तीन मोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्‍लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे द्रव असते. हवा, पाणी इत्यादींमुळे न गंजणारे असे सोने, प्लॅटिनम यांसारखे धातू केवळ हायड्रोक्लोरिक अम्‍लात किंवा केवळ नायट्रिक अम्‍लात विरघळत नाहीत. परंतु अम्‍लांच्या वरील मिश्रणात मात्र विरघळतात म्हणून त्या मिश्रणाला अम्‍लराज हे नाव दिले  गेले. त्याला नायट्रो-हायड्रोक्लोरिक अम्‍ल असेही म्हणतात. सहज न विरघळणाऱ्‍या पदार्थांना विरघळवण्यासाठी अम्‍लराज किंवा त्यासारखी मिश्रणे प्रयोगशाळा व उद्योगधंद्यांमध्ये वापरली जातात.

आ. १. अम्लराज

 

हायड्रोक्लोरिक व नायट्रिक अम्ले एकत्र मिसळल्यावर,  नायट्रिक अम्‍लामुळे Cl आयनांचे ऑक्सिडीकरण होते व क्लोरीन निर्माण होतो. त्या क्लोरिनामुळे सोने किंवा प्लॅटिनम यांचे गुंतागुंतीचे आयन तयार होऊन धातू विरघळतात. परंतु इरिडियम, ऑस्मियम, ऱ्होडियम व रूथेनियम या प्लॅटिनमच्या गटातील इतर धातूंवर मात्र अम्‍लराजाचा तितकासा परिणाम होत नाही.

साठवण आणि हाताळणी : अम्लराज तीव्र ऑक्सिडीकारक आणि क्षरणकारी (corrosive) आहे. तसेच त्याच्या विद्रावामधून विषारी वाफ बाहेर येते. त्यामुळे अम्लराजाचा विद्राव हा कायम बंद काचपात्रामध्ये साठवला जातो. तसेच हाताळताना मुखवटा (mask) वापरतात.

उपयोग : (१) अम्लराजमध्ये सोने विरघळते त्यामुळे याचा वापर क्लोरोऑरिक अम्ल तयार करण्यासाठी वापरतात, या विद्युत विच्छेद्य द्रावामुळे (electrolyte) उच्च प्रतीचे सोने शुध्द करता येते. (२) सोने आणि प्लॅटिनम या धातूंच्या निष्कर्षण व शुध्दीकरण प्रक्रियेत अम्लराज महत्त्वपूर्ण आहे. (३) धातूंच्या पृष्ठभागांचे अम्ल-उत्कीर्णन (etching) करण्यासाठी अम्लराज वापरतात. (४) अम्लराजाचा विद्राव वापरून प्रयोगशालेय उपकरणांची (उदा., काचेची उपकरणे) स्वच्छता करतात.

 

समीक्षक – श्रीनिवास सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा