महाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक आणि दक्षिण भारतातील ग्रामदेवतांच्या बलिक्रिया पार पाडणारा उपासक. पोतराज मुळचे आंध्रप्रदेशातील. आंध्रप्रदेशात मदगी किंवा मादगूड म्हणून ओळखला जाणारा हा समाज तमिळनाडू राज्यातही अस्तिवात आहे. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तुराजु या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बोकड. बोकडाची बलिप्रक्रिया पार पाडणारा पोत्तुराजु अशीही त्याची ओळख दिली जाते. देवीला पोतराज सोडण्याची पद्धत समाजातील अंधश्रद्धांचे देणे आहे. एखाद्या घरात मूल वाचत नसेल तर, मूल वाचावे म्हणून त्याला देवीच्या नावाने सोडतात. त्यामागाची भूमिका अशी की देवीला सोडले म्हणजे देवीचे झाले, देवी त्याला वाचविणार. अशा प्रकारे लक्ष्मीआई देवीला सोडला म्हणून त्याचे नाव लक्ष्मण, मरिआईला सोडला म्हणून त्याचे नाव मरीबा, त्यांच्या नावावरून कोणत्या देवीचा पोतराज आहे ते लक्षात येते. लक्ष्मीआईचा आणि मरिआईचा उपासक पोतराज हा महार किंवा मांग, बहुश: मांग जातीपैकी असतो. पोतराज महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजापैकी असून देऊळवाले पोतराज, खास गाणी म्हणणारे पोतराज, स्थानिक पोतराज असे त्यांचे प्रकार आहेत. देऊळवाले पोतराजांची भाषा तामिळमिश्र मराठी असून महार आणि मातंग पोतराजांची भाषा मराठी आहे. पोतराजांची विवाहपद्धती अर्थात महार आणि मातंगाची विवाहपद्धती. महार पोतराजांमध्ये सोमवंश आणि सूर्यवंश ही दोन कुळं असून, जाधव, पवार, चव्हाण, गायकवाड, पोळके, निंबाळकर आदि आडनावाच्या कुळी आहेत. पूर्वी लग्न पाच दिवस चालत असे. पहिला हळदीचा, दुसरा लग्नाचा, तिसरा साडयाचा, चौथा काकणं-बाशिंग सोडण्याचा आणि पाचवा वऱ्हाड वळविण्याचा. या पाच दिवसाचा खर्च दयाज (व्याज) देण्याची प्रथा रूढ होती. पोतराजांमध्ये आषाढी लग्न महत्वाचे मानले जाते.
स्थानिक पोतराज मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी, ते ज्या गावी राहतात त्या गावात आभरान घालून भिक्षा मागतात. मागताना मरिआय लक्ष्मीआईचं मदन अशी हाक देतात.हे सहसा गाणी म्हणत नाहीत.पायातल्या वाक्या तसेच उजव्या किंवा डाव्या हाताच्या अंगठयातील छोटीशी वाकी वाजवतात. काही भक्तांनी देवीला नवस केलेला असतो. त्याचा सर्व विधी हे पोतराज करतात. तसेच देवऋषीपणाही करतात. आषाढ महिन्यात पोतराजाला विशेष महत्त्व असते. देऊळवाले पोतराज जन्मपरंपरेने लहानापणापासून पायात घुंगरं बांधून डोक्यावर आईचे देऊळ घेतात. आयुष्यभर देवीच्या नावावर भटकंती करतात. स्थिर जीवन त्यांच्या वाट्याला येतचं नाही. आषाढ महिन्यापासून भटकंतीला सुरुवात होते. मरीआईचं देऊळ डोक्यावर घेऊन तो प्रथम मांगवाड्यात दाखल होतो. देवीच्यासमोर त्याच्या डोक्यावरचे देऊळ टेकवतो. त्याच्याबरोबर असलेली स्त्री ढोलकं वाजवयाला सुरू करते. आवाजाने सर्व बाल-गोपाळ मंडळी त्यांच्याभोवती गराडा घालतात आणि पोतराज धुपात्री म्हणतो. धुपात्रीला ढोलक्याची साथ असते. यावेळीला तो देवळापुढे आसन घालून बसतो. दार उघडण्यासाठी देवीला विनवितो. कोरडा उजव्या हातात घेऊन हवेत जोराने फिरवितो. त्याचे फटाफट हवेत आवाज करतो. अंगावर मारून घेतो.पुन्हा विनंती करतो. एवढी विनवणी करूनही दार उघडलं जात नाही. त्यावेळी तो रुद्ररूप धारण करतो.दंडामध्ये दाभण खुपसावयाच्या सुरुवात करतो. दंडातून रक्त वाहायला लागते. त्यानंतरही देवी प्रसन्न झाली नाही अशी त्याच्या मनाची खात्री झाल्यानंतर स्वत:चे मनगट तोंडात धरतो. त्यावेळी त्याच्या किंवा साथीदाराच्या अंगात येते.देवीला प्रसन्न करण्यासाठी अशाप्रकारे पोतराज आत्मपिडणाचा मार्ग पत्करतो. देवीचे दार उघडले जाते. जमलेल्या भोळ्या-भाबड्या आया-बाया देवीला साकडं घालतात. गतवर्षी केलेले नवस फेडतात. पोतराज पुढील वर्षाचे भविष्य कथन करतो. पाऊस-पाणी पडल किंवा नाही. दिवस कसे येतील, पाऊस कसा येणार, संक्रांत कसल्या रंगाचे पातळ नेसली असून ती कशावर बसली आहे, संक्रांत ज्या रंगाचे पातळ नेसली असेल त्या रंगाचे पातळ, चोळी लेवू नये, बांगड्या भरू नयेत, असे भाकीत सांगतो; सर्वांना आशीर्वाद देतो. तसेच सर्वच देऊळवाले पोतराज गाणी म्हणत नाहीत. गाणी म्हणणारे पोतराज, त्यांच्या गाण्याचे विषयी मरिआई, लक्ष्मीआई, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, पंढरपूरचा पांडुरंग, लेकी-सुना,मुलं-बाळं, बहीण-भावंड, तसेच राजा हरिश्चंद्र, सती चांगुणा, श्रावणबाळ, सीतेचा वनवास असे त्यांच्या गाण्याचे विविध विषय असतात. दक्षिणेतील ग्रामदेवता ह्या कडक कौमार्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देवतेशी तादात्म साधण्याचा पोतराज प्रयत्न करतात .
पोतराज पुरुष असूनही त्याच्या डोक्यावर स्रीप्रमाणे केस असतात. त्यांचा आंबाडा बांधलेला असतो. कमरेच्या घागर्याला नवे-जुने अनेक हिरवे खण लोंबत असतात. कमरेला सैलसर घुंगराची माळ अडकवलेली असते. पायात खुळखुळ्या म्हणजे वाजण्यासाठी आत खडे भरलेले भले मोठे पोकळ पितळी वाळे असतात. कपाळावर हळदी-कुंकवाचे पट्टे असतात. पोतराज अंगावर जो वेष धारण करतो त्याला आभरान म्हणतात. मरीआई,नातबाबा आणि शंकर ही त्यांची दैवते. मरीआई आणि लक्ष्मीआईची मनोभावे भक्ती ते करतात. याशिवाय तुळजापूरची आई, कोल्हापूरची अंबाबाई, रामखाड्याची आई, चतु:शृंगीची आई, माणकेश्वरची शेटीबाई हेही पोतराजांचे देव आहेत.
अंधश्रद्धेत सर्व पोतराज समाज बंदिस्त झालेला आहे. अंधश्रद्धा त्यांच्या जगण्याचे साधन आहे. दररोजच्या जीवनात ते अंधश्रद्धा पाळतात. घरात साप निघाला तर देव धुतात व साप गेलेल्या बाजूला घरात पाणी टाकतात. एखाद्याने उंबर्यावर अगर व्यक्तीच्या पाठीवर शिंकणे अशुभ समजतात. देवाला नवस करणे, केलेला नवस फेडणे, देवाच्या नावावर कोंबडा, बकरं बळी देणे, देवीच्या नावाने रेड्याचे कारण करणे हे प्रकार त्यांच्यात प्रचलित आहेत. स्थानिक पोतराज व गाणी म्हणणारे या दोन प्रकाराच्या पोतराजांची जातपंचायत नाही.देऊळवाले पोतराज समाजात जातपंचायतीचे अस्तित्व आहे.पंचायतीच्या प्रमुखास ‘साहेबराव’ म्हटलं जातं. साहेबरावाचा शब्द जातीत मानला जातो. पंचायतीत येणारी प्रकरणं जातीत शिवीगाळ करणं, चोरीमारी करणं, एखाद्यावर कुर्हाड उचलणं असली प्रकरणं येतात. आषाढात देवीच्या यात्रेत पंचायत बसते. आता पंचायतीचे प्रस्थ कमी होत चालले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दहिवडी येथे पोतराजांचे मुख्य ठाणे आहे.
संदर्भ :
- पाटील, पंढरीनाथ,भटके भाईबंद, सुरेश एजेन्सी,पुणे ,१९९० .
समीक्षक – अशोक इंगळे
अतिशय सुंदर लिखाण आहे ज्या प्रकारे पोतराज च्या बद्दलची माहिती तूम्ही या संधर्भात उतरवली आहे ज्याने लोकांनां त्यांच्याबद्दल माहिती मिळेल
मी एक कॉलेज विदयार्थी आहे मी एक documantery बनवत आहे तर मी यातली माहिती आणि शब्द वापरू शकतो का जर आपली परवानगी असेल तरच