विश्वनाथ जानी : (इ. स. १६४२ मध्ये हयात) गुजरातमधील आख्यानकवी आणि पदकवी. ज्ञाती औदीच्य ब्राह्मण. पाटण अथवा पाटणच्या आसपास वास्तव्य असावे असे अभ्यासकांचे मत. त्यांच्या काव्यातील उत्कृष्ठ गोपीभाव आणि कृष्णप्रीती तसेच श्रीनाथजींऊ धोळ या रचनेवरून ते पुष्टिमार्गीय संप्रदायाचे कवी असावेत असे मत आहे. विविध रागातील २३ कडव्यांच्या सगाळ-चरित्र मधील चिलियाबाळाच्या कथेतील आईच्या वात्सल्य दर्शनातून व्यक्त होणारी कवीची भावनिरूपण शक्ती, मोसाळाचरित्रमधील प्रसंगनिरूपणक्षमता, कथाविकास व चरित्रचित्रणाची कुशलता तुलनेने अधिक काव्यगुणयुक्त आहे. कवीच्या पद्यबद्ध कृतीत, ४० पदे आणि ३७९ कडींची चतुर-चाळीसी ही रचना जयदेवच्या गीत-गोविंद या विषयाला अनुसरणारी श्रुंगारप्रधान रचना आहे. प्रसंगलेखनापेक्षा भावनिरूपणावर अधिक लक्ष देणारी, संवादाच्या विशेष आश्रयाने नाट्यात्मकतेचा अनुभव देणारी ही कृती तिच्यातील भाववैविध्य, सुरुचीपूर्ण संयत शृंगार, सुश्लिष्टता यासारख्या दृष्टीने प्रेमलाक्षणाभक्तीची आस्वाद्य रचना झाली आहे. कवीची सर्वात उत्तम कृती भागवताच्या उद्धवसंदेश या कथाभागावरून रचलेली २४ गुजराती आणि एक वज्रहिंदी पदाची प्रेमपचीसी ही रचना होय. देवकी, कृष्ण, वासुदेव, नंद, यशोदा, गोपी, उद्धव यांच्या संवादरूपी उक्तीतून गुंफलेली ही कृती कृष्ण आणि नंदजन यांच्यातील प्रगाढ प्रेमानुभूतीची आपल्याला प्रतीती देते. भावातील नूतनता, मूर्तता, सूक्ष्मता, उत्कटता आणि भाषेतील प्रासादिकता या दृष्टीने गुजराती साहित्यातील ही एक मनोरम कृती आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा