पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका. मुख्यत: संत, वीरपुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्याभोवती आख्यायिकांची गुंफण झालेली दिसते. लोकसाहित्याचाच त्या एक भाग असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व बहुधा अनामिकच असते. तथापि ज्या लोकसमूहात त्या प्रचलित असतात, त्याचे मन त्यांतून प्रतिबिंबित होते. किंबहुना त्या लोकसमूहाचे मन हा त्या आख्यायिकांचा मुख्य आधार असतो. उपर्युक्त अलौकिक व्यक्तींविषयी लोकसमूहास वाटणारा आदर व अभिमान अतिशयोक्तीच्या आणि अद्‌‌भुताच्या स्वरुपात आख्यायिकांतून व्यक्त होतो. तथापि या व्यक्ती इतिहासात होऊन गेल्यामुळे आख्यायिकांत सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण झाल्याचे दिसते. निरनिराळे लोकसमूह आपापल्या आख्यायिकांतील कल्पिताची निर्मिती आणि स्वीकार श्रद्धेनेच करीत असतात आणि थोडे चिकित्सकपणे पाहिल्यास त्या कल्पितातून काही रूपकार्थही जाणवतो.

‘लेजंड’ हा आख्यायिकांचा इंग्रजी प्रतिशब्द होय. मात्र आरंभी या शब्दाने चर्चमधून वाचली जाणारी संतचरित्रे सूचित होत. Legenda Aurea (इं. शी. गोल्डन लेजंड) या नावाने अशी काही संतचरित्रे तेराव्या शतकात ग्रंथबद्धही झाली. संतांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेभोवती अद्‌‌भुतरम्यतेचे वलय निर्माण करण्यासाठी अशा संतचरित्रांतही कल्पिताचा प्रवेश होऊन हळूहळू आजचा अर्थ लेजंडला प्राप्त झाला असावा. चॉसरने (१३४० ?–१४००) क्लीओपात्रासारख्या काही जगप्रसिद्ध स्त्रियांच्या कथा लेजंड ऑफ गुड विमेन या नावाने लिहिल्या. अँग्लोसॅक्सन इतिहासकारांनी आपल्या राजांचा वंशारंभ येनकेनप्रकारेण आदमपर्यंत नेऊन पोहोचविण्याच्या उद्देशाने अनेक आख्यायिका निर्माण केलेल्या आहेत.

राजा आर्थर ही इंग्लंडमधील अनेक आख्यायिकांचा विषय झालेली व्यक्तिरेखा होय. काव्य–नाटकादी साहित्यकृतींत आख्यायिकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. ज्ञानदेवांनी चालविलेली भिंत, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविणे, तसेच तुकारामांची इंद्रायणीत बुडविलेली अभंगांची पोथी जशीच्या तशी कोरडी वर येणे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आख्यायिका होत.

पहा :  लोकसाहित्य.

प्रतिक्रिया व्यक्त करा