चक्मा बॅबून (पॅपिओ अर्सिनस)

स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील एक प्राणी. बॅबूनाचा समावेश सरकोपिथेसिडी कुलातील पॅपिओ प्रजातीत होतो. पॅपिओ प्रजातीत पॅपिओ अर्सिनस (चक्मा बॅबून), पॅपिओ पॅपिओ (गिनी बॅबून), पॅपिओ हॅमॅड्रिअस (अरबी बॅबून), पॅपिओ सायनोसेफॅलस (पिवळा बॅबून) आणि पॅपिओ ॲनुबिस (ऑलिव्ह बॅबून) अशा पाच जाती आहेत. या जातींमध्ये गिनी बॅबून आकाराने सर्वांत लहान असून त्याच्या शरीराची लांबी सु. ५० सेंमी. व  वजन सु. १४ किग्रॅ. असते, तर चक्मा बॅबून आकाराने सर्वांत मोठे असून शरीराची लांबी सु. १२० सेंमी  व वजन सु. ४० किग्रॅ. असते. बॅबून मुख्यत: आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्य भागात आढळतो. चक्मा बॅबून आफ्रिकेच्या मध्य, पूर्व व दक्षिण भागांत मोठ्या संख्येने आढळतात.

बॅबून भूचर चतुष्पाद असून आफ्रिकेतील गवताळ रानात, कुरणात, टेकड्यांच्या प्रदेशात व  खडकाळ मैदानात राहतात. दाट वनात ते क्वचितच आढळतात. त्याचे शरीर करड्या-काळ्या रंगाचे असून तोंड काळे असते. मुस्कट कुत्र्यासारखे असून डोळे एकमेकांच्या अगदी जवळ असतात. मुस्कटाच्या अग्रभागी नाकपुड्या असतात. तसेच मुस्कटावर केस नसतात. शरीरावरचे केस जाडेभरडे असतात. कुल्ल्यांवर केस नसतात. बसण्याच्या जागेवरील घट्टे (श्रोणि-किण) भडक रंगाचे असून ते एक प्रकारच्या गाद्यांप्रमाणे असतात. या घट्‌ट्यांत चेतातंतू नसतात. नर हा मादीपेक्षा मोठा असून त्याचे सुळे मोठे असतात. प्रौढ नराच्या खांद्यावरील केस लांब असून त्याचा रंग तपकिरी-पिवळा असतो.

बॅबून सर्वभक्षी असून ते शेंगा, फळे व झाडांची मुळे खातात. काही वेळा ते कीटक, मासे, पक्षी व ससे देखील खातात. ते माणसाच्या वस्तीत येऊन शेळ्यामेंढ्या पळवतात व त्यांची हत्या करतात. तसेच वेळप्रसंगी मनुष्यावर हल्ला करतात. बॅबून समूहाने राहतात. समूहात अनेक कळप असतात. एका कळपात १०–२०० बॅबून असतात. एक नर व चार माद्या असे त्यांचे प्रमाण असते. माद्यांवरून नरांमध्ये नेहमीच भांडणे होतात. बऱ्याचदा तरुण नर कळप सोडून नव्या कळपात जातात. माद्या आयुष्यभर एकाच कळपात राहतात आणि त्या आळीपाळीने कळपातील पिलांची काळजी घेतात. सिंह, बिबट्या व मनुष्य हे बॅबूनाचे शत्रू आहेत.

ऋतुचक्राच्या मध्यावर बॅबून मादीच्या बाह्य जननेंद्रियाजवळचा भाग फुगतो. मादी नरापुढे त्या भागाचे प्रदर्शन करून त्याला आकर्षित करते. गर्भावधी  सहा  महिन्यांचा असतो. दर दोन वर्षांनी मादीची वीण होऊन दर खेपेला ती एका पिलाला जन्म देते. जन्मलेल्या पिलाचे वजन सु. १ किग्रॅ. असते. मादी पिलाचे संगोपन करते. पिलू एक वर्षभर आईचे दूध पिते व त्यानंतर ते स्वतंत्र होते. बॅबून ५–८ वर्षांनी प्रजननक्षम होतात. वन्य अवस्थेत तो  सु. ३० वर्षे जगतो, तर पाळीव अवस्थेत सु. ४५ वर्षे जगतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा