खुरीस : ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र क्रॉसला गोव्यात खुरीस म्हणतात. खुरीस हे आजच्या काळात ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानण्यात येते.  ख्रिस्ती धर्म अस्तित्वात येण्याअगोदरच्या काळात खुरीस वापरात होता. त्याला अपराध्याला शासन देण्याचे साधन मानले जात होते. पुरातन काळात ताव नावाचा खुरीस होता. ग्रीक भाषेतील ताव म्हणजे इंग्रजी टी अक्षराच्या आकाराचा होता. रोम शहरात चोर तसेच गुन्हेगारांना खुरीसवर ठार करण्याची शिक्षा दिली जात होती. त्यासाठी तीन प्रकारचे खुरीस वापरले जात. इंग्रजी टी आकाराचा क्रूस इमिसा, दुसरा सध्या प्रचारात असलेला अधिक चिन्हासारखा क्रूस क्रोमिसा, आणि इंग्रजी एक्स आकाराचा तो क्रूस देकुसाता. तिसऱ्या प्रकारच्या क्रूस देकुसातावर आंद्रे जीजसच्या एपोंस्टोलाला खिळे ठोकून मारले होते.

येशू ख्रिस्ताला ज्या क्रॉसवर खिळविण्यात आले होते तो क्रॉस क्रूस इमिसा होता. म्हणून त्या आकाराच्या क्रॉसला ख्रिस्ती धर्माचे पवित्र प्रतीक मानण्यात येऊ लागले. पुर्वी रोममध्ये क्रॉसवर चढविण्याची ज्याला शिक्षा होत असे त्याच्या अंगावरची वस्त्रे उतरविली जात. नंतर क्रॉसवर आडव्या लाकडावर त्याचे हात बांधले जात अथवा खिळे ठोकले जात. उभ्या लाकडावर देह बांधला जाई किंवा खिळे ठोकण्यात आल्यावर त्याला सजा देण्याच्या जागेवर नेऊन तो गतप्राण होईपर्यंत त्याला चाबकाच्या फटकारांनी फोडून काढले जाई. प्राण गेल्यावर त्याचे दफन केले जाई. इसवी सनाच्या पहिल्या तीन शतकांच्या कालावधीत ख्रिस्ती लोक क्रॉसला सजा देण्याचे साधन मानत असल्याने तो सभेसमोर आणत नव्हते; परंतु येशू ख्रिस्ताला क्रॉसवर बळी दिल्याने क्रॉस हा त्या धर्माचे प्रतीक मानला जाऊ लागला. तिसऱ्या शतकानंतर ख्रिस्ती लोक सभेपुढे क्रॉस आणून त्याला वंदन करू लागले. काँस्टँटिन राजा आणि मॅक्सिन्त्युयूस यांच्या युध्दाच्यावेळी काँस्टँटिनला आकाशात क्रॉसची प्रतिकृती आणि या प्रतीकाच्या साहाय्याने तू विजयी होशील अशी ग्रीक अक्षरे दिसली. नंतर खरोखरच तो या युध्दात विजयी झाला.

धर्माची खूण म्हणून क्रॉसला सन्मान आणि गौरव प्राप्त झाला. ते प्रतीक आपल्या अंगावर मिरविण्यात ख्रिस्ती अनुयायी आणि विषेशतः धर्माधिकारी वर्ग धन्यता मानू लागला. त्यामुळे चर्चमधील सर्व धर्मगुरू, त्याचा सेवकवर्ग विशिष्ट आकाराचे क्रॉस गळयात अडकवितात किंवा आपल्या पोशाखावर नक्षीकाम करून कोरतात. चर्चच्या दर्शनी भागात उंचावर ठळकपणे क्रॉस लावलेला असतो. शिवाय चर्चच्या प्रांगणात तसेच गावातील ख्रिस्ती लोकांच्या घरासमोर अथवा रस्त्यालगत लहान-मोठया आकाराचे क्रॉस उभारलेले दिसतात. चर्चमधील मुख्य अल्तारवर क्रॉसवर खिळवलेल्या येशू ख्रिस्ताची प्रतिमा अथवा भले मोठे चित्र, भव्य अशी येशू ख्रिस्ताची मूर्ती लटकवून त्याची मिरवणूक काढण्याची परंपरा लॅटिन अमेरिका आणि गोव्यात दिसते. चर्चसंबंधित कुठल्याही मिरवणुकीच्या अग्रभागी हातात लाकडी किंवा धातूचा क्रॉस घेऊन चालणारा धार्मिक नेता असतो. एकंदरीत खुरीस हा ख्रिस्ती लोकांचे धार्मिक जीवन व्यापणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे.

संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू ,लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.