पद्मनाभ : (इ. स. १४५६ मध्‍ये हयात). राजस्थानातील जालोरचा राजा अखेराज चौहाण यांच्‍या आश्रयास असलेले कवी. ते स्‍वत:ची पंडित आणि सुकवी अशी ओळख करून देत असत. ज्ञातीने विसलनगरा (विसनगरा) नागर. कान्‍हडदे-प्रबंध या त्‍यांच्‍या प्रदीर्घ रचनेतून आपली भूमी तसेच धर्म याविषयीचा त्‍यांचा उत्‍कट प्रेमभाव व्‍यक्‍त होतो. अखेराजच्‍या प्रेरणेने रचलेला आणि त्‍यांच्‍या पाचव्‍या पिढीचे पूर्वज असलेल्‍या कान्‍हडदेचा अल्‍लाउद्दीन खिलजीशी झालेला संघर्ष वर्णन करणारी ही रचना आहे. त्‍यात ४ खंड आणि मुख्‍यत्‍वे दुहा, चोपाई आणि पवाडु यांच्‍या १००० पेक्षा अधिक कडींचा विस्‍तार आहे. त्‍यातील ऐतिहासिक माहितीमुळे दस्‍ताऐवजी मौलिकता असलेले मध्‍यकाळचे हे प्रबंधकाव्‍य अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे. त्‍यात अल्‍लाउद्दीन खिलजीची मुलगी पिरोजचे, कान्‍हडदे पुत्र वीरमदवर असलेले एकतर्फी प्रेम ही करूण-मधुर प्रेमकथाही गुंफलेली आहे. हे प्रबंधकाव्‍य त्‍यातील समाजचित्रण, व्‍यक्तिचित्रण, वस्‍तुनिष्‍ठ वर्णनकला, शिष्‍ट व प्रौढ अभिव्‍यक्‍ती याने प्रभावी ठरले आहे.

संदर्भ :

  • व्‍यास कांतिलाल ब. (संपा.) ,कान्‍हडदे प्रबंध, इ. स. १९५९.

प्रतिक्रिया व्यक्त करा