गाढवांचा पोळा  : बैलाप्रमाणे गाढवाची पूजा करणारी विदर्भातील एक स्थानविशिष्ट परंपरा. लोकजीवनातील लोक आपली रूढी, परंपरा आणि संस्कृती शक्यतो जपण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील लोकजीवनातील बैलपोळा हा सण शेतकरी  बैलांच्या शेतीसाठी राबणाऱ्या उपकारांची कृतार्थता प्रगट करण्यासाठी साजरा करतात. आपणावर केलेल्या उपकारांचे मूल्य परत करता येत नाही म्हणून त्याची परतफेड कृतज्ञतेमधून केली जाते. गाईसाठी ‘गाईगोंधन’, गुराढोरासाठी ‘झेंडवाई’ तर बैलासाठी ‘बैलपोळा’ हे सण लोक साजरे करतात. पोळ्याच्या दिवशी बैल हा नुसता बैल न राहता तो नंदीबैल होतो.त्याला देवत्व पावते. त्याच मानसिकतेतून ज्यांची उपजीविका ही गाढवांच्या श्रमावर अवलंबून आहे ते श्रमजीवी लोक ‘गाढवांचा पोळा’ साजरा करतात. यामधून अकोला जिल्हातील अकोट या गावातील गाढवांची पूजा उन्नयन पावली आहे. या पूज्य भावनेपोटी येथील भोई समाजातील लोक गाढवांची पूजा पोळ्याच्या दिवशी करतात.

भोई समाजाने ज्या गाढवांना देवत्व बहाल केले, त्या गाढवाला मात्र प्राचीन परंपरेने नेहमी अप्रतिष्ठित मानले आहे ; परंतु अकोट मध्ये भोई लोक असे मानत नाहीत. गाढव हा शब्द महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात शिवी म्हणून वापरला जातो. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन शिलालेखात गाढवांचा उल्लेख शिवीच्या संदर्भात आला आहे. रा.चिं.ढेरे यांनी आपल्या संशोधनातून हे सहप्रमाण सिद्ध केले आहे. शासन भंग करणाऱ्याच्या विरोधात त्याचा आईचा उपभोग गाढव घेईल अशा अर्थाची शिवी परळ ११०८ या शिलालेखात आली असल्याचे ढेरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. गाढव निरऋती (विनाश) चा प्रतिनिधी असल्यामुळे गाढव अप्रतिष्ठेचा ठरला आहे, असे संदर्भ आपल्या प्राचीन संस्कृतीत आले आहेत. गाढवासंदर्भात निर्देशिलेल्या या अवगुणांमुळे गाढव अप्रतिष्ठेचा मानला जातो. अकोट या शहरात मात्र भरविला जाणारा गाढवांचा पोळा अप्रतिष्ठेचा मानला जात नाही. गाढवाच्या जीवावर उपजीविका करणारे गधाभोई या समाजाचे लोक गाढवाच्या पाठीवर ओझे लादून माल वाहण्याचे काम करतात. गाढवाच्या मदतीने आपली उपजीविका चालवितात. त्यांना दररोज उपजीविकेसाठी मदत करणाऱ्या गाढवाची ते बैलाप्रमाणे पूजा करतात. श्रमाला महत्व देणारे भोई समाजाचे लोक गाढवांच्या श्रमालाही पूजनीय मानतात. हे या श्रम करणाऱ्या संस्कृतीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.

गाढवांचा पोळ्याच्या दिवशी गाढवाला आंघोळ घातली जाते. त्याला बैलाप्रमाणे सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाने रंगविले जाते. संध्याकाळी सर्व गाढवांना एका ठिकाणी उभे करून त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. घरात बनविलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. ठोंबरा (भिजवून ठेवलेल्या ज्वारीचा कणखीचा गोळा) खाऊ घातला जातो. पुरुषाप्रमाणे घरातील गृहिणी आपल्या घरच्या गाढवाची भक्तिभावाने पूजा करतात. परिवर्तनशीलता हे लोकसाहित्याचे लक्षण मानता येते. लोकसाहित्यातील एखादी रूढी, प्रथा, पूजा अनेक वर्षाच्या एकत्र साहचार्याने बदल स्वीकारते किंवा संक्रमित होते. त्याप्रमाणे बैलपोळ्यातील पूजनाची अनेक वर्षाची परंपरा श्रमपरंपरेला महत्व देणाऱ्या भोई समाजाने स्वीकारली आहे.

संदर्भ :

  • ढेरे, डॉ.रा.चिं, लोकसाहित्य शोध आणि समीक्षा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९०.