योगदर्शनानुसार स्मृति ही चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी एक वृत्ति आहे. ज्या वस्तूचा अनुभव घेतला असेल, त्या वस्तूचेच स्मरण होऊ शकते व ज्या वस्तूचा अनुभव आधी घेतला नाही, त्या वस्तूचे स्मरण होऊ शकत नाही. म्हणून महर्षि पतंजलींनी “ज्या वस्तूंचा किंवा विषयांचा अनुभव (आधी) घेतला आहे, त्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंना विषय न करणारी वृत्ति म्हणजे स्मृति होय,” असे स्मृति वृत्तीचे लक्षण केले आहे (अनुभूत-विषय-असम्प्रमोष: स्मृति:|, योगसूत्र  १.११).

ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचा अनुभव घेतो, त्यावेळी ती वस्तू वर्तमानात उपस्थित असते व त्या वस्तूचे ज्ञानही वर्तमानात होत असते; परंतु स्मृतिमध्ये ज्या विषयाचे/वस्तूचे/प्रसंगाचे/क्रियेचे स्मरण होत आहे तो विषय, ती वस्तू इत्यादी भूतकाळातील असली तरीही तिचा आकार धारण करणारी चित्ताची स्मृतिरूप वृत्ति ही वर्तमानात असते. एखाद्या विषयाचा अनुभव घेतल्यानंतर चित्तामध्ये त्याविषयीचा एक संस्कार उत्पन्न होतो व तो नेहमी चित्तात राहतो. अनुभव हा तात्कालिक असला तरीही अनुभवातून उत्पन्न होणारा संस्कार कायम चित्तात राहतो व तो संस्कार स्मृतीला उत्पन्न करतो. ज्या ज्या विषयांचे अनुभव घेतले जातात, त्या त्या विषयांचे संस्कार चित्तात साठवून ठेवले जातात व ते कधीही नष्ट होत नाहीत असे योगदर्शन मानते. म्हणूनच व्यक्तींना लहानपणी घडलेली घटना/वस्तू/व्यक्ती /विषय अनेक वर्षांनंतरही आठवतात. कारण त्या गोष्टी जरी भूतकाळात होऊन गेलेल्या असल्या तरीही त्यांचे संस्कार चित्तामध्ये असतात व संस्कार प्रकट झाल्यावर स्मृतिरूप वृत्तीला उत्पन्न करतात. जर एखादी गोष्ट आठवत नसेल, तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्या वस्तूविषयीचे संस्कार चित्तातून निघून गेले आहेत किंवा नष्ट झाले आहेत. संस्कारांचे स्मृतिमध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्यातरी उद्बोधकाची (संस्कारांना प्रकट करणाऱ्या प्रेरकाची) आवश्यकता असते, तसेच संस्कारांचे स्मृतीत रूपांतर होण्यास काही प्रतिबंधक असेल तर ते प्रतिबंधक नष्ट करण्याची आवश्यकता असते. उदा., चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी शाळेत असताना काय काय घडले ते सर्व आठवत नाही. कारण दरम्यानच्या कालावधीत अनेक वर्षे लोटल्यामुळे ‘काळ’ हा स्मरणासाठी प्रतिबंधक आहे. परंतु, त्याच वेळी शाळेत असणारा एखादा मित्र भेटल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी आठवू लागतात. ‘मित्र’रूपी उद्बोधकामुळे संस्कार प्रकट होतात व स्मृति जागृत होतात.

व्यासभाष्यानुसार स्मृति ही दोन प्रकारची असते –

(१) अभावित-स्मर्तव्या (अकल्पित स्मृति) : ज्यावेळेला एखाद्या विषयाचे स्मरण जागेपणी केले जाते, त्यावेळेस त्या स्मृतीला ‘अभावित-स्मर्तव्या’ म्हणतात. ज्या वस्तू जशा रूपात अनुभवल्या त्याच रूपात त्यांचे स्मरण होते; म्हणून यथार्थ विषयाचे स्मरण करवून देणाऱ्या स्मृतीला अभावित-स्मर्तव्या म्हणतात. उदा., गायीला बघणे व नंतर गायीचे तदनुरूप स्मरण होणे.

(२) भावित-स्मर्तव्या (कल्पित स्मृति) : स्वप्नामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात, त्या सुद्धा स्मृतिरूपच आहेत, असे योगदर्शन मानते. जागेपणी ज्या ज्या गोष्टींचा अनुभव आपण घेतो, त्या अनुभवलेल्या विषयांपैकीच काही विषय स्वप्नात येतात. परंतु, जागेपणी ज्या रूपात ते विषय अनुभवले, त्यापेक्षा वेगळ्या रूपात ते स्वप्नात येऊ शकतात. त्यामुळे स्वप्नात होणारी विषयांची स्मृति ही ‘भावित-स्मर्तव्या’ होय. उदा., जागेपणी माणूस व गायीला बघणे आणि स्वप्नात शिंगे असलेला माणूस दिसणे.

चित्ताच्या पाच वृतींचे वर्णन करताना पतंजलींनी स्मृति वृत्तीचा उल्लेख सर्वांत शेवटी केला आहे. कारण प्रमाण, विपर्यय, विकल्प व निद्रा या चार वृत्ति स्मृतीला उत्पन्न करू शकतात; इतकेच नव्हे तर एक स्मृतीही दुसऱ्या स्मृतीला उत्पन्न करू शकते. ‘मला अमुक वस्तूचे स्मरण झाले होते’ अशा प्रकारे स्मृतीची स्मृती असू शकते. चित्ताच्या या पाच वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग होय.

पहा : चित्तवृत्ति.

संदर्भ :

  • स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.

समीक्षक : साबिर शेख