वल्‍लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्‍यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्‍हणून महत्‍वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित आधार मिळालेला नाही. अहमदाबादजवळ असलेल्‍या नवापुरचे हे भट्ट मेवाडा ब्राह्मण. सुरुवातीला वैष्‍णव असणारे वल्‍लभ मेवाडा मागाहून देवीचे भक्‍त झाले असे सांगण्‍यात येते. विविध रागात आणि सहज प्रासादिक वाणीत वेगवेगळ्या विषयांवर रचलेले गरबे ही गुजराती साहित्‍य संसकृतीला त्‍यांनी दिलेली मौलिक ठेव आहे. त्‍यात ६१ कड्यांचा ‘अंबाजीना शणगारनो गरबो’, ११८ कडींचा ‘आनंदनो गरबो’, १५७ कडीचा ‘धनुषधारीनो गरबो’, ७३/७५ कडींचा ‘महाकाळीनो गरबो’, ४० कडींचा ‘गागरनो गरबो’ यासारख्‍या गरब्‍यातून अंबा, बहुचरा आणि महाकालीचे महिमागान करण्‍यात आले आहे. अलंकार वैभव, स्‍वभावोक्‍ती पूर्ण चित्रण, नाट्यात्‍मक प्रसंगचित्रण, प्रासअनुप्रासयुक्‍त लयबद्धता, त्‍यात गुंफलेली शक्तितत्‍त्‍वाची सिद्धान्‍तने, शक्‍ती अवताराची महात्‍मता, शक्‍तीच्‍या उत्‍पत्‍तीविषयी माहिती, देवीच्‍या पूजनाअर्चनेचे तपशील इ. घटकांमुळे जनसमाजातील शक्तिउपासनेची महती सांगणारे  हे गरबे जनमानसात रूळून गेले आहेत. त्‍याशिवाय ‘आंखमींचामणनो गरबो/राधिकाजीनो गरबो’, ‘व्रजवियोगनो गरबो’/’ओधवजीनो गरबो’, ‘सत्‍यभामानो गरबो’ यांसारखे कृष्‍णभक्‍तीपर गरबे तसेच ‘कळिकाळनो गरबो’, ‘कजेडानो गरबो’ असे सामाजिक-ऐतिहासिक विषयावरचे गरबेही त्‍यांनी रचले आहेत. गरब्‍याव्‍यतिरिक्‍त विविध रागांतील, विविध विषयांवरची पदनिर्मितीही त्‍यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे.

संदर्भ :

  • पाठक, रामनारायण वि.,वल्‍लभ मेवाडो अने गरबी प्रवाह, १९६१.२. शाह, जयवंती घ., वल्‍लभ मेवाडो : एक अध्‍ययन, १९५९.

प्रतिक्रिया व्यक्त करा