अँथ्रसीन हे फिकट पिवळ्या रंगाचे स्थायुरूप कार्बनी संयुग आहे. हे तीन बेंझिन वलये एकमेकांशी जुळल्या जाऊन तयार झाले आहे. याचे रेणुसूत्र C14H10 असे असून त्याची रचना खालीलप्रमाणे आहे.
उपस्थिती : कोळशापासून मिळणाऱ्या डांबरामध्ये १.५% अँथ्रसीन असते. लोखंडाच्या उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या कोळशापासून उष्णतेने हे तयार होऊन उप-उप्तादिताच्या स्वरूपात मिळते.
उपयोग : अँथ्रसीनपासून अँथ्रॅक्विनोन (anthraquinone) हे संयुग ऑक्सिडीकरणाने मिळते. अँथ्रॅक्विनोनपासून अनेक रंगद्रव्ये तयार करतात त्यांना अँथ्रॅक्विनोन रंगद्रव्ये (dyes) म्हणतात. अँथ्रसीन शुद्ध स्वरूपात कार्बनी अर्धसंवाहक (semiconductor) आहे. ते उच्च उर्जा असलेले फोटॉन, इलेक्ट्रॉन व आल्फा कण शोधायला वापरतात. एरवी रंगहीन असलेला अँथ्रसीन अतिनील प्रकाशामध्ये निळ्या रंगाने चमकतो म्हणून याचा वापर अतिनील (UV) शोधक म्हणून होतो.
समीक्षक – श्रीनिवास सामंत