सोलॅनेसी कुलातील ॲट्रोपा बेलाडोना (Atropa belladonna)  ह्या वनस्पतीच्या मुळांमध्ये  मुख्य प्रमाणात मिळणारे आणि पुरातन काळापासून वापरात असलेले एक अल्कलॉइड संयुग आहे. आपल्याकडे सर्वत्र आढळणाऱ्या धोतऱ्याच्या झाडाच्या  (Datura stramonium)  मुळांमध्येसुद्धा हे अल्कलॉइड मोठ्या प्रमाणात आढळते.  ॲट्रोपिनाचे रासायनिक  सूत्र  C17H23NO3 आहे.

ॲट्रोपीन

ॲट्रोपिनाचे प्रतिबिंबित रूप (enantiomer) (-) हाइसायमीनसुद्धा (hyoscyamine) ह्याच वनस्पतीत उपलब्ध असते. ह्या दोन्हीचे एकमेकांतील रूपांतर  सहज होत असल्याने साधारणतः  ॲट्रोपीन ह्या दोन्हीचे मिश्रण म्हणूनच नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते.

गुणधर्म : ॲट्रोपीन घन स्वरूपात आढळते (विलय बिंदू ११८ से.). ॲट्रोपीन अतिशय विषारी असून त्याची चव अत्यंत कडू असते .

उपयुक्तता : ॲट्रोपीन सूक्ष्म प्रमाणात सौंदर्यप्रसाधन तसेच औषध म्हणूनही वापरले गेले आहे.  ​क्लीओपात्रा ह्या  सम्राज्ञीप्रमाणेच रोमन साम्राज्यातील ​ इतर  स्त्रिया  डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होण्यासाठी ॲट्रोपा बेलाडोना  ह्या झाडाच्या रसाचा  म्हणजे एका अर्थाने त्यातील अॅट्रोपिनाचा उपयोग ​करीत असत.  त्याकाळी स्त्रीच्या ​सौंदर्याचे हे एक लक्षण मानले जाई. ह्या वनस्पतीच्या शास्त्रीय  नावामध्ये  ‘सुंदर स्त्री’   अशा  अर्थाच्या इटालियन भाषेतील ‘बेलाडोना’ ह्या  शब्दाचा अंतर्भाव त्यामुळेच केला गेला.  पूर्वी वेदनाशामक तसेच संमोहक  म्हणूनही ॲट्रोपीन  वापरले जात असे.

आजही  ॲट्रोपिनाचा  १: ४०००० अशा प्रमाणातील  पाण्याचा द्राव​ नेत्रवैद्यकामधे बाहुल्या मोठ्या करून ​डोळ्यांची तपासणी करण्यासाठी वापरला जातो. पोट आणि मूत्राशय ह्यात गोळे (पेटके) येत असल्यास ॲट्रोपिनाचा इलाज केला जातो.  शरीरावरील गळूवर बेलाडोनाची ​जी ​पट्टी  लावली जाते त्यातही मुख्य औषध ॲट्रोपीन हेच असते.  विशेषतः पोटावरील शस्त्रक्रियांच्या  आधी जठर ग्रंथी किंवा लाला ग्रंथीतील (salivary gland) स्राव थांबविण्यासाठी ॲट्रोपीन वापरले जाते.  चेता वायू (nerve gas) सारख्या काही द्रव्यांच्या विषबाधेवर उतारा म्हणूनही ॲट्रोपीन वापरले जाते .  

दुष्‍परिणाम : ​ ॲट्रोपीन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास चक्कर येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, तोल जाणे, हृदयक्रिया वाढणे, मनाचा गोंधळ उडणे अशी काही लक्षणे दिसू शकतात. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो .

संदर्भ :

समीक्षक – श्रीनिवास सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा