समापत्ति या शब्दाची व्युत्पत्ति ‘सम् + आ + पद्’ अशी असून या संज्ञेचा शब्दश: अर्थ ‘चित्ताचे विषयापर्यंत (आ), योग्य प्रकारे (सम्), पोहोचणे (पद्)’ असा आहे. योगदर्शनानुसार चित्त हे बाह्येन्द्रियांच्या माध्यमातून विषयांच्या (पदार्थांच्या) संपर्कात येते व त्या त्या वस्तूचा आकार धारण करते, यालाच चित्ताची वृत्ती असे म्हणतात. जर चित्तामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचे आधिक्य असेल तर वस्तूचे संपूर्ण व यथार्थ ज्ञान होत नाही. परंतु, जर चित्तात सत्त्वगुणाचा उत्कर्ष असेल, तर चित्त योग्य रीतीने विषयापर्यंत जाते व त्या विषयाला संपूर्णपणे व्यापून टाकते, यालाच समापत्ति असे म्हणतात. समापत्तीमुळे योग्याला सम्प्रज्ञान (सम् = यथार्थ, प्र = संपूर्ण, ज्ञान) प्राप्त होते.

महर्षी पतंजलींनी समापत्तीची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे — क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थतदञ्जनता समापत्ति:| (योगसूत्र १.४१). राजस व तामस वृत्ती क्षीण होऊन जे स्फटिकासारखे स्वच्छ झालेले असते, असे चित्त ग्रहीतृ (ज्ञाता पुरुष), ग्रहण (ज्ञानाचे साधन; इंद्रिय) व ग्राह्य (ज्ञेय/ध्येय विषय) यांपैकी कोणत्याही एका विषयावर चांगल्या प्रकारे स्थिर होऊन तदाकार होणे म्हणजे समापत्ति होय. व्यासभाष्यानुसार वरील सूत्रातील ‘क्षीणवृत्ते:’ या शब्दाचा अर्थ ज्या विषयावर चित्त एकाग्र झाले आहे, त्याच्या ज्ञानाव्यतिरिक्त अन्य ज्ञान उत्पन्न करणारी वृत्ती नसणे असा आहे. विज्ञानभिक्षूंच्या मते क्षीणवृत्ती चित्त म्हणजे ‘एकाग्र’ या वृत्तीशिवाय ज्या चित्ताच्या इतर सर्व वृत्ती नाहीशा झाल्या आहेत असे चित्त होय.

अभ्यास–वैराग्य, चित्तप्रसादन, क्रियायोग इत्यादी साधनेने योग्याचे चित्त निर्मल होते. साधक कोणत्याही एका विषयावर चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास सातत्याने आणि वैराग्यपूर्वक करीत असल्यास त्याच्या चित्तातील अंतराय व विक्षेप कमी होतात. रजोगुण व तमोगुणाची मात्रा हळूहळू कमी होते आणि सत्त्वगुणाची वृद्धी होत जाते. सत्त्वगुणाची वृद्धी चित्तप्रसादनास कारणीभूत होते. परिणामी क्लिष्ट वृत्ती कमी होतात. विषय वैतृष्ण्याकडे साधकाची वाटचाल होऊ लागते. चित्ताची ही अवस्था म्हणजेच ‘क्षीणवृत्ति’ अवस्था होय.चित्ताची शुद्धी झाल्यानंतर म्हणजेच चित्तातील सत्त्वगुणाचा प्रभाव वाढल्यानंतरच ते एखाद्या विषयावर एकाग्र होऊ शकते. कारण जोपर्यंत चित्तामध्ये रजोगुण क्रियाशील आहे तोपर्यंत त्याचा स्वभाव चंचल असतो आणि तमोगुण असल्यास चित्तामध्ये अज्ञान राहते. चित्ताची शुद्धी झाल्यानंतर चित्त एकाग्र होऊ शकते, परंतु एकाग्र होण्यासाठी त्याला कोणत्या तरी आलम्बनाची (ध्येय वस्तूची) आवश्यकता असते.

चित्त निर्मल असूनही साधनेच्या प्रारंभीच्या काळात योगी प्रकृति किंवा पुरुष अशा अतिसूक्ष्म विषयांवर चित्त एकाग्र करू शकत नाही. कारण चित्ताला अजून त्याप्रकारची योग्यता प्राप्त झालेली नसते. त्यामुळे एखाद्या स्थूल विषयापासून सुरुवात करून हळूहळू सूक्ष्म आत्मतत्त्वापर्यंत (पुरुष) एकाग्रतेचे आलम्बन बदलावे लागते.

विषयांच्या स्थूल-सूक्ष्म भेदानुसार पतंजलींनी समापत्ति ही ग्राह्य, ग्रहण आणि ग्रहीतृ या तीन प्रकारची असते असे वर्णन केले आहे. जर चित्त पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश या पाच स्थूल महाभूतांपैकी व शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच सूक्ष्म तन्मात्रांपैकी कोणत्याही एकावर एकाग्र होत असेल तर तर तिला ‘ग्राह्य समापत्ति’ असे म्हणतात. कारण हे दहा ज्ञानाचे विषय असल्यामुळे यांना ग्राह्य (ग्रहण करण्यायोग्य) असे म्हणतात. दृश्य विश्वातील स्थावर-जङ्गम वस्तू याही पाच महाभूतांपासून बनलेल्या असल्याने त्याही आलम्बनाचा विषय होऊ शकतात. व्यासभाष्यामध्ये ग्राह्य समापत्तीचे विषयानुरूप तीन उपविभाग सांगितलेले आहेत. कारण ग्राह्यविषय ‘स्थूल’, ‘सूक्ष्म’ व ‘विश्वभेद’ या तीन प्रकारचा असू शकतो. जर चित्त पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन, अहंकार व बुद्धी या इंद्रियांपैकी कोणत्याही एकावर एकाग्र होत असेल, तर तिला ‘ग्रहण समापत्ति’ असे म्हणतात. इंद्रियरूपी साधनाने ध्येय विषयाचे आकलन होते, त्यामुळे इंद्रियांना ग्रहण असे म्हणतात. गृह्यतेऽनेनेति ग्रहणमिन्द्रियम् | (योगवार्त्तिक १.४१). ज्यावेळी चित्त चैतन्यस्वरूप पुरुषावर एकाग्र होते, त्यावेळी तिला ‘ग्रहीतृ समापत्ति’ असे म्हणतात. पुरुष हाच सर्व विषयांचा ग्रहीता (ज्ञाता) असल्याने त्यावरील एकाग्रता म्हणजे ग्रहीतृ समापत्ति होय. विज्ञानभिक्षूंनी ‘शुक मुनि’ आदि ‘जीवन्मुक्त पुरूष’ हेही समापत्तीचा विषय होऊ शकतात, असे प्रतिपादन केले आहे.

महर्षी पतंजलींनी सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार या समापत्तीच्या चार भेदांचे स्पष्टपणे विवेचन केले आहे. याशिवाय आनंद आणि अस्मिता हेही समापत्तीचे अन्य भेद होत.

पहा : वृत्ति, आलम्बन.

संदर्भ :

  • कर्णाटक विमला (अनु.), पातञ्जलयोगदर्शनम्, काशी हिन्दू विश्वविद्यालय व रत्ना पब्लिकेशन्स, वाराणसी, १९९२.

                                                                                                समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर