रुंद व चपटे शरीर असलेला, शरीरभर कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला अपृष्ठवंशी प्राणी. संधिपाद संघातील कवचधारी (क्रस्टेशिया) वर्गातील दशपाद (डेकॅपोडा) गणात खेकड्यांचा समावेश होतो. जगभर खेकड्यांच्या सु. ४,५०० जाती असून प्रामुख्याने त्या समुद्रात आढळतात. सागरी खेकड्यांच्या काही जाती समुद्रकिनारी उथळ पाण्यात आणि काही खोल समुद्रात आढळतात. अन्य समुद्रकिनार्यावरील वाळूत किंवा चिखलात बिळे करून राहतात. खेकड्यांच्या काही मोजक्या जाती गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहतात. भारतात गोड्या पाण्यात पॅराटेलफ्युजा स्पिनिजेरा या जातीचे खेकडे सामान्यपणे आढळतात.
खेकड्यांच्या आकारमानात विविधता आढळते. जिवंत कालवांच्या (मृदुकाय प्राण्यांची एक जात) शरीरात राहणारा वाटाणा खेकडा फक्त १.६ मिमी. एवढा असतो. जपानमध्ये मॅक्रोक्रीइरा आणि टास्मानियामध्ये स्यूडोकार्सिनस हे आकाराने मोठे असलेले राक्षसी खेकडे आढळतात. ऑस्ट्रेलियामध्येही राक्षसी खेकडे आढळतात. या खेकड्यांच्या कवचाची रुंदी सु. ३० सेंमी. असून पायाची लांबी सु. १२० सेंमी. असते. भारतातील चिल्का सरोवरात आढळणार्या सिला सेराटा या खेकड्याची रुंदी ४६ सेंमी. पर्यंत असते.
खेकड्याचे शरीर चपटे, आडवे व अंडाकृती असते. शरीराचे शीर्ष आणि वक्ष हे भाग मिळून शिरोवक्ष हा अखंड भाग बनलेला असतो. हा भाग कठिण कवचाने झाकलेला असतो. खेकड्यांचे उदर इतर कवचधारी प्राण्यांहून वेगळे घड्याघड्यांचे असून शरीराखाली झाकलेले असते. खेकडा वरून पाहिला असता त्याचे उदर दिसत नाही. नराचे उदर अरुंद व त्रिकोणी असते, तर मादीचे उदर रुंद व गोलसर असते.
खेकड्याचे श्वसन कल्ल्यांद्वारे होते. शरीराच्या दोन्ही बाजूंना कवचाखाली कल्ले असतात. खेकड्याला शिरोभागाच्या ५, वक्षाच्या ८ आणि उदराच्या ६ अशा एकूण १९ जोड्या उपांगांच्या असतात. यांपैकी ५ उपांग जोड्यांचे रूपांतर पायांच्या ५ जोड्यांमध्ये झालेले असते. पायांच्या पहिल्या जोडीवर चिमट्यासारखी दोन नखे असतात. त्यांना कीले म्हणतात. खेकड्यांच्या जातींनुसार कील्यांच्या आकारात आणि आकारमानात फरक आढळून येतात. उदा., फिडलर खेकड्यात एक कीला दुसर्या कीलाहून आकाराने सहज जाणवेल असा मोठा असतो. फिडलर नर खेकडा मादीला आकर्षित करण्यासाठी आणि इतर नर खेकड्यांना भीती दाखविण्यासाठी त्यांच्या मोठ्या कील्यांचा वापर करतो. बहुतांशी खेकडे वाळूत किंवा चिखलात चालताना त्यांच्या पायांच्या शेवटच्या चार जोड्यांचा उपयोग करतात. पोहणार्या खेकड्यांमध्ये पायांच्या शेवटच्या जोडीचे रूपांतर वल्ल्यांमध्ये झाल्यामुळे ते चपट्या पायांचा वापर करून कुशलतेने पोहतात.
इतर बहुतांशी कवचधारींप्रमाणे खेकडे सर्वभक्षी आहेत. शैवाल, लहान मासे किंवा कृमी खाऊन ते जगतात. याखेरीज समुद्रकिनार्यावरील तसेच पाण्यातील मृतजीवांचेही भक्षण करीत असल्यामुळे ते परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. काही खेकडे इतर प्राण्यांच्या शिंपल्यात सहभोजी म्हणून राहतात. उदा., कालवांच्या शिंपल्यात राहणार्या पिन्नोथेरीस या खेकड्याला कालवांच्या अन्नाचा काही भाग मिळत असतो.
बहुतांशी खेकड्यांच्या जाती खार्या पाण्यात अंडी घालतात. अंड्यापासून प्रौढ खेकड्यात वाढ होईपर्यंत त्यांच्या वाढीच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थांपैकी पहिल्या दोन अवस्था अंड्यात घडून येतात. बहुतांशी खेकड्यांमध्ये तिसर्या अवस्थेत अंडे फुटून मुक्तपणे पोहणारा झोइया डिंभ बाहेर पडतो. चौथ्या अवस्थेत याच झोइयाचे रूपांतर प्रौढासारख्या दिसणार्या मेगालोपामध्ये होते. खेकडे त्यांच्या कठीण कवचाची कात टाकून वाढत असतात.
भारतात आढळणार्या नेपच्यूनस पेलॅजिकस या सागरी खेकड्याचे शिरोवक्ष सु. २० सेंमी. रुंद असते. त्याच्या पायाची पाचवी जोडी वल्ह्यांसारखी चपटी असते. तीन रक्तवर्णी ठिपके अंगावर असणारा नेपच्यूनस खेकडा त्याच्या परिसरात प्रदूषण नसल्याचे दर्शवितो.
माणूस खेकड्यांचा खाण्यासाठी उपयोग करतो. भारतात सिला सेराटा, नेपच्यूनस पेलॅजिकस आणि पॅराटेलफ्युजा स्पिनिजेरा इ. खेकडे खाल्ले जातात. अमेरिकेत ब्ल्यू क्रॅब खेकडे मोठ्या प्रमाणावर विकले जातात. पूर्व आशिया आणि यूरोपीय देशांत गझामी आणि ब्ल्यू स्विमिंग खेकडे खाल्ले जातात.
Nice sir 👍🏻 I like it’s