धरून नृत्य करीत साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी त्या मातीच्या गोळयाचे जवळच्या गावठाणावर अथवा पाणवठयावर विधीपूर्वक विसर्जन केले जाते. या विधीचा भाग म्हणून प्रत्येक कुटुंबाकडून जमविलेल्या तांदूळ आणि नारळाच्या मिश्रणाने ‘चोरू’ हा पदार्थ तयार करून त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो. या उत्सवातील प्रत्येक विधीसाठी वेगवेगळी गीते गायली जातात. या उत्सवात देखील पुरूषांचा अजिबात सहभाग नसतो. मात्र वेळीप नावाचा अर्चक शेवटचे गाऱ्हाणे म्हणून धिल्ल्याच्या आशीर्वादाची याचना करतो.

धालोसारखाच उत्सव धारबांदोडा तालुक्यातील काही गावांतून कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या पाच अथवा त्याहून कमी संख्येच्या रात्री ‘कातयो’ या नावाने साजरा करतात. प्रारंभीचे सगळे विधी धालोत्सवासारखेच केले जातात. दुसऱ्या रात्री गावात तुळशीविवाहाचा विधी घरोघर संपन्न होतो. त्यानंतर कातयो मांडावर सुरू होतात. त्यावेळी गावातील १५-२० तरूणांचा गट हातात केळीच्या खोडाची पाती घेऊन ती जमिनीवर आपटतात. त्यावेळी मुखाने पंढरपूरच्या पांडुरंगाविषयीची भक्तीगीते गातात.त्यावेळी सर्वांना पोहे वाटण्यात आल्यावर हा गट निघून जातो. परंतु तिसऱ्या  रात्री बंबादेव नावाचा अशाच प्रकारचा तरूण मंडळीचा कार्यक्रम करतात. वीस-पंचवीस तरूण आपले चेहरे रंगवून आणि अंगभर सुकलेले गवत बांधून ताशा, जघांट,कांसाळे, झांज ही वाद्ये वाजवित मांडावर येतात. तेथील स्त्रिया त्यांचे आगत-स्वागत करतात. त्यानंतर आलेला गट प्रतिकात्मक पूजा करून प्रसादवाटप करतो व एक-दोन क्रीडा प्रकार सादर करून झाल्यावर त्यांचे निर्गमन होते.त्यानंतर मांडावरील स्त्रिया आपला नेहमीचा ‘कातयो’चा कार्यक्रम सादर करतात.

धालो, धिल्लो अथवा धिनलो आणि कातयो यांच्या सादरीकरणात थोडी-फार तफावत दिसली तरी ती एकाच लोकोत्सवाची विविध रूपे आहेत हे जाणवते. स्त्रीवर्गामध्ये सर्वात लोकप्रिय असा हा उत्सव सर्वत्र साजरा दिसतो. मात्र यातील गीतगायनाला कोणत्याही वाद्याची साथसंगत नसते.

Image Source : http://artandculture.goa.gov.in

संदर्भ :

  • केरकर,पोर्णिमा,गोव्यातील धालोत्सावाचे स्वरूप,गोमंतक मराठी अकादमी ,पणजी, २०११.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा