आसनाचा एक प्रकार. शीर्ष या शब्दाचा अर्थ मस्तक असा होतो. या आसनात संपूर्ण शरीर मस्तकावर उलटे तोलून धरले जाते, म्हणून या आसनास शीर्षासन असे म्हणतात. शीर्षासन हे सर्वज्ञात असले तरी सर्वांगासनाप्रमाणे याचाही उल्लेख हठयोगाच्या ग्रंथांमध्ये आढळत नाही. या आसनात कपाळ जमिनीवर लावावे की टाळू (डोक्याचा वरचा मधला भाग) याविषयी पूर्वी मतभिन्नता होती. कालांतराने शरीरशास्त्राचा आधार घेऊन टाळूचाच भाग खाली ठेवावा हे मत ग्राह्य मानण्यात आले. यात सर्वांगासनापेक्षा संतुलनाचा भाग अधिक असतो.
कृती : हे आसन करताना प्रथम जमिनीवरील जाड आसनावर गुडघे टेकवून चवड्यांवर बसावे. समोर झुकून दोन्ही कोपर जमिनीवर ठेवावेत. हातांची बोटे परस्परांत गुंफून हात समोर ठेवावेत. हाताच्या पंज्यांच्या आधारे मस्तक जमिनीवर ठेवावे. गुडघे सरळ करून कंबर वर उचलावी व पाय एकेक करून चेहऱ्याकडे आणावेत जेणेकरून धड थोडे मस्तकापलीकडे झुकेल. यामुळे दोन्ही पाय आपोआप वर उचलले जातील. या स्थितीत शरीराचा तोल सांभाळावा. काही सेकंद स्थिर राहून पाय पूर्णपणे सरळ करावेत व पूर्ण शरीरही सरळ ठेवावे. संतुलनासाठी डोळे व दोन्ही कोपर यांचा त्रिकोण उपयोगी पडतो. या आसनात १–३ मिनिटे किंवा आवश्यकता वाटल्यास जास्त वेळही स्थिर राहता येईल. आसन सोडताना पाय गुडघ्यांत दुमडावेत. नंतर गुडघे पोटाकडे आणावेत व पाय सरळ करून चवडे तसेच गुडघे जमिनीवर टेकवावेत. काही सेकंद या स्थितीत राहून मग मस्तक वर उचलून चवड्यांवर बसावे. नंतर पाठीवर पडून १ मिनिटपर्यंत विश्रांती घ्यावी.
लाभ : या आसनात शरीर उलटे असल्याने गुरुत्वाकर्षणामुळे मस्तकाला रक्ताचा वाढीव पुरवठा होतो. तसेच सर्व ज्ञानेंद्रिये, पीनियल ग्रंथी (Pineal gland), पीयूष ग्रंथी (Pituitary gland), कंठस्थ अंत:स्रावी ग्रंथी (Thyroid and Parathyroid glands) यांनाही जास्तीचा रक्तपुरवठा होतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब नियंत्रित करणारी आणि तोल सांभाळणारी यंत्रणा अधिक कार्यक्षम होते. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या मोठ्या होणे (Varicose veins), ओटीपोटात आतडी साकळणे, पोट सुटणे, लैंगिक तक्रारी यांसारखे विकार दूर राहतात. मन दिवसभर प्रसन्न राहते. थकवा येत नाही. संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण होते.
विधिनिषेध : सर्दी-पडसे, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, मानदुखी यांपैकी काही तक्रार असल्यास हे आसन करू नये. ज्यांना नुसते खाली वाकले तरी डोक्यात जडपणा वाटतो, शिरा फुगतात व डोळे लाल होतात त्यांनी देखील हे आसन करू नये. हे आसन सुरू केल्यावर मानदुखीचा त्रास झाल्यास हे आसन करणे बंद करावे. मानसिक अशांतता असेल तर हे आसन करू नये. स्त्रियांनी पाळीच्या आधी ३-४ दिवस, पाळीमध्ये व नंतर ३-४ दिवस हे आसन करू नये. शक्तीचा जास्त व्यय होणारा व्यायाम केल्यानंतरही हे आसन करू नये.
शीर्षासन रिकाम्या पोटी करावे. इतर आसने करण्यापूर्वी हे आसन करणे योग्य ठरते.साधकाने स्वत:ची स्नायुक्षमता, तोल सांभाळण्याची तयारी, वेळ व गरज या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच शीर्षासन करावे. शीर्षासनानंतर लगेच उठून उभे राहू नये. काही वेळ शवासनात पडून राहावे.
पहा : विपरीतकरणी.
समीक्षक – साबिर शेख